परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले नागपूर येथील श्री. रामनारायण मिश्रा (वय ७२ वर्षे) !
‘नागपूर येथील हिंदुत्वनिष्ठ आणि ‘अखिल भारतीय शरयूपारीण ब्राह्मण संस्थे’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री. रामनारायण मिश्रा (वय ७२ वर्षे) हे त्यांच्या पत्नीसह मागील २ वर्षांपासून रामनाथी (गोवा) येथे होणार्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला येतात. ते एका मंदिराचे विश्वस्त आहेत. मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. शिकण्याची वृत्ती
आम्ही श्री. मिश्रा यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा ते म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समिती समाजाला जे धर्मशिक्षण देत आहे, ते मंदिर विश्वस्तांनी घेतले पाहिजे; कारण आम्हालाही हिंदूंच्या परंपरा आणि धर्मशास्त्र ठाऊक नाही. जर आपल्यालाच ते ठाऊक नसेल, तर मंदिरात येणार्या भक्तांना आपण काय सांगणार ?’’
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव
अ. वर्ष २०२२ मध्ये ते अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनासाठी प्रथमच आले होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पहाताच त्यांनी साष्टांग नमस्कार केला होता.
आ. मागील वर्षी ते पत्नीसह अमरनाथ येथील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घ्यायला गेले होते. ‘तिथे पुष्कळ थंडी असते’, हे त्यांना ठाऊक होते. त्यांच्या पत्नीला दम्याचा त्रास आहे. श्री. मिश्रा यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र समवेत ठेवले होते. यात्रेहून परत आल्यावर मी त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा ते म्हणाले, ‘‘माझे गुरु माझ्या समवेत होते. त्यामुळे मला कोणताही त्रास झाला नाही. प्रत्यक्षात तेथे पुष्कळ बर्फ पडत होता. प्रशासनाने यात्रेकरूंना तेथे दर्शनासाठी जाण्यास मनाई केली होती, तरीही आम्ही दोघे गुरुदेवांना प्रार्थना करत गेलो आणि आम्हाला दर्शन होऊ शकले.’’
इ. सद्गुरु स्वाती खाडये आणि मी ४ मंदिर विश्वस्तांना भेटायला गेलो होतो. तेथील बैठकीत श्री. मिश्रा यांनी गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि ते म्हणाले, ‘‘केवळ आपले गुरुदेवच हिंदु राष्ट्र स्थापन करू शकतात.’’
– (पू.) अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे संत, वय ७४ वर्षे), अमरावती (४.६.२०२४)