राहुल गांधी यांच्या विरोधात जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंतर्गत पुण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) !

जादू करून नागरिकांना पैसे देण्याचे वक्तव्य करून फसवणूक केल्याचा आरोप

पोलिसात तक्रार प्रविष्ट करतांना सौ. आरती कोंढरे

पुणे – लोकसभेच्या निवडणुकीच्या एका प्रचारसभेत राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात जादू करून नागरिकांना पैसे देण्याचे वक्तव्य केले होते. त्याविरोधात आता येथील नागरिक सौ. आरती कोंढरे यांनी २१ जून या दिवशी सहपोलीस आयुक्त, पुणे यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत असे म्हटले आहे, ‘‘काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी राहुल गांधी यांनी एप्रिल-मे २०२४ या कालावधीत जाहीर भाषणे करतांना ‘जादूटोणा करून नागरिकांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळतील’, असे आमीष दाखवले.

हे वक्तव्य सामाजिक माध्यमांत पसरले आणि नागरिकांना पैसे मिळणार, याविषयी विश्‍वास निर्माण झाला. प्रत्यक्षात नागरिकांना कोणतेही पैसे न मिळाल्याने त्यांची फसवणूक झाली आहे. पुणे परिसरातील अनेक महिलांनी त्यांची फसवणूक झाल्याचे सांगितले आहे. यासाठी राहुल गांधी यांच्याविरुद्ध ‘जादूटोणा प्रतिबंधक अन् त्यांचे समूळ उच्चाटन करण्याविषयी अधिनियम २०१३ कायद्या’च्या अंतर्गत आणि फसवणूक केल्याविषयी गुन्हा नोंदवण्यात यावा.’’

राहुल गांधी यांच्या विरोधात केलेली तक्रार –

तक्रारदारांच्या वतीने अधिवक्ता श्री. सत्या मुळे हे प्रकरण पहात असून त्यांनीही याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले की, ‘राहुल गांधी हे जादूटोणाच्या माध्यमातून पैसे मिळतील’, असे सांगतात आणि दुसरीकडे ‘भारताच्या राज्यघटनेचे संरक्षण करणार’, असेही म्हणतात. भारताचे गोरगरीब आणि अशिक्षित नागरिक यांना आमीष दाखवून, तसेच फसवणूक करून त्यांची मते मिळवण्याचा प्रकार आहे. जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंतर्गत हा गुन्हा असून अशा प्रकारे आवाहन करून लोकांची फसवणूक करणे, हे लोकशाहीसाठी घातक आहे. अशा गोष्टींना रोखण्यासाठीच देशाच्या राज्यघटनेत तरतुदी आहेत.