Russia Terror Attack : रशियात चर्च, ज्यू मंदिर आणि पोलीस चौकी यांवर आतंकवादी आक्रमण : ९ जण ठार
मॉस्को (रशिया) – रशियातील दागेस्तान प्रांतातील डर्बेंट शहरातील २ चर्च, १ सिनेगॉग (ज्यू मंदिर) आणि मखचकला शहरातील पोलीस चौकी यांवर आतंकवाद्यांनी जिहादी आक्रमण केले. यात १ पाद्री आणि ८ यांचा मृत्यू झाला, तर २५ पोलीस घायाळ झाले. या वेळी झालेल्या चकमकीत ६ आतंकवादीही ठार झाले, तर काही जण पळून गेले. आतंकवाद्यांनी या वेळी ६६ वर्षांच्या पाद्रयाचा शिरच्छेद केला. आतंकवाद्यांच्या आक्रमणानंतर चर्च आणि सिनेगॉग यांना आग लागली.
१. रशियातील वृत्तसंस्था ‘तास’च्या वृत्तानुसार आक्रमण करणारे आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटनेचे सदस्य होते. सध्या कोणत्याही आतंकवादी संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारलेले नाही. तसेच युक्रेनकडूनही याविषयी कोणते वक्तव्य करण्यात आलेले नाही.
२. दागेस्तानचे नेते अब्दुलखाकिम गदझियेव यांनी टेलिग्रामवर लिहिले की, हे आतंकवादी आक्रमण कोणत्या ना कोणत्या प्रकारे युक्रेन आणि नाटो देश यांच्या गुप्तचरांशी संबंधित आहे, यात शंका नाही.
३. रशियातील दागेस्तानमधील आक्रमण, हे या वर्षातील दुसरे मोठे आतंकवादी आक्रमण आहे. यापूर्वी मार्चमध्ये आतंकवादी आक्रमण झाले होते. त्यात १४३ जणांचा मृत्यू झाला होता. इस्लामिक स्टेट खुरासनने त्या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले होते.