अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनासाठी व्यापारी बंधूंकडून अर्पण घेतांना मिळालेला भावपूर्ण प्रतिसाद !

‘हिंदु जनजागृती समितीने फोंडा, गोवा येथील ‘श्री रामनाथ देवस्थान’ येथे ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित केले होते. त्यानिमित्त गुरुकृपेने ‘गोव्यात प्रसार करणे आणि अर्पण घेणे’ या सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी समाजातील व्यापारी बंधूंकडून मिळालेला भावपूर्ण आणि सकारात्मक प्रतिसाद पुढे दिला आहे.

श्रीमती रेखा राघवेंद्र माणगावकर

१. श्री. अरविंद बिष्णोई (‘बजरंग स्टील’चे मालक)

१ अ. ‘गुरुसेवेसाठी द्यायच्या सर्व वस्तू चांगल्याच असल्या पाहिजेत’, या भावाने सर्व वस्तू पडताळून देणारे ‘बजरंग स्टील’चे मालक श्री. अरविंद बिष्णोई ! : प्रथम आम्ही (मी आणि सहसाधक श्री. नागेश बिराजदार) अर्पण मिळवण्याच्या सेवेसाठी ‘बजरंग स्टील’चे मालक श्री. अरविंद बिष्णोई यांच्याकडे गेलो आणि त्यांना विचारले, ‘‘स्नानगृहासाठी लागणार्‍या १० बालद्या, केर भरण्यासाठी एक डझन सुपल्या आणि एक डझन मग (स्नान करण्यासाठी वापरायचे मग) अर्पण स्वरूपात मिळू शकतील का ?’’ तेव्हा त्यांनी लगेचच होकार दिला. त्यांच्या मनात ‘या सर्व वस्तू गुरुसेवेसाठी देत आहोत, तर त्या चांगल्याच असल्या पाहिजेत’, असा भाव होता. त्यामुळे या वस्तू देतांना ते प्रत्येक वस्तू पडताळून देत होते. ‘बालद्या व्यवस्थित आहेत ना ?’, हे पहाण्यासाठी त्यांनी प्रत्येक बालदीत पाणी घालून ती पडताळून पाहिली. त्यांचा हा भाव बघून आमचाही भाव जागृत झाला.

२. श्री. अनिल राजपुरोहित (‘बालाजी ऑटोमोबाईल्स’चे मालक)

श्री. अनिल राजपुरोहित यांचे ‘बालाजी ऑटोमोबाईल्स’चे दुकान आहे. आम्ही त्यांच्याकडे गेलो, तेव्हा ते बाहेर जायला निघाले होते; पण आम्हाला बघून ते त्यांच्या वाहनातून खाली उतरले आणि त्यांनी हात जोडून आम्हाला विचारले, ‘‘मी काय सेवा करू शकतो ?’’ त्यांची ती नमस्काराची मुद्रा बघून त्यांच्यामध्ये मारुतिरायांसारखा दास्यभाव जाणवत होता. त्यांच्याकडे बघूनच आमचा कृतज्ञताभाव जागृत झाला.

आम्ही काही वस्तूंची नावे सांगून त्यांना विचारले, ‘‘या वस्तू अर्पण स्वरूपात मिळू शकतात का ?’’ तेव्हा त्यांच्या दुकानात त्या वस्तू उपलब्ध नव्हत्या; पण त्यांनी आम्हाला त्या वस्तू दुसर्‍या दुकानातून घेऊन दिल्या.

३. श्रीहरि वैष्णव (‘मारुति मेटल्स’चे मालक)

त्यानंतर आम्ही ‘मारुति मेटल्स’चे मालक श्रीहरि वैष्णव यांच्याकडे गेलो. आम्ही त्यांना विचारले, ‘‘स्नानगृहासाठी लागणारे साहित्य अर्पण मिळू शकेल का ?’’ त्यांनी ‘साहित्य गुरुचरणी अर्पण द्यायचे आहे’, या भावाने दुकानातील उत्तमातील उत्तम आणि चांगल्या प्रतीचे साहित्य लगेच काढून दिले. त्यानंतर ‘गुरुकार्यात सगळ्यांना अर्पण करण्याची संधी मिळायला हवी’, यासाठी त्यांनी त्यांच्या ओळखीच्या २५ व्यापार्‍यांची नावे, पत्ते आणि भ्रमणभाष क्रमांक आम्हाला दिले. काही ठिकाणी त्यांनी स्वतःच भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘सनातन संस्थे’चे साधक येतील, त्यांना हव्या त्या वस्तू द्या.’’ त्यामुळे त्यांच्यापैकी काही जणांना आम्ही संपर्क केल्यावर त्यांनी लगेचच अर्पण दिले. ‘गुरुदेवच आम्हाला या सेवेच्या निमित्ताने भाव असणार्‍या व्यक्तींपर्यंत घेऊन जात होते’, असे मला वाटले.

४. ‘पवन जनरल स्टोअर्स’चे मालक

आम्ही ‘पवन जनरल स्टोअर्स’च्या मालकांकडे गेलो आणि त्यांना ‘१० किलो मटार (Frozen peas) हवे आहेत’, असे सांगितले. तेव्हा त्यांच्या दुकानात मटार उपलब्ध नव्हते. त्यांनी लगेच दुसर्‍या दुकानदाराला भ्रमणभाष करून आम्हाला त्यांच्याकडून ५ किलो मटार मिळवून दिले. हे करतांना ‘गुरुसेवेची संधी मिळाली’, याचा त्यांना आनंद होत होता.

५. श्री. मांगीलाल देवासे

आम्हाला अजून ५ किलो मटार हवे होते; म्हणून आम्ही दुसर्‍या दुकानात गेलो. तेथील दुकान मालक श्री. मांगीलाल देवासे यांनी चार मोठे प्लास्टिक टब आणि ५ किलो मटार अर्पण केले. त्यांनीही आम्हाला ‘गुरुसेवा करण्याची संधी मिळाली’; म्हणून विशेष आनंद झाल्याचे सांगितले.

तेव्हा ओल्या मटारांचे मूल्य २५० रुपये प्रती किलो होते; पण दोघाही अर्पणदात्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आम्हाला ५ – ५ किलो मटार लगेचच अर्पण दिले. गुरुकृपेने आम्हाला या व्यक्तींपर्यंत पोचता आल्यामुळे हे सर्व अनुभवता आले.

‘गुरुदेवांनी आम्हाला ही सेवा देऊन भरभरून आनंद दिला’; म्हणून आम्हाला कृतज्ञता वाटत होती.

६. प्रार्थना

‘हे गुरुमाऊली, ‘गुरुतत्त्व कसे कार्यरत असते ?’, हेही आम्हाला या सेवेतून अनुभवता आले. आम्हाला या सर्व अर्पणदात्या जिवांना आपल्या चरणी आणण्याची शक्ती द्या. आम्हाला त्यांना साधना सांगता येऊ दे आणि ते साधनारत होऊ देत’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्रीमती रेखा राघवेंद्र माणगावकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक