सकल हिंदु समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढून निषेध !
महाड येथील गोवंश हत्या प्रकरण
महाड (जिल्हा रायगड) – येथे झालेल्या गोहत्येच्या विरोधात रायगड जिल्ह्यातील सकल हिंदु समाजाच्या वतीने महाड चवदार तळे ते प्रांत कार्यालय महाड असा भव्य महामोर्चा काढण्यात आला. गोमातेच्या रक्षणार्थ काढलेल्या मोर्च्यात सहस्रो हिंदु माता, भगिनी आणि हिंदु बांधव यांनी सहभाग घेतला होता.
महाड तालुक्यातील इसाने कांबळे येथे झालेल्या गोवंश हत्या प्रकरणाचा विरोध करण्यास गेलेल्या हिंदु समाजातील तरुणांना मारहाण झाली होती. या प्रकरणी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यासाठी प्रचंड मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात होता.
गोहत्या करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या मोर्च्यात करण्यात आली. प्रांत कार्यालय महाड येथे हिंदूंनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले, तसेच संबंधित आरोपींवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली.
क्षणचित्रे
१. या मोर्चामध्ये ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘जय श्रीराम’, ‘हर हर महादेव’, ‘वन्दे मातरम्’ अशा घोषणा देत गोहत्या करणार्यांचा निषेध करण्यात आला.
२. मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर भगवे ध्वज घेऊन हिंदु तरुण सहभागी झाले होते.
गोवंश हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली, तर हिंदु समाज आक्रमक होईल ! – उमेश गायकवाड‘गोवंश हत्या प्रकरणाची जर आगामी काळात तळोजा ते पोलादपूरपर्यंत पुनरावृत्ती झाली, तर हिंदु समाज आक्रमक होईल’, अशी चेतावणी हिंदु सकल समाजाचे प्रमुख कार्यकर्ते उमेश गायकवाड यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘हिंदूंवर अशा पद्धतीने मोर्चे काढण्याची वेळ का येते ? आज गायीचे रक्त पहावे लागते; कारण आपण संघटित होत नाही. हिंदूंची अशी वज्रमूठ कायम ठेवून भविष्यात याच पद्धतीने अशा घटनांना सामोरे जावे लागेल.’’ |