पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील सुरक्षा उपकरणे गायब !

पंढरपूर – येथील श्री विठ्ठल मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी प्रवेशद्वारात स्वतंत्र पोलीस निरीक्षक आणि पोलीस यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे; परंतु मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेची साधने धूळ खात पडली आहेत, तसेच तपासणी करण्याची उपकरणे गायब आहेत. प्रवेशद्वारात बसवण्यात आलेले यंत्र बंद आहे. ‘मेटल डिटेक्टर’चा वापर होत नाही. मंदिरातील महनीय व्यक्तींच्या प्रवेशद्वारातून महनीय व्यक्तींसमवेत अनेक भाविकांना, तसेच मंदिरातील तुळशीपूजा, पाद्यपूजेच्या भाविकांना विनापडताळणी सोडले जात आहे. मंदिराच्या सुरक्षेसाठी वर्षाकाठी लाखो रुपये शासन आणि मंदिर समिती खर्च करते; परंतु सुरक्षा चोख नाही. एकूणच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी आहेत. यामुळे भाविकांमध्ये नाराजी आहे.

संपादकीय भूमिका :

महत्त्वाच्या मंदिरामध्ये असे कसे होते ? याला उत्तरदायी असणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !