पुणे शहरातील गुन्हा नोंद असलेल्या २३३ पिस्तूल परवानाधारकांना नोटीस !
पुणे – सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याजवळ अल्पवयीन मुलावर २२ जून या दिवशी गोळीबार करण्यात आला. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अनुमती (परवाना) असलेल्या पिस्तूल (अग्नीशस्त्र) धारकांचा आढावा घेतला. शहरामध्ये वैध पिस्तूलधारकांची संख्या किती ? याची माहिती नाही, तसेच अनुमती असलेल्या पिस्तूलधारकांतील २३३ पिस्तूलधारकांवर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद आहेत. (अशांकडे पिस्तूल ठेवणे कधीही धोक्याचेच ! याविषयी त्वरित उपाययोजना काढणे आवश्यक ! – संपादक) त्यांना ‘अनुमती रहित का करण्यात येऊ नये ?’ अशा नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
गेल्या सप्ताहामध्ये एका तरुण बांधकाम व्यावसायिकाने कार्यालयामध्ये डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्याच्याकडे पिस्तुलाचा परवाना होता; परंतु पिस्तूल परवानाधारक लोकांकडून चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर केला जात आहे, हे समोर येत आहे. पिस्तुलाचा परवाना मिळाल्यानंतर ६ महिन्यांच्या आत पिस्तूल खरेदी करून त्याची नोंद पोलिसांकडे करावी लागते. अशा ३४ परवानाधारकांनी ६ महिन्यांच्या आत पिस्तूल खरेदी केलेले नाही, अशांनाही नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.