आला पावसाळा… पथ्य पाळा !

आजच्या लेखात पावसाळ्यात पाळावयाचे काही नियम सांगणार आहे. पावसाळा हा ओलावा आणणारा आणि त्यामुळेच अग्नी कमी करणारा आहे. हा वातप्रकोपाचा काळ असल्याने संधीवात, शारीरिक दुखणी आणि सांध्यांचे आजार ही दुखणी डोके वर काढतात. यासह याच ऋतूमध्ये शरीर पित्त साठवायला प्रारंभ करते. शरिरातील अग्नी नीट ठेवणे आणि वात वाढू न देणे या गोष्टींकडे लक्ष दिले असता पावसाळा प्रकृतीपूर्ण जातो.

प्रतिकात्मक छायाचित्र

 १. कोणती काळजी घ्यावी ?

वैद्या(सौ.) स्वराली शेंड्ये

१. प्रातर्विधीनंतर दिवसाच्या प्रारंभी आले, सुंठ, गवती चहा घालून केलेल्या चहाने किंवा काढ्याने करावी.

२. पोट साफ होण्याकडे लक्ष असावे. पोट साफ असले की, वात वाढत नाही आणि पित्तही प्रमाणात रहाते. पावसाळा हा पित्त साठण्याचा काळ असल्याने पित्ताचीही काळजी घ्यायला लागते. पोट साफ रहाण्यासाठी त्रिफळा चूर्ण किंवा कुठलेच चूर्ण किंवा गोळ्या न घेता शक्यतो स्निग्ध अनुलोमक घ्यावे, यामध्ये दूध-तूप / गरम पाणी-तूप / अल्प प्रमाणात एरंडेल तेल घेऊ शकता. तेही प्रतिदिन घ्यायची आवश्यकता नाही, फक्त ज्यांना त्रास आहे त्यांनी घ्यावे.

३. पावसाळ्यात अग्नी मंद आणि बाहेर थंडावा असल्याने चमचमीत अन् मसालेदार पदार्थ खायची इच्छा होते अन् खाल्लेही जातात. हे पदार्थ पुष्कळ अतीप्रमाणात खाल्ले जाणार नाहीत, हे बघावे.

४. जेवणात उकड काढून केलेली भाकरी किंवा भरपूर तूप घातलेली पोळी असावी. पालेभाज्या आणि उसळी टाळाव्यात. फळभाज्या खाव्यात. मूग, मसूर चालेल.

५. कोशिंबिरी शक्यतो टाळाव्यात. खायच्याच असल्यास तूप- जिर्‍याची फोडणी देऊन किंवा अगदी कमी प्रमाणात आणि शक्यतो फक्त दुपारी खाव्यात.

६. रात्रीच्या जेवणात भात-आमटी किंवा मिरे पावडर घालून सूप घेता येईल. जेवणाची वेळ उशिराची, म्हणजे रात्री ८ वाजल्यानंतर असेल, तर पोळी कमी घ्यावी. रात्री ताक टाळावे. ताकात आले किसून घालावे आणि फोडणी देऊन प्यावे. दिवसाही ताक प्यायचे असल्यास जिरे, मिरे पावडर घालून प्यावे. दही पूर्णच टाळावे.

७. तोंडाला चव यावी; म्हणून पुदिना-आले चटणी, कमी तिखट खोबरे-लसूण चटणी, कढीपत्ता चटणी आणि नारळ चटणी घ्यावी.

८. व्यायाम कमीच करावा. साधारणपणे काखेत आणि कपाळावर थोडा घाम आला की, व्यायाम थांबवावा. पावसाळ्यात शारीरिक शक्ती न्यून असल्याने व्यायामाने वात अधिक वाढू शकतो.

९. अंगाला प्रतिदिन तेल लावावे. कोमट तीळ तेल उत्तम.

१०. जेवल्यावर पोट जड होत असेल, तर आल्याचे पाचक किंवा सुंठ गुळाची छोटी गोळी किंवा सुंठ खडीसाखर बनवून खावे.

११. घरात सुद्धा पायात मोजे असावेत. कान, छाती, पाय यांचे थंडीपासून रक्षण करावे. दुचाकीवर पावसाळ्यात फिरणे झाले असेल, तर आले, सुंठ किंवा गरम पाणी प्यावे. कारमध्ये शक्यतो हिटर लावावा.

१२. सध्याच्या काळात ओला किंवा ओलसर मास्क वापरायला नको. बाहेरून आलो की, गरम पाणी प्यावे. ओले केस लगेच कोरडे करावेत.

१३. आयुर्वेदातील बस्ती आणि अभ्यंग ह्या चिकित्सा उपयुक्त.

१४. संध्याकाळी धूपन अवश्य करावे.

या धर्तीवर उष्ण आणि स्निग्ध आहार-विहार ठेवला असता पावसाळा प्रकृतीपूर्ण जातो.

२. कोणते पदार्थ खाऊ शकतो ? 

१. नाश्ता (न्याहरी) : उपमा, घावन, थालीपीठ – लोणी, उकड, आंबील, आंबोळी, डाळ-तांदूळ खिचडी, कधीतरी पोहे, शेवयांचा उपमा; कांदा, मेथी आणि कोथिंबीर घालून केलेला धपाटा – लोणी, गव्हाच्या कण्यांची खीर/उपमा, शिरा.

२. जेवण : पोळी, ज्वारी/तांदूळ भाकरी, गोड ताक, भात, आमटी (नुसते वरण टाळावे), तूप, भाजी (दुधी, पडवळ, लाल भोपळा, सर्व फळभाज्या, मूग, मसूर, लसूण, आले, कांदा).

३. रात्रीचे जेवण : भात-आमटी, मुगाची खिचडी, सूप-भात, सोलकढी-भात, पराठा तूप चटणी, मिक्स घावन, लोणी भाकरी-भाजी, धपाटा.

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (१४.६.२०२४)

(वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये यांच्या फेसबुकवरून साभार)