स्मृतीभ्रंश होऊनही प.पू. भक्तराज महाराज आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना न विसरणार्या देवद (पनवेल) आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती विजयालक्ष्मी चव्हाण (वय ८८ वर्षे) !
‘देवद आश्रमातील उत्पादन बांधणी सेवेशी संबंधित सेवा करणार्या श्रीमती विजयालक्ष्मी चव्हाण (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ८८ वर्षे) यांना वयोमानानुसार स्मृतीभ्रंश झाला आहे. त्यांना काहीही आठवत नसूनही त्या पुष्कळ आनंदी असतात. त्यांच्याविषयी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. सर्व गोष्टींचे विस्मरण होणे; पण सेवेतील साधकांविषयी प्रेम आणि कृतज्ञता वाटणे
श्रीमती विजयालक्ष्मी चव्हाण साधकांना ओळखत नाहीत. प्रतिदिन त्यांच्याकडे सेवेसाठी येणार्या साधिकांचीही नावे त्यांच्या लक्षात रहात नाहीत. ‘त्या कुठे आहेत ?’, हेही त्यांना कळत नाही; मात्र ‘मला चांगले लोक सांभाळून घेतात’, हे त्यांना कळते. ‘त्यांना त्यांच्या सेवेतील साधिकांविषयी प्रेम आणि कृतज्ञता वाटते’, असे मला जाणवते.
२. देहबुद्धी नसणे
अ. त्यांना ‘स्वतःला काही लागले आहे’ किंवा ‘स्वतःला ताप आला आहे’, अशी कशाचीच जाणीव नसते. त्यांना देहबुद्धी राहिली नाही.
आ. त्या मनाने साधनारत आहेत. ‘त्या नामजप आणि मनाने सेवा करत आहेत’, अशी जाणीव त्यांच्या अंतर्मनात आहे; मात्र त्यांना त्याची जाणीव नसल्याने त्यांचा कर्तेपणा न्यून होऊन देहबुद्धी न्यून झाली आहे.
३. मनावर झालेला सेवेचा संस्कार !
त्यांच्या मनावर नामजप आणि सेवा करण्याचा संस्कार झाल्याने त्या ‘‘सेवेला जायचे आहे’’, असे म्हणतात. त्यांचा स्थूलदेह वयोवृद्ध झाल्याने त्या सेवा करू शकत नाहीत; पण ‘त्यांची सूक्ष्म देहाने साधना (सेवा) चालू आहे’, असे मला जाणवले.
४. निःशब्द प्रार्थना करणे
त्या साधना विसरल्या नाहीत. त्या हात जोडून प्रार्थना करतात. तेव्हा त्या प्रार्थनेत शब्द नसतात. ‘त्या आतून आळवत निःशब्दपणे प्रार्थना करतात’, असे मला जाणवते. तेव्हा त्यांच्याकडे पाहून फार आनंद जाणवतो.
५. निरागस, निर्विचार आणि आनंदी
त्या निरागसपणे हसतात. त्यांचे मन लहान बाळाप्रमाणे झाले आहे. त्या प्रेमाने पहातात. तेव्हा त्यांच्याकडून प्रीतीची स्पंदने प्रक्षेपित होतात. त्यांचे मन आनंदी आणि निर्विचार असते. त्यांच्या समवेत असतांना आम्हालाही आनंद होऊन आमचे मन निर्विचार होते.
६. अनाहतचक्राच्या जागी निर्गुण पोकळी जाणवणे
मला त्यांचे अनाहतचक्र गोल फिरतांना जाणवून त्यांच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी खोलवर निर्गुण पोकळी जाणवली. ती पहातांना माझा भाव जागृत होऊन मला आनंद जाणवला.
७. श्री गुरूंच्या अनुसंधानात असणे
७ अ. ‘प.पू. भक्तराज महाराज आशीर्वाद देणार’, असे सांगणे : त्या सेवेच्या ठिकाणी येऊन बसतात, तेव्हा त्यांना कसलेही भान नसते; पण त्या श्री गुरूंच्या सतत अनुसंधानात असतात. एकदा मी त्यांना म्हणाले, ‘‘आम्हाला तुमचे आशीर्वाद असू देत’’, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘आशीर्वाद बाबा (प.पू. भक्तराज महाराज) देणार !’’ यातून ‘त्यांना अन्य कशाची जाणीव नाही; पण केवळ श्री गुरूंचे सतत स्मरण आहे’, असे लक्षात आले.
७ आ. प.पू. भक्तराज महाराज आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सतत स्मरण असणे : त्या परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीत नामजप करत बसतात. त्यांच्या अंतर्मनावर साधनेचा संस्कार झाल्याने त्यांना ‘परम पूज्य’ किंवा ‘महाशून्य’ हा नामजप करायचे लक्षात रहाते. ‘त्यांच्या मनात श्रीकृष्ण, प.पू. भक्तराज महाराज आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सतत स्मरण असते. कधी कधी त्यांच्या अंतर्मनात ‘परम पूज्य’ हा नामजप चालू आहे’, असे मला जाणवते.
देवाने मला सांगितले, ‘साधनेचा संस्कार अंतर्मनात मुरल्यावर शारीरिक स्थिती कशीही असली, तरी मनाची साधना चालू रहाते. त्यामुळे देह सोडल्यावर साधनेच्या संस्कारामुळे लिंगदेह साधनारत आणि देवाच्या अनुसंधानात रहातो.’
– सौ. कोमल जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.६.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |