सौ. रश्मी विरनोडकर यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यावर अनुभवलेली अपार गुरुकृपा !

सौ. रश्मी विरनोडकर

१. ‘प्रारब्धभोग भोगून संपवावे लागतात’, हे सत्संगात शिकवल्याने कुटुंबियांकडून होणारा त्रास सहन करता येणे

‘मी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू झाल्यापासून म्हणजे वर्ष १९९८ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेस आरंभ केला. माझ्या अंधेरी येथील छोट्याशा खोलीत माझे मनोरुग्ण दीरही रहात असत. आम्ही त्यांना ९ – १० वर्षे सांभाळले. तेव्हा मला फार त्रास होत असल्याने ‘घर सोडून निघून जावे’, असे मला वाटायचे. ‘आपले प्रारब्ध भोगूनच संपवायचे असते’, असे मला सत्संगात शिकायला मिळाले. गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे मला प्रारब्ध भोगण्यास बळ मिळाले. काही कालावधीनंतर केवळ गुरुमाऊलींच्या कृपेमुळेच माझ्या दिरांची कोकणातील एका मनोरुग्णालयात व्यवस्था झाली.

२. गुरुकृपेने यजमानांची ‘अँजिओप्लास्टी’ विनामूल्य होणे

डिसेंबर २०१६ मध्ये यजमानांची प्रकृती बिघडली. आधुनिक वैद्यांनी तपासणीनंतर ‘अँजिओप्लास्टी’ (टीप १) करावी लागेल आणि त्यासाठी ४ लाख रुपये व्यय येईल’, असे सांगितले. तेव्हा ‘एवढे पैसे आणायचे कुठून ?’ हा आमच्यापुढे मोठा प्रश्न होता. मी गुरुमाऊलींना आर्ततेने प्रार्थना केली, ‘यातून तुम्हीच मार्ग दाखवा.’ तेव्हा यजमानांना त्या रुग्णालयातून दुसर्‍या रुग्णालयात नेण्याचे ठरले. तिथे शिधापत्रिका (रेशन कार्ड) आणि आधार कार्ड दिल्यावर शस्त्रकर्म विनामूल्य झाले अन् यजमान बरे झाले.

टीप १ : अँजिओप्लास्टी म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिनीतील अडथळा दूर करण्यासाठी केले जाणारे एक प्रकारचे शस्त्रकर्म.

३. यजमानांनी सेवेत साहाय्य करणे

यजमान मला ‘पंचांग पोचवणे, विशेषांकांचे वितरण करणे आणि साधकांकडे प्रसारसाहित्य पोचवणे’, अशा सेवांमध्ये साहाय्य करतात. ते मला सेवेला कधीच विरोध करत नाहीत.

४. साधिकेने केमोथेरेपीच्या वेळी भावजागृतीचे प्रयोग केल्यामुळे तिला त्रास न होणे

एप्रिल २०१८ मध्ये मला स्तनाचा कर्करोग झाला होता. कर्करोग दुसर्‍या टप्प्याला गेला होता. १५ वेळा ‘केमोथेरपी’ (टीप २)  आणि १५ ‘रेडिएशन्स’(टीप ३) घ्यावे लागले. नंतर २ वर्षे औषधोपचार चालू होते. केमोथेरेपीच्या वेळी मी भावजागृतीचे प्रयोग करायचे. ‘श्रीकृष्णाचे चैतन्य माझ्या शरिरात जात आहे आणि शरिरातील त्रासदायक शक्ती नष्ट होत आहे.’ केमाेथेरपीचे उपचार घेऊन घरी आल्यावर मी घरची सर्व कामे करायचे. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटायचे. तेव्हा मला काहीच त्रास जाणवायचा नाही. ती केवळ गुरुकृपाच होती.

टीप २ : ‘केमोथेरपी’ म्हणजे कर्करोगावरील औषध प्रणाली

टीप ३ : ‘रेडिएशन’म्हणजे कर्करोगावरील किरणोत्सर्ग उपचार पद्धत

५. गुरुमाऊलींच्या कृपेमुळे सेवा करता येणे

सध्या माझी प्रकृती मला साथ देत नाही. माझ्याकडे ग्रंथ, पंचांग अहवाल, दैनिक आणि साप्ताहिक नूतनीकरण, प्रचार आणि अर्पण इत्यादी सेवा आहेत. या सर्व सेवा केवळ गुरुमाऊलींच्या कृपेमुळेच माझ्याकडून होत आहेत. तेच मला बळ देतात आणि शक्ती पुरवतात.

६. पूर्वी एकदा मला प.पू. गुरुदेवांचा सत्संग लाभला होता. त्यांना भेटून मला पुष्कळ आनंद झाला आणि माझ्या जन्माचे सार्थक झाले.

गुरुमाऊलींच्या कृपेमुळेच मला कठीण प्रसंगांतून बाहेर पडता आले. ‘माझ्या शरिरात प्राण असेपर्यंत मला सेवेत रहाता येऊदे. त्यासाठी मला बळ आणि शक्ती द्या’, अशी गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. रश्मी विरनोडकर (वय ६० वर्षे), अंधेरी, मुंबई. (१४.२.२०२४)