शिक्षकांच्या भ्रमणभाषमध्ये ‘नीट’ घोटाळ्याचे पुरावे आढळले

  • परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे आश्वासन देऊन पैसे घेतले

  • परीक्षा प्रवेशपत्र आणि पैसे पाठवल्याच्या नोंदी ‘व्हॉट्सॲप’मध्ये सापडल्या

धाराशिव – ‘नीट यूजी परीक्षा घोटाळ्या’त लातूरचे संजय जाधव आणि जलीलखान पठाण या २ शिक्षकांनी ‘नीट’मध्ये अधिक गुण मिळवून देण्यासाठी धाराशिवमार्गे देहलीला पैसे पाठवल्याचे ‘आतंकवादविरोधी पथका’च्या (‘ए.टी.एस्.’च्या) प्राथमिक अन्वेषणातून पुढे आले आहे. या २ शिक्षकांसह देहली येथील एकावर लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

‘आतंकवादविरोधी पथका’ने त्यांच्या भ्रमणभाषची पडताळणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या छायाचित्र संग्रहामध्ये (गॅलरीमध्ये) अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रवेशपत्रांच्या प्रती आढळल्या. यासमवेतच परीक्षा आणि उमेदवार यांच्या संदर्भातील अनेक ‘व्हॉट्सॲप’ संभाषण, तसेच आर्थिक व्यवहारांच्या नोंदी आढळल्या. संजय जाधव याने पैशांच्या मोबदल्यात परीक्षा उत्तीर्ण करण्याचे आश्वासन देऊन अनेक विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे इरन्ना कोनगलवार यास ‘व्हॉट्सॲप’वरून पाठवल्याचे मान्य केले आहे.

संपादकीय भूमिका

असे शिक्षक मुलांवर काय संस्कार करणार ? अशा शिक्षकांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !