‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित असलेल्या हिंदुत्वनिष्ठांची साधकाला लक्षात आलेली वैशिष्ट्ये
१६.६.२०२३ ते २२.६.२०२३ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथे पार पडलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित असलेल्या हिंदुत्वनिष्ठांची सोलापूर येथील श्री. राजन बुणगे यांना लक्षात आलेली वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्री. किशोर गंगणे, पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष, तुळजापूर.
‘श्री. किशोर गंगणे त्यांच्या पत्नीसमवेत ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला ७ दिवस उपस्थित होते. वास्तविक ते व्यस्त असतांनाही महोत्सवाला सर्व दिवस उपस्थित राहिले.
१. शास्त्र समजून घेऊन नामजप केल्याने जीवनात पालट होणे, त्यामुळे इतरांनाही नामजप करण्यास सांगणे
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त संतांनी साधना आणि नामजप करण्याचे महत्त्व सांगितले. ते श्री. गंगणे यांच्या मनावर चांगले बिंबले. त्यांनी त्वरित नामजप करण्यास आरंभ केला. दोन मासांनंतर मी त्यांना नामजपाविषयी विचारल्यावर ते मला म्हणाले, ‘‘माझा नामजप पुष्कळ चांगला चालू आहे. माझ्यामध्ये पुष्कळ परिवर्तन झाले आहे. पूर्वी मला पुष्कळ राग यायचा आणि मी अपशब्द वापरायचो. ते आता बंद झाले असून मी शांत झालो आहे. यामुळे मी मंदिरामध्ये जाऊन तिथे बसलेल्या सगळ्यांना कुलदेवीचा नामजप करायला सांगतो.’’ वास्तविक पहाता ते देवीचे पुजारी असल्याने त्यांचा कर्मकांड करण्यावर भर होता. आता त्यांनी शास्त्र समजून घेऊन स्वतःच्या जीवनात पालट केला आहे. त्यांच्या पत्नीही नामजप करतात.
२. अंगामध्ये संचार झालेल्या एका स्त्रीने ‘श्री. गंगणे यांच्याकडून मोठे कार्य होणार आहे’, असे सांगणे
एकदा श्री. किशोर गंगणे तुळजापूर येथील श्री भवानीमातेचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. गाभार्यासमोर उभे असतांना समोर एका स्त्रीच्या अंगामध्ये संचार झाला होता. त्या स्त्रीने तिच्या हातातील झाडाची फांदी श्री. किशोर गंगणे यांच्या डोक्यावर ठेवली आणि म्हणाली, ‘‘तुमच्याकडून मोठे कार्य होणार ! ते सगळ्यांना लाभदायक ठरणार आहे.’’ तेव्हा त्यांचा भाव जागृत होऊन त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. त्याबद्दल त्यांना कृतज्ञता वाटली.
३. मंदिर रक्षणासाठी कार्य करणे
ते ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या समितीमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्यावर तुळजापूर मंदिरासंदर्भात मंदिर रक्षण करणे, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देणे आणि मंदिरातील प्रथा परंपरा जपणे इत्यादींचे दायित्व आहे. त्यांनी मंदिरातील भ्रष्टाचार थांबवण्याच्या संदर्भात पुढाकार घेऊन पुष्कळ मोठे कार्य उभारले आहे. मी त्यांना ‘गुरूंच्या कार्यात सहभागी झाल्याने देवीने त्यांना आशीर्वाद दिला’, असे सांगितल्यावर त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
अधिवक्ता महेश धांडे, बीड
१. नम्रपणा आणि धर्मकार्याची आवड असणे
‘बीड येथील अधिवक्ता महेश धांडे ३ दिवस ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित होते. त्यांना महोत्सव पुष्कळ आवडला. ‘हिंदु राष्ट्र केवळ हिंदु जनजागृती समिती आणू शकते’, असे त्यांनी अनेक वेळा सांगितले. ते बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे काही संघटनांचे दायित्व आहे, तरीही त्यांच्यामध्ये पुष्कळ नम्रता आहे.
२. धर्मसेवा करण्याची तळमळ असणे
श्री. हिरालाल तिवारी यांनी बीड येथे सायबर शाखेमध्ये गुन्हा नोंद करण्याविषयी अधिवक्ता धांडे यांना रात्री ११ वाजता भ्रमणभाषवरून माहिती दिली. अधिवक्ता धांडे यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांसमोर बसून निवेदन दिले आणि ४ दिवसांत प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) दाखल करून घेतला. त्यामध्ये त्यांनी स्वतःच्या व्यवसायापेक्षा सेवेस प्राधान्य दिले.’’
श्री. प्रसाद पंडित, प्रज्ञापुरी ज्ञान संस्था, अक्कलकोट.
१. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला पत्नीलाही बोलवून घेणे
‘श्री. प्रसाद पंडित यांचे ज्योतिष आणि प्राचीन वैदिक हिंदु धर्मानुसार प्रचार अन् प्रसार, तसेच वास्तूशास्त्राच्या दृष्टीने मोठे व्यापक कार्य आहे. त्यात व्यस्त असूनही ते ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला सातही दिवस उपस्थित होते. त्यांचा व्यवसाय ज्योतिषाचा असल्यामुळे त्या त्या तिथीला आणि त्या त्या वेळेला त्यांना सर्व कृती कराव्या लागतात. महोत्सवाच्या कालावधीत ते निवासाच्या ठिकाणी पहाटे उठून सर्व विधी पूर्ण करायचे आणि महोत्सवाला वेळेवर उपस्थित रहायचे. महोत्सवातील विषय आवडल्याने त्यांनी त्यांच्या पत्नीला २ दिवसांसाठी तातडीने बोलवून घेतले, जेणेकरून तिलाही मार्गदर्शन मिळेल आणि आपले कुटुंब साधना करू लागेल. यातून त्यांची तळमळ दिसून येते.
२. हिंदुत्वाचे कार्य करण्याची ओढ असल्यामुळे सनातन संस्थेच्या उपक्रमांना उपस्थित रहाणे
महोत्सवाहून आल्यानंतर ते सोलापूर आणि अक्कलकोट येथे होणार्या सनातनच्या प्रत्येक उपक्रमाला आवर्जून उपस्थित असतात. त्यांना साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमाला कर्नाटक येथून येण्यास बराच उशीर झाला. त्या वेळी कार्यक्रम संपला होता, तरीही ते साधकांना भेटण्यासाठी पत्नीसह सभागृहात आले होते. यातून त्यांची हिंदुत्वाचे कार्य करण्याची आणि साधकांना भेटण्याची ओढ दिसून येते.’
– श्री. राजन बुणगे, सोलापूर (८.१०.२०२३)