ISRO : ‘इस्रो’च्या पुर्नवापर करण्यात येणार्या अंतराळयानाची तिसरी चाचणीही यशस्वी !
बेंगळुरू (कर्नाटक) – भारताची अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने २३ जून यादिवशी सलग तिसर्यांदा ‘रियुजेबल लॉन्च व्हेईकल’चा (‘आर्.एल्.व्ही.’चा), म्हणजे पुर्नवापर करण्यात येणार्या अंतराळयानाची चाचणीमध्ये यश मिळवले आहे.
चाचणीमध्ये भारतीय वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरने ‘पुष्पक’ अवकाशयानाला चित्रदुर्गातील एरोनॉटिकल चाचणी क्षेत्रामध्ये ४.५ कि.मी. उंचीवर नेले आणि धावपट्टीवर लँडिंगसाठी सोडले. पुष्पकने अचूकतेने लँडिंग केले. जेव्हा पुष्पक हेलिकॉप्टरमधून सोडण्यात आले, तेव्हा त्याचा लँडिंग वेग ३२० किमी प्रतितास पेक्षा अधिक होता. हा वेग व्यावसायिक विमानांच्या २६० कि.मी. प्रतिघंटा आणि लढाऊ विमानाच्या २८० कि.मी. प्रतिघंटा वेगापेक्षा अधिक आहे. पुष्पकमध्ये बसवलेल्या ब्रेक पॅराशूटच्या साहाय्याने वेग अल्प करण्यात आला. यानंतर लँडिंग गियर ब्रेक लावले आणि वाहन धावपट्टीवर थांबवण्यात आले.
नासाच्या स्पेस शटलप्रमाणे इस्रोचे आर्.एल्.व्ही.
इस्रोचे रियुजेबल लॉन्च व्हेईकल हे नासाच्या ‘स्पेस शटल’सारखे आहे. वर्ष २०३० मध्ये हे यान पूर्ण झाल्यावर ते १० सहस्र किलोपेक्षा अधिक वस्तुमान पृथ्वीच्या कक्षेत वाहून नेण्यास सक्षम असेल. कमी खर्चात उपग्रहांना कक्षेत ठेवेल.
पुर्नवापर तंत्रज्ञान म्हणजे काय ?
अंतराळ मोहिमेत रॉकेट आणि त्यातील अंतराळयान असतात. रॉकेटचे काम अंतराळयानाला अवकाशात नेणे, हे आहे. कामगिरी पूर्ण केल्यानंतर रॉकेट समुद्रात पाडले जाते, म्हणजे त्याचा पुर्नवापर होत नाही. आता विमानाप्रमाणेच रॉकेट अंतराळ यानाला अवकाशात नेऊन पृथ्वीवर परत आणण्यात येते. इस्रो अशा प्रकारचे अंतराळयानाची निर्मिती आणि उड्डाण वर्ष २०३० पर्यंत करू शकते, असे तज्ञांना वाटते. अमेरिकेतील उद्योगपती इलॉन मस्क यांच्या आस्थापनाकडे अशा प्रकारचे खासगी अंतराळयान आहे.