श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथासह साहित्याला चांदीची झळाळी !

हुपरी (कोल्हापूर) येथील सोने-चांदी कारागिरांकडून ‘श्रीं’ची सेवा !

चांदीच्या सिंहासनाला झळाळी देताना कारागीर

पुणे – श्री क्षेत्र देहूमधील देऊळवाड्यातील श्री विठ्ठल-रुक्मिणीची स्वयंभू मूर्ती, शिळा मंदिरातील चांदीचा महिरप, पालखी सोहळ्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेला चांदीचा रथ, पालखी, अब्दागीर, गरुडटक्के, माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना आषाढी वारीनिमित्त झळाळी देण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीतील २७ व्यापारी आणि कारागीर यांनी पालखी रथासह साहित्यालाही झळाळी दिली आहे. हे सर्वजण सद्गुरुदास गोपाळकृष्ण पायी दिंडी सोहळ्यातील वारकरी आहेत. पालखी सोहळ्यातील पूजेचे ताट, साहित्य, पालखी, वीणा, चांदीचा पाट, दानपेटी आणि चांदीचे सिंहासन यांना झळाळी देण्यात आली.

चांदीचे व्यापारी अभयसिंग घोरपडे म्हणाले की, पारंपरिक पद्धतीने झळाळी देतांना रिठा, लिंबू, चिंच, पितांबरी यांचा उपयोग करण्यात आला आहे. यापूर्वीही ४ वर्षे पंढरपूर येथे सेवा दिली. यंदा प्रथमच तुकोबांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली, त्यामुळे आम्ही सर्वजण आनंदी आहोत.

पालखी मार्गांवरील हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील पदार्थांची पडताळणी होणार !

पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील म्हणजे पालखी मार्गांवरील हॉटेल्स, रेस्टॉरंट, मिठाई दुकाने येथील खाद्यपदार्थांची, स्टॉलधारकांची अन्न-औषध प्रशासनाकडून पडताळणी करण्यात येणार आहे. काही शंकास्पद आढळल्यास त्वरित कारवाई केली जाणार आहे. या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी ३३ अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे नियोजन अन्न-औषध प्रशासन पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

पैठण-पंढरपूर पालखी मार्ग अपूर्णच !

पैठण-पंढरपूर या मार्गाने शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे जात असतो. ६ वर्षांचा कालावधी होऊनही हा रस्ता अपूर्णच आहे.

या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याने वारकर्‍यांना खडबडीत, चिखलाने माखलेल्या रस्त्यावरूनच जावे लागणार आहे. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या कामास अनुमती दिली आहे; परंतु ६ वर्षांचा कालावधी झाला, तरी रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, त्याविषयी वारकर्‍यांनी खंत व्यक्त केली आहे.

मुक्कामाच्या ठिकाणी ‘कंट्रोल रूम’ !

संत तुकाराम महाराजांची पालखी आकुर्डीतील ‘विठ्ठल मंदिरा’मध्ये २९ जून या दिवशी मुक्कामी असणार आहे, तर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी ‘दिघी मॅगझीन कॉर्नर’ येथे ३० जून या दिवशी असणार आहे. दोन्ही ठिकाणी पावसाचे पाणी कोठेही तुंबणार नाही, याची काळजी घेतली जाईल. मार्गांची पहाणी करून खड्डे बुजवण्याची कार्यवाही चालू आहे, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ‘कंट्रोल रूम’ (नियंत्रण कक्ष) उभारून वाहनतळ आणि वारकरी यांना पुरवण्यात येणार्‍या सुविधांच्या संदर्भात फलक लावण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली.