Vaishvik Hindu Rashtra Mahotsav : गोवा येथे २४ जून या दिवशी होणार अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाला प्रारंभ !

देश-विदेशातील शेकडो हिंदुत्‍वनिष्‍ठांचे कार्यक्रमस्‍थळी आगमन !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाची तपपूर्ती !

श्री रामनाथ देवस्‍थानच्‍या प्रवेशद्वारावर उभारलेली कमान

रामनाथी (गोवा), २३ जून (वार्ता.) – फोंडा येथील ‘श्री रामनाथ देवस्‍थान’ येथे २४ जून या दिवशी अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाला प्रारंभ होणार असून ३० जूनपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनात सहभागी होण्‍यासाठी देश-विदेशांतील विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महोत्‍सवात सहभागी होण्‍यासाठी कार्यक्रमस्‍थळी पोचले आहेत. वर्ष २०१२ पासून ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ म्‍हणून चालू झालेल्‍या या अधिवेशनाची यावर्षी तपपूर्ती आहे. विविध देशांतीलही प्रतिनिधी सहभागी होत असल्‍यामुळे अधिवेशनाचे नामांतर ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ असे करण्‍यात आले आहे.

या महोत्‍सवासाठी देश-विदेशांतील १ सहस्रहून अधिक संघटनांच्‍या २ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींना निमंत्रित करण्‍यात आले आहे. अधिवेशनात सहभागी होणार्‍या धर्मप्रेमींच्‍या स्‍वागतासाठी श्री रामनाथ देवस्‍थानच्‍या प्रवेशद्वारावर वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाची भव्‍य कमान उभारण्‍यात आली आहे. महोत्‍सवासाठी आकर्षक व्‍यासपीठ उभारण्‍यात आले असून कार्यक्रमस्‍थळी हिंदूंमधील धर्माभिमान जागृत करणारे, धर्मकार्यासाठी प्रेरित करणारे आणि धर्मावरील आघातांविषयी अंतर्मूख करणारे प्रभावी फलक लावण्‍यात आले आहेत.

डॉक्‍टर, अधिवक्‍ता, उद्योजक, पत्रकार आदी विविध क्षेत्रांतील हिंदु धर्माभिमानी या महोत्‍सवात सहभागी होणार आहेत. अनेक संत-महात्‍मे यांची वंदनीय उपस्‍थिती या महोत्‍सवाला लाभणार आहे. अधिवेशनामध्‍ये सहभागी मान्‍यवर राष्‍ट्र, धर्म, संस्‍कृती, हिंदु धर्मावरील आघात, हिंदूंचे संघटन आदी विविध विषयांवरील त्‍यांची मते अधिवेशनात मांडणार आहेत आणि पुढील राष्‍ट्र अन् धर्म कार्याचा कृती आराखडा निश्‍चित केला जाणार आहे.

हिंदु राष्‍ट्राच्‍या ध्‍येयाने प्रेरित देश-विदेशातील धर्मप्रेमींचे होणार मनोमिलन !

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या एका ध्‍येयाने प्रेरित देश-विदेशातील धर्माभिमान्‍यांना वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या निमित्ताने एकमेकांना भेटण्‍याची, वर्षभरात त्‍यांच्‍या ठिकाणी केलेले धर्मकार्य सांगण्‍याची आणि अन्‍य धर्मप्रेमींनी केलेले कार्य जाणून घेण्‍याची उत्‍सुकता असते. त्‍यामुळे कार्यक्रमस्‍थळी आलेल्‍या सर्वांमध्‍ये एकमेकांना भेटण्‍याची मोठी ओढ दिसून येत आहे.