छगन भुजबळ यांचा राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न ! – जरांगे

मनोज जारांगे

छत्रपती संभाजीनगर – आम्ही आंदोलनाला बसलो, तिथे आमच्यासमोर दुसरे आंदोलन उभे केले. मराठा समाजाचे आंदोलन कुणी भरकटवले ? छगन भुजबळ यांचा राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे. ते चितावणीखोर भाषणे करत आहेत. या वयात मराठ्यांची नाराजी घेऊ नका, अशी चेतावणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. आता राज्यातील मराठा नेत्यांना आरक्षणासाठी एकत्र येण्याचे, तसेच ६ जुलै या दिवशीच्या ‘शांतता जनजागृती रॅली’मध्ये सर्वांनी उपस्थित रहाण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. (राज्यातील जातीय संघर्ष भडकवण्यामागे कोण आहे ? हे न कळण्याइतकी जनता दूधखुळी नाही ! – संपादक) सध्या राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद विकोपाला गेला आहे. राज्यातील सर्वपक्षीय ओबीसी नेते त्यांच्या जातीचे आरक्षण वाचवण्यासाठी एकजुटीने उभे राहिले आहेत. सत्ताधारी पक्षातील मराठे नेते माझ्या बाजूने बोलत नाहीत. त्यांनी मला उघडे पाडले आहे. त्यामुळे मी एकटा पडलो आहे, अशी खंत जरांगे यांनी व्यक्त केली आहे. मी एकटा पडलो तरीही मी मागे हटणार नाही, आपण ओबीसीतूनच आरक्षण घेऊ, असाही निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला आहे.