दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : २५ हून अधिक बेकर्या प्रदूषणकारी !; मोठे झाड अंगावर कोसळून वृद्धेचा मृत्यू !…
२५ हून अधिक बेकर्या प्रदूषणकारी !
मुंबई – मुंबईतील २५ हून अधिक बेकर्या प्रदूषणकारी आहेत, असे मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या लक्षात आले आहे. यामध्ये खाद्यपदार्थ भाजणे, तसेच अन्य कामांसाठी लाकूड, तसेच जुने फर्निचर जाळण्यात येते. त्यातून प्रदूषण होते. बेकर्यांविरोधात कारवाई करावी कि त्यांचे विद्युत भट्टीमध्ये रूपांतर करण्यासाठी मुदत द्यावी, यावर विचार चालू आहे.
मोठे झाड अंगावर कोसळून वृद्धेचा मृत्यू !
विरार – नातवाला शाळेत सोडून घरी परततांना अंगावर मोठे झाड कोसळल्याने त्याच्याखाली मंजुळा झा (वय ७० वर्षे) यांचा मृत्यू झाला. झाडाखाली त्या दबल्या गेल्याने २ दिवस शोधाशोध करूनही त्या कुणालाच सापडल्या नाहीत. पोलिसांच्या साहाय्याने त्यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात आला.
ठाणे येथे डेंग्यू आणि मलेरिया यांच्या रुग्णांच्या वाढ !
ठाणे – येथे डेंग्यू आणि मलेरिया यांच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. मे आणि १५ जूनपर्यंत मलेरियाचे ७२ रुग्ण आढळून आले आहेत, तर डेंग्यूचे २४ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. यामध्ये मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण हे आदिवासी परिसरातील रुग्णांपेक्षाही अधिक आहेत.
धरणात बुडून ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू !
मुंबई – वांद्रे येथील रिझवी महाविद्यालयाच्या ४ विद्यार्थ्यांचा खालापूर येथील धरणात बुडून मृत्यू झाला आहे. एकूण ३७ युवक-युवती पावसाळी सहलीसाठी गेले होते.
१४ महिलांवर मधमाशांचे आक्रमण !
पोलादपूर (रायगड) – वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजा चालू असतांना मधमाशांनी येथील महिलांवर आक्रमण केले. यात १४ महिला घायाळ झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या तिघांना अटक !
वणी (यवतमाळ), २१ जून (वार्ता.) – येथील खाऊच्या दुकानात नोकरी करणार्या निराधार अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. रिक्शाचालक राहुल यादव, शंकर यादव आणि शंकर भोसकर यांना पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अटक केली. (अत्याचार्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी ! – संपादक)
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ नंदुरबार येथून ७ प्रतिनिधी सहभागी होणार !
नंदुरबार – यंदा बारावे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन गोवा येथे करण्यात आले आहे. या वर्षी नंदुरबार येथून ७ हिंदुत्वनिष्ठ प्रतिनिधी या महोत्सवात सहभागी होणार आहेत.