गर्दीच्या वेळी सिंहगड रस्त्यावरील (पुणे) जड वाहतूक बंद ठेवावी !

भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांची महापालिकेला सूचना !

पुणे – गर्दीच्या वेळेस म्हणजेच ‘प्राईम टाईम’मध्ये जड वाहतूक बंद ठेवावी. सिंहगड रस्ता समतल करावा. पाणी कुठेही साठणार नाही, यासाठी सक्षम यंत्रणा सिद्ध करावी. ड्रेनेजच्या जाळ्या, झाकणे व्यवस्थित ठेवावीत. वाहतूक नियमनासाठी पोलीस तसेच ‘वार्डन’ (साहाय्यक) नेमावेत, अशा स्वरूपाच्या सूचना भाजपच्या आमदार माधुरीताई मिसाळ यांनी केल्या आहेत. सिंहगड रस्ता परिसराची आणि चालू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची पहाणी केली. त्या वेळी महापालिकेच्या अधिकार्‍यांना सूचना केल्या.

राजाराम पूल, प्रकाश इनामदार चौक, हिंगणे चौक, आनंदनगर येथील द.भा. खेर चौक, माणिकबाग येथील आप्पासाहेब मोरे चौक, तसेच मुख्य सिंहगड रस्त्याची पहाणी केली. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, ड्रेनेजची नादुरुस्त झाकणे, जागोजागी पाणी साठणे आदी कारणांनी रस्त्यावर वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यावर त्वरित उपाययोजना करावी. सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ६ ते रात्री ९ या गर्दीच्या वेळी जड वाहनांसाठी वाहतूक बंद करण्यात यावी, अशा सूचना मिसाळ यांनी केल्या.