भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !
पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी लेखन केलेली ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाची भावना, तिच्याशी निगडित घटक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेतून ‘हिंदु’ कोण ? आणि सुसंस्कृत समाजातील श्रेष्ठ गुण’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
या पूर्वीचा लेख आपण येथे वाचू शकता : https://sanatanprabhat.org/marathi/807162.html
(लेखांक १२)
७. चारही वर्णांतील लोक असलेल्या समाजाचे महत्त्व
येथील समाज अनुवंशिक गुणवत्तांनी परिपूर्ण होता. ज्ञानी, तपस्वी, दयाशील ब्राह्मण, धैर्यवान, पराक्रमी, गुणी, शूर; पण विनम्र क्षत्रिय, संपन्न, दातृत्वशील, दीर्घोद्योगी, धर्मनिष्ठ वैश्य आणि विविध कलांमध्ये निपुण, कारागिरीत कुशल, कष्टाळू, सुशील, काटक आणि विनयशील शूद्र असे चारही वर्णांतील लोक परस्पर सहकार्याने सत्प्रवृत्तींचे पोषण करून या भूमीत गुण्यागोविंदाने सहस्रो वर्षे रहात होते.
८. आक्रमकांच्या जोडीला भारतात ऋषिमुनी, पराक्रमी राजे आणि राष्ट्रवीरही भूमीत झालेले असणे
या प्रदीर्घ कालखंडात भारत देशावर अनेकदा आक्रमणे झाली; पण त्या सर्वांना आम्ही पुरून उरलो. शक, हूण, बार्बर, तार्तर, मंगोल इत्यादी आक्रमणकर्ते टोळधाडींसारखे आले, गेले किंवा संपले. जग जिंकण्याचा हव्यास धरणारा सिकंदर येथील कलंदरांना पाहून मागे सरला. शुक, विश्वामित्र, नारद, गौतम, भरद्वाज आणि अत्री यांसारखे महातपस्वी ऋषिमुनी या भूमीत झाले. भगीरथ, रघु, राम, भरत आणि दुष्यंत यांसारखे प्राचीन अनेक पराक्रमी राजे येथे झाले. कालिदास, भवभूती, माघ, भास, भर्तृहरी, व्यास आणि वाल्मीकि यांसारखे असंख्य अविस्मरणीय कवी येथे होऊन गेले. श्रीराम, श्रीकृष्ण, युधिष्ठिर, चंद्रगुप्त मौर्य, समुद्रगुप्त इत्यादी अनेक शूर राष्ट्रवीर इथे झाले.
९. सिंध प्रांतातील महाभयंकर आक्रमण !
९ अ. सशस्त्र लोकांनी मंदिरे तोडणे आणि स्त्रियांवर अत्याचार करणे : सहस्रो वर्षे ज्या भूमीकडे वाकड्या नजरेने कुणी पाहू शकले नव्हते, त्या भूमीवर ख्रिस्ताब्द ७११ मध्ये सिंध प्रांतात जे आक्रमण झाले, ते महाभयंकर होते. त्या वेळी दाहीर राजा सिंध देशाचा अधिपती होता. राजा मारला गेला. त्यानंतर राणीने जोहार (देह अग्नीसमर्पण) केला. राजवाडा उद्ध्वस्त झाला. येणारे लोक आमच्यापेक्षा शूर होते, असे नाही, त्यांची शस्त्रे आमच्यापेक्षा श्रेष्ठ असतीलही कदाचित्; पण त्यांनी जी दहशत निर्माण केली, तिला तोड नाही. सहस्रावधी सशस्त्र लोक गावागावांतून शिरले. पूर्वी युद्धे रणांगणावर होत. सशस्त्र लोक सशस्त्रांशी लढत. या आक्रमक, क्रूर, नृशंस लोकांनी स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांना रहात्या घरात सपासप कापून काढले. मंदिरे तोडली. मूर्ती फोडल्या. वेदशाळा उद्ध्वस्त केल्या. तरुण स्त्रियांवर बलात्कार केले. महाभीषण अत्याचार केले.
९ आ. हिंदुद्वेषी यवनांचा भारतभूमीत प्रवेश ! : माणूस इतका क्रूर असू शकतो, हे भारतीय संस्कृतीला ठाऊक नव्हते. या राक्षसी आक्रमणाने संपूर्ण समाज भयकंपित झाला. आक्रमकांना सारे रान मोकळे मिळाले. त्यातच बौद्ध मताच्या अहिंसा विचाराचा अतिरेक झाल्याने सैन्यसुद्धा युद्ध करण्यात कच खाऊ लागले. सिंध पराभूत झाले. रक्तपिपासू नरराक्षसांचा नंगानाच रक्तबंबाळ भूमीवर थयथयाट करत होता. भारताच्या पश्चिम क्षितिजावर अमंगल हिंदुद्वेषी यवनांचा अशा प्रकारे प्रवेश झाला. आमचे सगुणच आमचे दुर्गण ठरले. तेव्हा आवश्यकता होती चंद्रगुप्त मौर्य आणि त्याचे महान् राजनीतीनिपुण गुरु चाणक्य यांची !
९ इ. राजाच्या २ मुलींनी खलिफाचे मन जिंकणे आणि सिंधच्या महंमद बिन कासीमच्या सरदारांना पत्र पाठवणे : अखेर दाहीरचे हिंदु राज्य नष्ट झाले. त्याच्या २ तरुण मुली सूर्यदेवी आणि परिमलादेवी बगदाद येथे खलिफाकडे भेट म्हणून पाठवण्यात आल्या. परस्त्रीला माता मानणारी संस्कृती कुठे आणि जे त्यांच्या मुलींना आपल्या धर्मगुरूंकडे शय्यासोबतीसाठी पाठवणारी मानवजातीला कलंक आणणारी विकृती कुठे ? पण या दोघी मुली मोठ्या धाडसी होत्या. त्यांनी खलिफाचा विश्वास प्राप्त करून घेतला. त्यांचे मन जिंकून घेतले. पराधीन झालेल्या बिचार्या अशा त्या तरुणी शरिरांना भ्रष्ट होण्यापासून वाचवू शकत नव्हत्या; पण त्यांनी काय केले पहा ! खलिफाच्या स्वाक्षरी शिक्क्यानिशी सिंधच्या महंमद बिन कासीमच्या सरदारांना पत्र पाठवले. त्या पत्रात ‘महंमदाला चामड्याच्या पोत्यात घालून ते पोते शिवून इकडे पाठवा’, अशी आज्ञा दिली.
९ ई. अनन्वित अत्याचार करणार्या राक्षसाचा प्रतिशोध घेण्याविषयी अभिमान वाटणे : खलिफाची आज्ञा ! त्या सरदारांनी आज्ञेबरहुकूम महंमदाला चामड्याच्या पोत्यात जिवंत गाडला. पोते शिवले आणि जहाजावरून बगदादला पाठवून दिले . १०-१२ दिवसांनी जेव्हा जहाज बगदादला पोचले, तेव्हा महंमद बिन कासीमच्या प्रेतात अळ्या झाल्या होत्या. त्यातून भयानक दुर्गंध येत होता. तेव्हा शूर मुलींनी सांगितले, ‘‘आम्ही तुमच्या स्वाक्षरीने पत्र पाठवले होते. आमच्या देशात अनन्वित अत्याचार करणार्या या राक्षसाचा आम्ही प्रतिशोध घेतला आहे. आम्हाला त्याविषयी अभिमान वाटतो. आम्ही राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे. याचे परिणाम भोगायला आम्ही सिद्ध आहोत.’’ (क्रमशः)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/808069.html