सर्वांच्या संघटित शक्तीमुळे श्रीराममंदिराची स्थापना झाली असून रामराज्याची पहाट होत असल्याचे जाणवणे !
१. ‘अयोध्या येथे श्रीराममंदिराची उभारणी’, हे संघटित शक्तीचे उत्तम उदाहरण !
‘सङ्घे शक्तिः कलौ युगे ।’ अर्थ : कलियुगात संघटितपणातच सामर्थ्य असते. अयोध्या येथे श्रीराममंदिर झाले असल्याने हा श्लोक सत्यात उतरतांना आपण प्रत्यक्ष पहात आहोत. ‘सहस्रो रामभक्तांनी केलेले प्राणांचे बलीदान, असंख्य कारसेवकांनी केलेला तन-मन यांचा त्याग, अर्पणदात्यांनी सढळ हस्ते दिलेले अर्पण, अधिवक्ता, पुरातत्व विभागाचे अधिकारी, न्यायाधीश, एकनिष्ठ राजकारणी, अनेक संप्रदाय, भक्तगण आणि धर्माभिमानी या सर्वांचे अविश्वसनीय, अविरत अन् निस्वार्थी प्रयत्न, तसेच साधक आणि संत यांचे योगदान’ यांमुळे राममंदिर उभारणे शक्य झाले आहे. या शुभ कार्यात सर्वांचा एकत्रित सहभाग असल्यामुळे त्याचे श्रेय कुणा एकट्याला घेता येणार नाही. त्यामुळे हे खर्या अर्थाने संघटित शक्तीचे उदाहरण आहे. याचे श्रेय कुणाला द्यायचेच झाले, तर ते श्रीरामालाच द्यावे लागेल; कारण त्यानेच हे मंदिर उभारण्यासाठी सर्वांना संघटित केले.
२. कालचक्राला कुणीही थांबवू शकत नाही, तद्वतच रामराज्याची स्थापना होण्याला कुणीही थांबवू शकत नाही !
श्रीराममंदिराची स्थापना झाल्यामुळे भारतभर हिंदुत्वाची लाट उसळणार आहे. लोकांची सनातन धर्मावरील श्रद्धा आणि अभिमान वाढणार आहे, तसेच लोकांमधील रामराज्य, म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची इच्छा आणि दृढनिश्चयही वृद्धींगत होणार आहे. हे सर्व सत्यात उतरत असल्याचे आता दिसू लागले आहे. ‘सनातन धर्मासाठी आपण एकत्रित आलो, तर सर्वकाही शक्य आहे’, याचा हा पुरावा आहे. केवळ राममंदिरच नाही, तर अन्य धार्मिक उद्दिष्टेही आता पूर्णत्वाला जातील.
खरेतर या सर्व गोष्टींना होणारा विरोध अर्थहीन आहे. रामराज्याची स्थापना होण्याला कुणीही थांबवू शकत नाही. सर्वकाही काळाच्या अधीन आहे. कालचक्राला कुणीही थांबवू शकत नाही आणि कालचक्रानुसार आता रामराज्य येण्याची वेळ आली आहे.
३. रामराज्याचा सूर्याेदय होत असल्याने त्यासाठी कृतज्ञताभावाने सर्वस्वाचा त्याग करण्याचा संकल्प करूया !
दैवी इतिहासाच्या या महत्त्वाच्या प्रसंगाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्हाला धन्य झाल्याप्रमाणे वाटते. ‘रामराज्याची पहाट होण्यासाठी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या माध्यमातून प्रभु श्रीराम पृथ्वीवर अवतरले, तसेच आम्हाला ते पहाण्याचे सौभाग्य प्राप्त झाले’, याबद्दल आम्ही श्रीरामाच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.
रामराज्याचा सूर्याेदय होत आहे ! चला तर आपण त्यात सामावून जाऊया, त्याचा आनंद लुटूया, कृतज्ञ राहूया आणि त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याचा संकल्प करूया !’
– एक संत (१९.१.२०२४)