मांडवे (जिल्हा सातारा) येथील सैनिक ज्ञानेश्वर खाडे हुतात्मा !

सैनिक ज्ञानेश्वर खाडे

सातारा, २१ जून (वार्ता.) – खटाव तालुक्यातील मांडवे येथील वीर सैनिक ज्ञानेश्वर हनुमंत खाडे (वय २१ वर्षे) यांना जम्मू काश्मीर येथील कुपवाडा येथे वीरमरण आले. खटाव तालुक्यातील मांडवे गावचे पैलवान हनुमंत खाडे यांचे ते सुपुत्र होते. वर्ष २०१६ मध्ये २४ मराठा बटालियनमध्ये ते भरती झाले. ज्ञानेश्वर यांना कुस्ती आणि सांप्रदायिक भक्तीची आवड होती. महाविद्यालय काळात त्यांना उत्कृष्ट एन्.सी.सी. कॅडेट म्हणून गौरवण्यात आले होते. सध्या ते मराठा बटालियन मधील ४१ राष्ट्रीय रायफलमध्ये कर्तव्यावर होते. २० जून या दिवशी सकाळी ज्ञानेश्वर यांच्या कुटुंबियांना ते हुतात्म्या झाल्याची माहिती समजली. हुतात्मा ज्ञानेश्वर खाडे यांच्या पार्थिवाची फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून गावामध्ये अंत्ययात्रा काढली. रात्री विलंबाने त्यांच्यावर शासकीय पद्धतीने (इतमामात) अंत्यसंस्कार करण्यात आले.