त्रिपुरामधील धर्मांतराच्या समस्येवर उपाय आणि त्यामध्ये मिळालेले यश !
पू. स्वामी चित्तरंजन महाराज यांचा परिचय
त्रिपुरा येथील ‘शांती काली आश्रम’चे पू. स्वामी चित्तरंजन महाराज हे पू. शांती काली महाराज यांचे उत्तराधिकारी आहेत. ते गेल्या २१ वर्षांपासून त्रिपुरातील गोरगरीब लोकांच्या मुलांना शिक्षण देतात, तसेच त्यांचे धर्मांतर होण्यापासून वाचवतात. सध्या त्रिपुरामध्ये त्यांचे २५ हून अधिक आश्रम आहेत. त्यांच्या ६ आश्रम पाठशाळा आहेत. त्या माध्यमातून १ सहस्रांहून अधिक मुलांना आश्रमात ठेवून विनामूल्य शिक्षण देण्याची व्यवस्था करतात. ते समाजातील गरीब लोकांच्या प्रत्येक अडचणीत साहाय्य करतात.
१. धर्मांतराच्या विरोधात लढा देणार्या संतांची उग्रवाद्यांकडून हत्या
‘वर्ष १९८५ पासून त्रिपुरामध्ये सर्वत्र धर्मांतर केले जात आहे. हे धर्मांतर थांबवण्यासाठी माझ्या गुरुदेवांनी (पू. शांती काली महाराज यांनी) त्रिपुरामध्ये मोठा लढा दिला. मी गुरुदेवांसह वर्ष १९८५ पासून आहे. गुरुदेवांनी वर्ष १९८५-८६ मध्ये सांगितले, ‘आजपासून १४ वर्षे पूर्ण होतील, त्या दिवशी मी या जगाचा निरोप घेईन. त्यानंतर तुला संपूर्ण भारतभ्रमण करावे लागेल.’ त्यांची भविष्यवाणी खरी होत असतांना दिसत आहे. वर्ष २००० मध्ये धर्मांतरीत झालेले पुष्कळ लोक ख्रिस्ती पंथ सोडून हिंदु धर्मात परत येत होते. हे उग्रवाद्यांना सहन झाले नाही. वर्ष २००० मध्ये एक दिवस ‘फ्री स्थान’ संघटना आणि ‘एन्.एल्.एफ्.टी.’ यांचे उग्रवादी आश्रमात घुसले अन् त्यांनी गोळ्या घालून गुरुदेवांची हत्या केली.
२. हिंदु धर्माचे कार्य सोडून देण्यासाठी उग्रवाद्यांकडून ठार मारण्याची धमकी
एक दिवस उग्रवाद्यांनी माझ्या मोठ्या भावाचे अपहरण केले आणि त्याला जंगलात घेऊन गेले. ३ दिवस त्याला ठेवून घेतल्यावर ते माझ्या भावाला म्हणाले, ‘तुझ्या छोट्या भावाला हिंदु धर्माचा पोशाख उतरवून घरी बसायला सांग. नाही तर त्याच्यावर गोळ्या झाडण्याचा आदेश दिला जाईल.’ त्याप्रमाणे मला गोळ्या मारून ठार मारण्याचा आदेश मिळाला होता. वर्ष १९८९ मध्ये विश्व हिंदु परिषदेच्या वतीने कर्णावती (अहमदाबाद) येथे धर्मसंसद झाली होती. त्या वेळी माझे गुरुदेव मला म्हणाले, ‘तू अशोक सिंघल (विहिंपचे तत्कालीन कार्याध्यक्ष) यांच्याशी ओळख करून घे. मी या पृथ्वीचा निरोप घेईन, तेव्हा तुला इतर कुणाचेही सहकार्य मिळणार नाही. त्या वेळी तू अशोक सिंघल यांच्याकडे जा. अशोक सिंघल तुझी सर्व व्यवस्था करून देतील.’ एक प्रकारे ही भविष्यवाणीच होती. वर्ष २००० मध्ये माझ्या गुरुदेवांची हत्या झाली. त्यानंतर उग्रवाद्यांच्या भीतीने त्रिपुरातील आमच्या आश्रमात लोकांचे येणे-जाणे बंद झाले. वर्ष २००० मध्ये साधू-संतांना भगवे कपडे सोडून हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावे लागले, त्या कुणालाही हिंदु धर्मानुसार पूजा करू दिली नाही. खत्री समाज आपल्या सनातन धर्माचा फेटा बांधत होता, त्याला तो कंबरेला बांधून ठेवावा लागला. त्यांना तो डोक्याला बांधू दिला नाही. अशी परिस्थिती त्रिपुरामध्ये होती.
लहान मुलांचे धर्मांतर थांबवण्यासाठी ३५ हून अधिक इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि वसतीगृहे यांची स्थापना
त्रिपुरामधील धर्मांतर थांबवण्यासाठी आम्ही ख्रिस्त्यांचीच पद्धत अवलंबली. ख्रिस्ती शाळांना पर्याय देण्यासाठी आणि लहान मुलांचे धर्मांतर थांबवण्यासाठी गुरुदेवांच्या (पू. शांती काली महाराज यांच्या) आशीर्वादाने मी त्रिपुरामध्ये ३५ हून अधिक इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि वसतीगृहे उघडली. त्रिपुरातील लोक पुष्कळ गरीब आहेत. त्यांना शिक्षण घेण्याची एकमात्र संधी केवळ आश्रमातच उपलब्ध आहे. त्रिपुरामध्ये दुसरे कुणीही त्यांना हिंदु धर्मशिक्षण देत नाही. त्रिपुरामध्ये गुरुकुल उघडण्याचीही माझी इच्छा आहे, तसेच धर्मशिक्षणासाठी हिंदु धर्माचे महाविद्यालय उघडावे, असे माझे स्वप्न आहे. येत्या १० वर्षांत ख्रिस्ती पंथाचा प्रसार करणार्यांना मी मिझोराम आणि नागालँड राज्यांमधून हद्दपार करणार आहे. यासाठी मला समस्त भारतातील हिंदुत्वनिष्ठांचे सहकार्य अपेक्षित आहे. मुलांना शिक्षण देण्याच्या निमित्ताने ख्रिस्ती कोणत्याही राज्यात घुसतात. शिक्षणाच्या माध्यमातून ते लोकांचे धर्मांतर करतात. ते रोखण्यासाठी त्यांच्याप्रमाणे आपणही शाळा-महाविद्यालये काढणे एक चांगला उपाय आहे.
– पू. स्वामी चित्तरंजन महाराज
३. हिंदु धर्म वाचवण्यासाठी त्रिपुरामध्ये २५ हून अधिक आश्रमांची स्थापना
गुरुदेवांच्या भविष्यवाणीनुसार २८.१२.२००० या दिवशी मी श्री. अशोक सिंघल यांना देहलीत येऊन भेटलो, तसेच प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि लालकृष्ण अडवाणी यांनाही भेटलो. त्या लोकांनी मला धर्मप्रसार करण्यासाठी सुरक्षा शिबिरे (सिक्युरिटी कँप) दिली. त्यानंतर मी सनातन हिंदु धर्म वाचवण्यासाठी त्रिपुरामध्ये २५ हून अधिक आश्रमांची स्थापना केली. मी पूर्वी नोकरी करत होतो; पण नंतर तिचा त्याग केला. ‘माझ्यासह केवळ हिंदु धर्मच चालत राहील, माझी नोकरी माझ्यासह येणार नाही’, असा माझा विचार होता. त्यामुळे मी नोकरी सोडून हिंदु धर्मासाठी वाहून घेतले. आज आम्ही त्रिपुरामध्ये १ सहस्र गरीब आणि अनाथ मुले यांना शिक्षण देत आहोत. विश्व हिंदु परिषदेच्या साहाय्याने मी त्रिपुराच्या बाहेर हरिद्वार आणि गुजरात या ठिकाणी माझ्या काही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठवले आहे.
ज्या ज्या ठिकाणी आम्ही आश्रम बनवत होतो, त्याच्या जवळच ख्रिस्ती लोकही त्यांचे चर्च बांधत होते आणि मुलांना ख्रिस्ती करत होते. त्रिपुरामध्ये आजही किमान १५ ते २० टक्क्यांहून अधिक ख्रिस्ती लोक आहेत. हिंदूंच्या धर्मांतरामुळे काही दिवसांनी त्यांची संख्या वाढून २५ टक्क्यांच्या पुढे जाईल. मिझोराममध्ये ९५ टक्के, नागालँडमध्ये ९० टक्के, मेघालयमध्ये ८० टक्के आणि मणीपूरमध्ये ३५ टक्के लोक ख्रिस्ती आहेत.
४. धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्त्यांकडून इंग्रजी माध्यमांच्या शाळांची स्थापना
त्रिपुरामध्ये ख्रिस्त्यांनी प्रथम ३-४ वर्षांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा उघडली. २ वर्षांनी हे ख्रिस्ती या मुलांच्या पालकांकडे जातात आणि सांगतात, ‘तुमच्या मुलाला पुष्कळ चांगली बुद्धी आहे. तो पुढे जाऊन चांगले शिक्षण घेऊ शकेल. तुम्ही त्याचा ‘बाप्तीस्मा’ (धर्मांतर करण्याची प्रक्रिया) करून घ्या. नंतर आम्ही तुमच्या मुलाला अधिक चांगले शिक्षण देणार.’ सर्वच आई-वडिलांना त्यांचा मुलगा पुष्कळ शिकून मोठा व्हावा, असे वाटत असते. ते ख्रिस्त्यांच्या षड्यंत्राला फसतात. त्यानंतर त्वरित त्यांच्या मुलाचे धर्मांतर होते. तो ३-४ वर्षांपासून केवळ बायबलचे शिक्षण घेत असतो. धर्मांतरित मुलगा मोठा झाल्यावर एखाद्या मोठ्या पदावर नोकरी करतो. त्यानंतर त्याचे सर्व कुटुंबच ख्रिस्ती होऊन जाते. अशा प्रकारे त्रिपुरामध्ये धर्मांतर चालू आहे. या कामासाठी तेथे १ सहस्र ख्रिस्ती धर्मप्रचारक काम करतात. तसेच ‘केटली बाप्तीस’सारख्या पुष्कळ ख्रिस्ती संस्था त्रिपुरामध्ये धर्मांतराचे काम करतात. त्रिपुरामध्ये एवढ्या लोकांशी केवळ ‘शांती काली आश्रम’ लढा देत आहे, तसेच धर्मांतर झालेल्यांना पुन्हा हिंदु धर्मात घेण्याचे कार्य चालू आहे.
५. त्रिपुरातील साधू-संन्याशांनी धर्मरक्षणासाठी मठ-मंदिरांतून बाहेर पडणे आवश्यक !
ख्रिस्त्यांना सप्ताहातून २ दिवस चर्चमध्ये जावे लागते. तेथे सर्व बायबलची शिकवण दिली जाते. हिंदु धर्माचे तसे काही नसते. हिंदू त्यांच्या मनाप्रमाणे मंदिरात कधी जातात, तर कधी जात नाहीत. त्रिपुरात पुष्कळ मठ-मंदिरे आणि साधू-संन्यासी आहेत; परंतु त्यांनी स्वत:ला एका चौकटीत बांधून घेतले आहे. त्या चौकटीच्या बाहेर निघण्यास ते सिद्ध नाहीत. ‘नाव सुरक्षित राहिली, तर नावाडी जिवंत राहील. नावच जर सुरक्षित राहिली नाही, तर नावाडी कसा वाचेल ? हिंदू वाचले, तर साधू रहातील. हिंदूच वाचले नाहीत, तर साधू कुठे रहाणार ? त्यासाठी प्रथम हिंदु धर्माची नाव वाचवली पाहिजे. त्यानंतर स्वत:ला वाचवले पाहिजे.’
– पू. स्वामी चित्तरंजन महाराज, शांति काली आश्रम, अमरपूर, त्रिपुरा.