लातूर येथील २ संशयित शिक्षक ‘ए.टी.एस्’च्या कह्यात !

‘नीट’ पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्रात !

लातूर – देशात गाजत असलेल्या ‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश प्रक्रिया) पेपर फुटीचे धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंत पोचले आहेत. या प्रकरणी आतंकवाद विरोधी पथकाने (ए.टी.एस्.) लातूर येथील खासगी शिकवणीवर्गातील २ शिक्षकांना संशयित म्हणून कह्यात घेतले आहे. संजय जाधव आणि जलील पठाण अशी या दोघांची नावे आहेत. या प्रकरणातील गैरव्यवहाराचे अन्वेषण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवल्यानंतर वेगाने घडामोडी घडत आहेत. ‘नीट’चे महासंचालक सुबोधकुमार सिंह यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्या जागी प्रदीपसिंह खरोला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरात, हरियाणा, पंजाब, झारखंड आणि बिहारनंतर या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रात पोचले आहेत.

संजय जाधव हे चाकूर तालुक्यातील बोथी येथील रहिवासी आहेत. ते सोलापूर जिल्ह्यातील टाकळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. जलील पठाण हे लातूरजवळील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. हे दोघेही लातूर येथे खासगी शिकवणीवर्ग चालवतात. ‘लातूर येथे नीट परीक्षेची सिद्धता करण्यासाठी सहस्रों विद्यार्थी राज्यातून येतात. याचाच गैरलाभ घेऊन नीट परीक्षेचा पेपर फोडणारे रॅकेट लातूर येथे चालत असावे’, असा संशय अन्वेषण यंत्रणांना आहे. त्यामुळे आता कह्यात घेण्यात आलेल्या शिक्षकांकडून काही मिळते का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. वरील २ शिक्षकांच्या लातूर येथील शिकवणीवर्गावर धाड घालून त्यांना कह्यात घेण्यात आले.