INSTC Corridor : भारत आणि रशिया यांच्यामधील आंतरराष्ट्रीय महामार्गात रशिया पाकिस्तानचा समावेश करणार !

भारताकडून विरोध

रशियातील पाकिस्तानी राजदूत खालिद जमाली

मॉस्को (रशिया) – भारत आणि रशिया यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक महामार्ग’ (इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर) बांधला जात आहे.  आता या योजनेमध्ये रशियाने पाकिस्तानचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियातील पाकिस्तानी राजदूत खालिद जमाली यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

१. ७ सहस्र २०० कि.मी. लांबीच्या या महामार्गामुळे उत्तर युरोप, अझरबैजान आणि इराण या मार्गाने भारत आणि रशिया जोडले जाणार आहेत. त्यामुळे वेळ आणि पैसे यांची मोठी बचत होणार आहे. या प्रकल्पात चीन आणि पाकिस्तान यांचा ‘चीन पाकिस्तान आर्थिक महामार्ग’ जोडला जाणार आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून जातो. त्यामुळेच भारताने या प्रकल्पाला उघडपणे विरोध केला आहे.

२. पाकिस्तानी राजदूत जमाली यांनी सांगितले की, पाकिस्तान रशियाकडून १० लाख टन कच्चे तेल आयात करतो. ही आयात पाकिस्तान चालू ठेवणार आहे. नवीन महामार्गामुळे पाकिस्तानला नवीन बाजारपेठ मिळणार आहे, तसेच रशिया आणि पाकिस्तान यांचे संबंध अधिक चांगले होतील.

३. तज्ञांचे म्हणणे आहे की, हे दोन्ही महामार्ग जोडले गेल्यास भारताच्या योजनेला मोठा फटका बसणार आहे, तर पाकिस्तानला मोठा लाभ होणार आहे. पाकिस्तान दोन्ही महामार्गांचा लाभ घेईल, तसेच पाकिस्तान भारताचा मित्र असलेला रशियाशी जोडला जाईल. या प्रकल्पानंतर दोन्ही देशांची जवळीक वाढणार आहे.

४. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर पाकिस्तानने भारत-रशिया यांच्यातील महामार्गात सहभाग घेतला, तर त्याला अमेरिकेची अप्रसन्नता ओढवून घ्यावी लागणार आहे, तसेच अफगाणिस्तान आणि इराण या देशांमधूनही पाकिस्तानला विरोध होणार आहे.

संपादकीय भूमिका

रशिया भारताचा मित्र देश असतांनाही तो जाणूनबुजून पाकिस्तानला या योजनेत समाविष्ट करून भारताला दुखावत आहे, हे स्पष्ट आहे. ‘असा देश आपला मित्र असू शकत नाही’, हे जाणून भारताने रशियाशी त्याप्रमाणे व्यवहार केला पाहिजे !