भारत अमेरिकेकडून १५० स्ट्रायकर रणगाड्यांची खरेदी करणार !
अमेरिका तंत्रज्ञान देण्यास सिद्ध; टप्प्याटप्पयाने भारतात होईल उत्पादन !
(स्ट्रायकर रणगाडे म्हणजे ८ चाकी युद्ध रणगाडे)
नवी देहली – भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण संरक्षण करार होणार आहे. यांतर्गत अमेरिका भारताला ५० स्ट्रायकर रणगाडे पुरवणार आहे. या कराराची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. हा करार अंतिम झाल्यास चीनच्या सीमेवर त्याला शह देण्यासाठी भारताला मोठी शक्ती प्राप्त होऊ शकेल. अमेरिकेने भारताकडे स्ट्रायकर रणगाड्याचा वेग आणि मारक क्षमतेचे प्रदर्शन करण्याचा प्रस्तावही दिला आहे.
हा करार अंतिम झाला, तर ‘मेक इन इंडिया’ या मोहिमेच्या अंतर्गत भारत केवळ सहउत्पादकच करणार नाही, तर अमेरिका याचे तंत्रज्ञानसुद्धा भारताकडे हस्तांतरित करेल. त्यानंतर भारतीय प्रदेशाला अनुकूल ठरणारे तंत्रज्ञान त्यामध्ये आणावे लागेल, जेणेकरून लडाख आणि सिक्किम यांसारख्या उंच प्रदेशांतसुद्धा हे रणगाडे सहजतेने वापरता येतील. या रणगाड्यांचे तंत्रज्ञान कॅनडा आणि अमेरिका या देशांनी संयुक्तरित्या विकसित केले आहे.
स्ट्रायकर रणगाड्यांची वैशिष्ट्ये !
१. तांत्रिकदृष्ट्या पाहिले, तर स्ट्रायकर रणगाडा हे सैन्यातील एक चिलखती वाहन आहे.
२. यामध्ये ३० मिमी तोफ आणि १०५ मिमी मोबाइल गन असते.
३. ९ सैनिक बसण्याची क्षमता असते.
४. ‘रेंज’ ४८३ किमी आहे.
५. ‘स्ट्रायकर’ वेग १०० किमी प्रतिघंटा आहे.