संस्कृत भाषेचे संवर्धन आणि त्यासाठी उपाययोजना !
१. हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेतील प्रभावी माध्यम संस्कृत भाषा !
हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आपल्याला विविध माध्यमे साहाय्यभूत होणार आहेत. अशाच काही माध्यमातील एक प्रभावी माध्यम, म्हणजे आपली भाषा होय. हिंदु राष्ट्र पुनर्स्थापनेचे ‘धर्मशिक्षण’, ‘धर्मरक्षण’ आणि ‘हिंदूसंघटन’, असे ३ स्तंभ आहेत. या ३ स्तंभांना आपली भाषा निश्चितपणे साहाय्यभूत होऊ शकते. ती अनेक भाषांनी नटलेली आणि सजलेली देव भाषा, म्हणजेच संस्कृत भाषा होय. भाषेनुसार प्रांतरचना झाल्यानंतर सध्याच्या परिस्थितीत सर्वांना मान्य असलेली केवळ एकच भाषा आहे आणि ती भारतीय भाषांची जननी संस्कृत होय. ही देववाणी सर्वांना तिच्या हृदयात सामावून घेऊ शकते. ती आपल्याला केवळ सांभाळेल असे नाही, तर हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेच्या कार्यातील तिन्ही सूत्रांना बलवानही करील. प्रत्येक सूत्राविषयी या भाषेच्या योगदानाचे महत्त्व समजून घेऊ.
२. संस्कृत भाषेच्या योगदानाचे महत्त्व
अ. धर्मशिक्षण : आपल्या संस्कृतीमध्ये संस्कार, वागण्याच्या पद्धती आणि व्यवहार यांविषयी जे मार्गदर्शन उपलब्ध आहे, त्याचे मूळ आपले वेद, उपनिषद, धर्मग्रंथ आणि गीता यांमध्ये आहे. आपले सर्व धर्मग्रंथ संस्कृत भाषेतच आहेत. त्यामुळे आपल्याला धर्मशिक्षण द्यायचे असेल किंवा त्याविषयी जाणून घ्यायचे असेल, तर संस्कृत भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
आ. धर्मरक्षण : आपण जोपर्यंत स्वत: आपल्या धर्माचे स्वरूप समजून घेणार नाही, तोपर्यंत आपण धर्माचे रक्षण कसे करू शकणार ? त्यामुळे धर्माचे रक्षण करण्यासाठी संस्कृत भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यापुढे जाऊन आपल्या धर्मस्थळांवर निधर्मियांचे आक्रमण होत आहे. ते कायदेशीर आणि घटनात्मक मार्गाने आपल्याला रहित करायचे आहे. यांसाठी आपल्या अधिवक्त्यांना हिंदु धर्मग्रंथांचाच आधार आहे. याचे महत्त्व आपण अयोध्या आणि ज्ञानवापी या प्रकरणांमध्ये पाहिलेच आहे. आपले
पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि जगद्गुरु रामभद्राचार्य महाराज यांनी रामायण अन् इतर धर्मग्रंथ यांच्या आधारावरच अयोध्या ही श्रीरामजन्मभूमी असल्याचे सिद्ध केले आहे.
इ. हिंदूसंघटन : हिंदु जनतेला एकत्रित करणे, हे सर्वांत महत्त्वाचे सूत्र आहे. विविध परंपरांनी नटलेली आणि सप्त नद्यांपासून सिंधुसागरापर्यंत पसरलेली आपली भारतभूमी आहे. आपल्या संस्कृत भाषेने या देवभूमीत असणार्या विविध परंपरांना सूत्ररूपाने एका माळेत गुंफले आहे. आपला कोणताही प्रांत आणि संप्रदाय असेल, आपण जगाच्या पाठीवर कोणत्याही शहरात रहात असला, तरीही आपल्या जीवनात प्रत्येक ठिकाणी संस्कृत भाषा भिनलेली आहे. आपल्या रक्तातून संस्कृत भाषा वहात आहे.
३. दैनंदिन जीवनात संस्कृतचे महत्त्व
आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्यावर जे संस्कार केले जातात, त्याचा मूळ आधार संस्कृत ग्रंथातील दिव्य मंत्र हेच आहेत. ७ जन्मापर्यंत ज्या बंधनात रहाण्याची हिंदु संस्कृती आहे, या ७ जन्मांत जी वचने निभवायची असतात, ती संस्कृत भाषेतच आहेत. आपल्या नेहमीच्या जीवनात सकाळपासून रात्रीपर्यंत आपण जे आचरण करतो, तेही संस्कृतमय आहे. सकाळी उठल्याबरोबर आपण ‘कराग्रे वसते लक्ष्मी’ म्हणतो, तर ‘या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता’ (अर्थ : जी देवी सर्व प्राणिमात्रांमध्ये निद्रारूपाने विराजमान आहे.) असे म्हणून आपण रात्री झोपतो. मॅकोलेने भारतीय शिक्षणपद्धतीतून संस्कृत वेगळे केले असले, तरीही आपण आपल्या जीवनात अजूनही संस्कृत भाषेचा अभिन्नपणे अंगीकार केलेला आहे.
४. संस्कृत भाषेच्या व्यावहारिक उपयुक्ततेला विज्ञानाची मान्यता
आपण केवळ भावनाशील दृष्टीने संस्कृत भाषा वापराचा आग्रह करत नाही. विज्ञानानेही संस्कृत भाषेच्या व्यावहारिक उपयुक्ततेला मान्यता दिली आहे. ‘आजच्या संगणक युगातही संगणकासाठी उपयुक्त असलेली सर्वाेत्तम भाषा ही केवळ संस्कृतच आहे’, असे सध्या विश्वविद्यालयात चालू असलेले शोधकार्य सांगते. ‘आयईईई एक्सप्लोर(IEEE Xplore)’ ही एक प्रतिष्ठित ‘डिजिटल लायब्ररी’आहे. तेथे अतिशय योग्य पद्धतीने शोधकार्य केले जाते आणि त्याचेच प्रकाशन केले जाते. या ‘आयईईई एक्सप्लोर’ने ‘इज संस्कृत द मोस्ट सुटेबल लँग्वेज फॉर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग ?’ (नैसर्गिक भाषा प्रक्रियेसाठी संस्कृत भाषा सर्वाधिक सुयोग्य भाषा आहे का ?) हा प्रबंध प्रसिद्ध केला आहे आणि त्याला अनेक महाविद्यालयांनी मान्यता दिली आहे.
यात म्हटले आहे, ‘संस्कृत भाषा ही संगणकीय प्रक्रियेसाठी अतिशय चांगली आणि योग्य भाषा आहे.’ त्याच्याच बाजूला ‘ऑक्सफर्ड’ विद्यापिठाने प्रसिद्ध केलेला लेख आहे. याविषयी आपण ‘गूगल’वर माहिती मिळवू शकतो. या सर्वांच्या मते आपली संस्कृत भाषा वैज्ञानिक दृष्टीने अनुकूल असून सध्या वापरल्या जाणार्या भाषांतील सर्वांत श्रेष्ठ अशी ही भाषा आहे. उदाहरण द्यायचे झाले, तर इंग्रजीत आपण म्हणतो, ‘रामा गोज टू टेंपल’ या वाक्यातील शब्दांची अदलाबदल केली, तर ‘टेंपल गोज टू रामा’, अर्थ पालटतो. ‘गोज टेंपल टू रामा’ परत अर्थ पालटला; परंतु मी संस्कृतमध्ये म्हटले, ‘रामः मन्दिरं गच्छति ।’ म्हणजे ‘राम मंदिरात जातो’ आणि मी शब्दाची अदलाबदल करून म्हटले की, ‘गच्छति रामः मन्दिरम् ।’, म्हणजे ‘राम मंदिरात जातो’ किंवा ‘मन्दिरं रामः गच्छति ।’ म्हणजे ‘राम मंदिरात जातो’, तरी या सर्व वाक्यांचा अर्थ एकच होतो. ही संस्कृत भाषेची महानता आहे. आपल्याकडे साधने आहेत; परंतु त्याचा वापर कसा करायचा, याचे ज्ञान नसल्याने आपण उंच उडी मारण्यात अयशस्वी झालो आहोत.
५. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचे भांडार असलेले हिंदूंचे वेद
आपल्याकडील वेद हे ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी भरलले भांडार आहेत, तरीही आपण पाश्चिमात्य देशांना तंत्रज्ञानासाठी साहाय्य मागतो. आपण एखादा प्रयोग करून सृष्टीची निर्मिती कशी झाली ? याविषयी जाणून घेणार असतो; परंतु ‘सहस्रो वर्षांपूर्वी आपल्या ऋग्वेदात सृष्टीची निर्मिती कशी झाली ?’, याविषयी वर्णन केले आहे. आपले पुरुषसूक्त याचा पुरावा आहे.
‘अग्निसूक्ता’त अग्निदेवतेच्या माध्यमातून दिव्य शस्त्रे, अस्त्रे आणि भेय प्राप्त केले जाऊ शकत असलेल्या मताला मान्यता दिली आहे. ‘ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् । होतारं रत्नधातमम् ।’, हा अग्नीसूक्तातील पहिला श्लोक आहे. अथर्ववेदात ‘कायाकल्प’विषयी उल्लेख आहे. ‘कायाकल्प’, म्हणजे ‘लिंग पालट.’ आज ‘लिंग पालटा’विषयी जे बोलले जाते, ते सहस्रो वर्षांपूर्वी सुश्रुत आणि वाग्भट्ट यांनी त्यांच्या अथर्ववेदात लिहून ठेवले आहे. ‘चरक’ आणि ‘सुश्रुत’ संहिता यांत ‘कुंभज’, म्हणजेच ‘टेस्ट ट्यूब बेबी’ (प्रयोगशाळेच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण निर्माण करणे) याचा उल्लेख आढळतो आणि मी याविषयी पुरावा देऊ शकतो.
६. शिक्षण आणि तंत्रज्ञान यांची केंद्रे असलेली हिंदूंची प्राचीन मंदिरे
अ. आपली प्राचीन मंदिरे केवळ प्रार्थनास्थळ किंवा धर्मस्थळे नाहीत, तर शिक्षण आणि तंत्रज्ञान यांची केंद्रे आहेत. माझे मित्र श्री. प्रवीण मोहन यांच्याकडून मला प्राचीन मंदिरांविषयी काही ‘स्लाईड’ मिळाल्या आहेत. प्राचीन मंदिरांत लपलेल्या तंत्रज्ञानाविषयी माहिती घेण्याचे महत्त्वाचे कार्य ते करत आहेत. आपण ‘गम बूट’विषयी ‘गूगल’वर माहिती घेतली, तर त्यात त्याचे नाव ‘वेलिंग्टन बूट’ असे सांगितले जाते. याचे कारण वेलिंग्टन नावाच्या व्यक्तीने याचा १०० वर्षांपूर्वी शोध लावला होता.
आ. आजपासून १ सहस्र २०० वर्षांपूर्वी बेंगळुरू येथील होयसालेश्वर मंदिराची स्थापना झाली होती. या मंदिरातील मूर्तीकडे बारकाईने पाहिले, तर आपल्या लक्षात येते की, याचा आकार ‘गम बूट’ प्रमाणे आहे. त्याला ‘विकिपीडिया’ हे ‘१०० वर्षांपूर्वी ‘वेलिंग्टन’ नावाच्या व्यक्तीने शोधले’, असे सांगत आहे. प्राचीन काळात आपले ऋषिमुनी खडावा घालत असल्याचे आपल्याला ठाऊक आहे. ‘विकिपीडिया’नुसार त्याचा शोध ८०० वर्षांपूर्वी चीन येथे लागला आहे.
इ. वर्ष ११३० मध्ये निर्माण झालेले अंगकोरवाट मंदिर आहे. २५० एकरमध्ये असलेले हे भव्य मंदिर कंबोडिया येथील असून त्याची दुर्दशा होत आहे. आपण मंदिरातील काही मूर्तींचे निरीक्षण केले, तर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात. १ सहस्र २०० वर्षांपूर्वीच्या या मूर्तीची ‘कार्बन डेटिंग’ केल्याचे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे.
७. ‘गूगल’कडून हिंदु संस्कृतीविषयी दिशाभूल करणारी माहिती प्रसारित
‘गूगल’च्या माध्यमातून हिंदु संस्कृतीविषयी आपल्याला चुकीची माहिती देऊन मूर्ख बनवले जात आहे. हे सर्व आपल्याकडून चोरी करून प्रसारित केले जाते. श्री. प्रवीण मोहन ज्या वेळी ‘यू ट्यूब’ वर चित्रफीत प्रसारित करतात, तेव्हा ती नष्ट केली जाते. हे एक फार मोठे षड्यंत्र आहे.
अ. १ सहस्र ८०० वर्षांपूर्वी लक्ष्मी व्यंकटेश मंदिर बांधले गेले आहे. त्यात काही मूर्ती आहेत. एका मूर्तीमध्ये बंदूक दिसत आहे. ‘बंदूक युरोपीय’ किंवा ‘ईस्ट इंडिया कंपनी’चे लोक इकडे घेऊन आले होते. या बंदुकांमुळे आपण प्लासीची लढाई हरलो’, असे आपला इतिहास सांगतो. तसेच ‘याचा १२ व्या शतकात शोध लागला’, असे आपला ‘विकिपीडिया’ सांगतो. १ सहस्र ८०० वर्षांपूर्वीची ही मूर्ती आणि बंदुक स्वच्छ करण्याची पद्धत यांत समानता असलेली आपल्याला दिसते.
आ. १ सहस्र ३०० वर्षांपूर्वीची एक मूर्ती आहे. एक डोळा बंद केलेली ही मूर्ती आहे. ही व्यक्ती घोड्यावर बसलेल्या व्यक्तीवर नेम धरत आहे. १ सहस्र ३०० वर्षांपूर्वीही भारतात हे तंत्रज्ञान ज्ञात होते.
इ. एका चित्रात एक व्यक्ती उडण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तवात याविषयी अनेक प्रयोग झाले आहेत. विकिपीडियानुसार वर्ष १९१७ मध्ये पहिला ‘फ्लाईंग सूट’ सिद्ध केला गेला. १ सहस्र ४०० वर्षांपूर्वीची भगवान विष्णूची एक मूर्ती जवळून पाहिली, तर लक्षात येते की, सूक्ष्मशक्तीने भगवान विष्णूचे वाहन गरुड आहे. आपण मंदिरात जाऊन केवळ हात जोडून नमस्कार करतो; परंतु आपण मंदिरांकडे ‘विज्ञानाचे केंद्र’ म्हणून पाहिले पाहिजे. आपली जितकी धार्मिक आणि प्राचीन स्थळे आहेत, ती केवळ धार्मिक प्रार्थनास्थळे नाहीत, तर विज्ञान अन् तंत्रज्ञान यांची केंद्रे आहेत.
८. संस्कृत भाषेचे संवर्धन करण्याविषयीची सूत्रे
अ. सर्वप्रथम संस्कृत भाषेला आपल्याला आपली व्यावहारिक भाषा बनवले पाहिजे.
आ. आपण संकल्प केला पाहिजे की, यानंतर हिंदु कुटुंबात जन्मलेल्या मुलाची मातृभाषा ‘संस्कृत’ असेल.
इ. आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयात न घालता त्यांच्या मातृभाषेच्या शाळेत घातले पाहिजे.
ई. आजच्या शिक्षणपद्धतीला आपण गुरुकुल पद्धतीमध्ये पालटले पाहिजे. त्यासाठी ज्याला संस्कृत शिकण्याची इच्छा आहे, त्याला आम्ही संभाषण वर्गाच्या माध्यमातून केवळ १० दिवसांत संस्कृत शिकवू शकतो.’
– डॉ. अजित चौधरी, प्राचार्य, यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक महाविद्यालय, बीड, महाराष्ट्र.
डॉ. अजित चौधरी यांचा परिचय
डॉ. अजित चौधरी हे बीड जिल्ह्यातील ‘यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक महाविद्यालया’चे प्राचार्य आहेत. महान संत प.पू. ढेकणे महाराज यांच्याकडून त्यांनी ‘शक्तिपात योगा’ची दीक्षा घेतली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नरत असतात. ते स्वत: धर्माचरण करतात. त्यांनी त्यांच्या महाविद्यालयात राष्ट्रगीत न म्हणणार्या विद्यार्थ्यांना ते म्हणण्याची सवय लावली आहे. यासमवेतच संस्कृत भाषेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी कर्नाटकातील मत्तुरू गावात (ज्या ठिकाणचे सर्व गावकरी संपूर्ण संस्कृत भाषा बोलतात.) जाऊन ५०० शिबिरांचे आयोजन केले होते.
हिंदु राष्ट्राची स्थापना नव्हे, तर पुनर्स्थापना म्हणा !
‘ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येईल, त्या त्या वेळी धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी अवतार घेईन’, असे वचन देणार्या भगवान श्रीकृष्ण योगेश्वर यांची लीला माझ्या अल्प बुद्धीला लक्षात येत नाही. आजपासून ४०० वर्षांपूर्वी याच योगेश्वर भगवान श्रीकृष्णाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपात अवतार घेऊन हिंदु राष्ट्राची स्थापना केली. ८० वर्षांपूर्वी ‘हिंदु राष्ट्राचे द्रष्टा’ म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि रा.स्व. संघाचे डॉ. हेडगेवार यांच्या रूपात हीच शक्ती कार्य करत होती अन् आज परत एकदा आपले हिंदुत्व अत्यंत संकटात असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पाच्या माध्यमातून हीच शक्ती आजही कार्यरत आहे. मी विचारपूर्वक हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेविषयी बोलत आहे; कारण भारत पूर्वीपासून हिंदु राष्ट्र होता आणि रहाणार आहे, असे मी समजतो.
– डॉ. अजित चौधरी