संपादकीय : तिसर्‍या महायुद्धाची नांदी ?

पुतिन यांच्याद्वारे किम जोंग यांना आलिशान कार भेट देण्यात आली

उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनी अण्वस्त्र निर्मिती करून अमेरिकेला आव्हान दिले आहे. अगदी छोटा देश असलेला उत्तर कोरिया हा अमेरिकेला नेहमी युद्ध करण्याचे आव्हान देतो. अण्वस्त्रांच्या कार्यक्रमामुळे उत्तर कोरियावर अमेरिकेने अनेक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे या देशाला जगातील सर्व देशांचे साहाय्य मिळत नाही; मात्र याला रशिया आणि चीन अपवाद आहेत. उत्तर कोरियाला चीन आणि रशिया यांनी आता पाठिंबा दिला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे नुकतेच उत्तर कोरिया येथे आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले. विमानतळावर त्यांचे स्वागत केल्यानंतर किम जोंग उन स्वतः त्यांच्यासमवेत त्याच गाडीतून विश्रामधामपर्यंत गेले. ते पहाता परस्परातील जवळीक यातून अधोरेखित होते. पुतिन यांनी त्यांच्या भेटीपूर्वी रशियाचे युक्रेनशी चालू असलेल्या युद्धाला ‘उत्तर कोरियाने खंबीरपणे पाठिंबा दिला’, याविषयी त्याचे कौतुक केले आहे. उत्तर कोरियाच्या सत्ताधारी पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘रॉडोंग सिनमुन’मध्ये छापलेल्या लेखात त्यांनी ‘अमेरिकेचा दबाव, ब्लॅकमेल आणि लष्करी धमक्या’ असे शब्द वापरले आहेत आणि तरीही उत्तर कोरियाच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या प्रयत्नांना रशियाने पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे. हे २ नेते जवळ येण्याचे दुसरे मोठे कारण, म्हणजे त्यांचा ‘शत्रू’ एकच आहे, तो म्हणजे अमेरिका ! सध्या उत्तर कोरिया आणि रशिया या दोन्ही देशांना आंतरराष्ट्रीय निर्बंधांचा सामना करावा लागत आहे आणि एक प्रकारे हे दोघेही आंतरराष्ट्रीय जगतात एकटे पडले आहेत.

आंतरराष्ट्रीय वर्तुळातही चिंता वाढली !  

चीननेही पुतिन आणि किम यांच्या या भेटीचे स्वागत केले आहे. पुतिन यांनी १ मासापूर्वी चीनचा दौरा केला होता. पुतिन यांनी २४ वर्षांच्या कालावधीनंतर उत्तर कोरियाला दिलेल्या भेटीमुळे केवळ आश्चर्यच नाही, तर आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळातही चिंता वाढली आहे. अमेरिकेने म्हटले आहे की, या दोन्ही नेत्यांच्या भेटीने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या भेटीतून दोन्ही देशांमधील वाढत्या जवळीकीचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत; परंतु या जवळीकीचे तात्कालिक आणि दीर्घकालीन परिणाम काय दिसू शकतात ? हा मोठा प्रश्न आहे. इटलीतील ‘जी ७’ शिखर परिषदेनंतर स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या युक्रेन शांतता परिषदेच्या काही दिवसांनंतर पुतिन-किम जोंग यांची ही भेट झाली आहे. जिथे ८० देशांनी रशियाच्या विरोधात संयुक्त निवेदनाच्या स्वरूपात शांतता ठरावावर स्वाक्षरी केली; मात्र भारताने आपली स्वतंत्र आणि संतुलित भूमिका कायम ठेवत त्या प्रस्तावापासून दूर रहाणे पसंत केले; कारण पूर्वीपासूनच रशिया आणि भारत यांचा व्यापार, संरक्षण करार अन् शस्त्रास्त्रांच्या निर्मितीत रशियाने भारताला भरघोस साहाय्य केले आहे. गेल्या २ वर्षांपासून युक्रेन युद्ध चालू असतांना रशियाला उत्तर कोरियाच्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. दोन्ही बाजूंनी शस्त्रास्त्रांच्या देवाणघेवाणीचे वृत्त नाकारले असले, तरी त्यांनी एका व्यापक धोरणात्मक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली आहे. ज्यामध्ये पुतिन यांच्या मते कोणत्याही देशावर आक्रमण झाल्यास ‘द्विपक्षीय सहकार्य’ करण्याचे वचन दिले आहे.

अण्वस्त्रांच्या कार्यक्रमांमुळे धोका !

जागतिक पटलावर दीर्घकाळ एकाकीपणाचा सामना करणार्‍या उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांच्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य असलेल्या रशियाची जवळीकही महत्त्वाची आहे. रशियाने काही वर्षांपूर्वी उत्तर कोरियाच्या अनधिकृत शस्त्रास्त्र कार्यक्रम आणि निर्बंध यांविषयी संयुक्त राष्ट्र-समर्थित पडताळणीचे समर्थन केले होते; पण युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या गरजा आणि पाश्चात्त्य देशांपासून वाढलेले अंतर लक्षात घेऊन रशियाची भूमिका पालटली आहे. मार्चमध्ये उत्तर कोरियाने सुरक्षा परिषदेच्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याविषयी स्वतंत्र चौकशीची मागणी करणार्‍या ठरावास रशियाने पाठिंबा दिला नव्हता. अशा परिस्थितीत रशियाकडून मिळणारे तांत्रिक साहाय्य उत्तर कोरियाच्या हुकूमशाहच्या मनसुब्यांना कोणती दिशा देईल, हा प्रश्न सर्वांना सतावत आहे. आतापर्यंत चीन हा एकमेव मोठा देश आहे की, जो उत्तर कोरियाच्या समर्थनार्थ उभा राहिला आहे. युक्रेनमध्ये पुतिन यांनी चालू केलेल्या युद्धाला चालना देण्यासाठी आवश्यक असलेले आर्थिक साहाय्य आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतरण यांच्या बदल्यात उत्तर कोरिया रशियाला महत्त्वपूर्ण शस्त्रे प्रदान करण्याविषयी करार करण्यासाठी ही भेट झाली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात पुतिन यांच्यासमवेतच्या बैठकीसाठी किम जोंग यांनी रशियाच्या सुदूर पूर्वेकडे प्रवास केला. यानंतर उत्तर कोरिया आणि रशिया यांच्यातील लष्करी, आर्थिक अन् इतर सहकार्य वेगाने वाढले आहे.

तिसर्‍या महायुद्धाची सिद्धता !

रशिया आणि उत्तर कोरिया यांची भेट ही सर्वसाधारण नाही. संकटाच्या काळात या दोन्ही देशांनी एकमेकांना साहाय्य करण्याचे वचन दिले आहे. युक्रेनला ‘नाटो’ (उत्तर अटलांटिक करार संघटना) देशांकडून भरघोस साहाय्य मिळत आहे. ‘पाश्चात्त्य देशांनी युक्रेनला शस्त्रांद्वारे सहकार्य केल्यास त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील’, अशी चेतावणी रशियाने दिली आहे; मात्र याला ‘नाटो’ देशांनी म्हणजे ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी, जपान, इंग्लंड या देशांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याने रशिया संतप्त झाला आहे. यासाठी तो चीन, उत्तर कोरिया आणि इतर युरोप राष्ट्रांच्या विरोधातील देशांशी जवळीक साधून त्यांना तिसर्‍या महायुद्धाकडे खेचत आहे. सध्या रशिया इतर देशांसमवेत जवळीक साधून, तसेच आर्थिक सहकार्याचे करार करून स्वतःची आर्थिक आणि संरक्षण यांची बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे रशिया, चीन आणि उत्तर कोरिया यांच्या नेत्यांची झालेली भेट ही तिसर्‍या महायुद्धाची नांदी ठरू शकते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. उद्या चीनने तैवानवर आक्रमण केल्यास त्या वेळी रशिया चीनला सहकार्य करील. आता युक्रेन युद्धात चीन रशियाला सहकार्य करत आहे. भारत आणि रशिया यांच्या घनिष्ठ मैत्रीमुळे अमेरिकेच्या पोटात गोळा उठत असला, तरी भारताने मोठ्या चातुर्याने रशियाला पाठिंबा देऊन युरोपीय देशांशीही मैत्री अबाधित ठेवली आहे. असे असले, तरीही भारताने सावध रहाणे आवश्यक आहे; कारण चीनचा वाढता विस्तारवाद भारताला डोकेदुखी ठरत आहे आणि त्यात रशिया अन् अमेरिका नेमकी काय भूमिका घेतात, हे येणारा काळच ठरवेल.

 रशिया, चीन आणि उत्तर कोरिया यांच्या नेत्यांची झालेली भेट, ही तिसर्‍या महायुद्धाची नांदी ठरण्याची शक्यता !