SANATAN PRABHAT EXCLUSIVE : लोकसभा निवडणुकीत ‘नोटा’ वापरण्याच्या आकडेवारीत ४ लाख १६ सहस्र मतांचा फरक !

केंद्रीय निवडणूक आयोगाची आकडेवारी आणि ‘नोटा’ची प्रत्यक्ष बेरीज यांत मोठी तफावत !

(‘नोटा’ म्हणजे सर्व उमेदवारांना नाकारण्यासाठी मतदानयंत्रात दिलेला पर्याय)

मुंबई, २३ जून (वार्ता.) –  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर देशातील राजकीय पक्षांना एकूण किती मते मिळाली ?, हे   टक्केवारीमध्ये आणि संख्यात्मक देण्यात आले आहे. यामध्ये एकूण मतदारांपैकी ६३ लाख ७२ सहस्र २२० मतदारांनी ‘नोटा’ या पर्यायाचा वापर केला; म्हणजेच नोटा वापरणार्‍यांची संख्या ०.९९ टक्के एवढी होती. प्रत्यक्षात देशातील ३६ राज्यांमध्ये नोटाचा वापर करणार्‍यांची बेरीज केल्यास ती ६७ लाख ८८ सहस्र ४९२ इतकी येत आहे. त्यामुळे या दोन्ही वेगवेगळ्या आकडेवारींमधील कोणती संख्या खरी आणि कोणती खोटी ?, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या आकडेवारीत थोडाथोडका नव्हे, तर तब्बल ४ लाख १६ सहस्र २७७ मतांचा फरक आहे. त्यामुळे लोकसभेच्या मतमोजणीविषयी निवडणूक आयोगाच्या कारभाराविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

देशात पक्षनिहाय मिळालेली मते आणि नोटा यांचा वापर करणार्‍यांची आकडेवारी

१. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रत्येक राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रत्येक उमेदवाराला किती मते मिळाली ?, तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये नोटाचा किती जणांनी वापर केला ?, याची आकडेवारी देण्यात आली आहे.

२. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभेची ही अधिकृत आकडेवारी संकेतस्थळावरून सार्वजनिक करण्यात आली आहे.


महाराष्‍ट्रातही नोटांच्‍या आकडेवारी २ सहस्र ७६५ मतांचा फरक !

महाराष्‍ट्रात पक्षनिहाय मिळालेली मते आणि नोटा यांचा वापर करणार्‍यांची आकडेवारी

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील पक्षनिहाय मतदान वर्तुळामध्ये दाखवण्यात आले आहे. यामध्ये ४ लाख १२ सहस्र ८१५ मतदारांनी नोटाचा वापर केल्याचे दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांतील नोटाचा वापर करणार्‍या मतदारांच्या आकडेवारीची बेरीज केल्यास ती ४ लाख १५ सहस्र ५८० इतकी येत आहे. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये नोटाला मिळालेल्या मतांमध्ये २ सहस्र ७६५ मतांचा फरक आहे.


निवडणूक अधिकार्‍यांनाच माहिती नाही !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकार्‍यांच्या कार्यालयात जाऊन निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांना केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील नोटाच्या मतदानातील फरक लक्षात आणून दिला. यावर निवडणूक अधिकार्‍यांनी संकेतस्थळावर जाऊन त्याविषयी पडताळणी केली; मात्र ‘हा फरक कसा काय आला ?’, याविषयी त्यांनाही सांगता आले नाही. ‘याविषयी केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवू’, असे अधिकार्‍यांनी सांगितले.


उमेदवारांच्या जय-पराजय यांवर परिणाम होण्याची शक्यता ?

नोटाच्या मतदानातील फरकाप्रमाणे जर लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांना मिळालेल्या मतमोजणीत फरक असेल, तर त्याचा परिणाम निवडून आलेल्या उमेदवारांच्या जय-पराजय यांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतमोजणीतील या फरकाविषयी निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे, असे सामान्य जनतेचे म्हणणे आहे.