नूतनीकरणासाठीच्या विलंब दंडाच्या विरोधात २५ जून या दिवशी शहरातील रिक्शा आणि टॅक्सी वाहतूक बंद !
कोल्हापूर – रिक्शा आणि टॅक्सी यांचे नूतनीकरण करतांना परिवहन विभागाकडून दैनंदिन ५० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. हा विलंब कर रहित करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी २५ जून या दिवशी शहरातील रिक्शा आणि टॅक्सी वाहतूक बंद रहाणार आहे. यात शहरातील सुमारे १६ सहस्र रिक्शा आणि टॅक्सी चालक सहभागी होणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा रिक्शा आणि टॅक्सी चालक समितीच्या वतीने राजू जाधव, चंद्रकांत भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या संदर्भात राजू जाधव म्हणाले, ‘‘या विलंब दंडामुळे दंडाची रक्कम २५ ते ३० सहस्र रुपये इतकी प्रचंड होते. अगोदरच रिक्शा व्यवसाय अडचणीत असून त्यांना प्रतिदिन नवनवीन संकटांचा सामना करावा लागत आहे. त्याला पाठबळ देण्याऐवजी हा व्यवसाय मोडीत निघण्याची भीती आहे. या संदर्भात मोर्चा, आंदोलन करूनही शासन निर्णय घेत नसल्याने बंद करावा लागत आहे. २४ जूनच्या रात्री ११.३० पासून २५ जूनला सायंकाळी ५ पर्यंत रिक्शा आणि टॅक्सी सेवा बंद रहाणार आहे. ’’