गोवा येथील सौ. मीनल राजेंद्र शिंदे यांना टंकलेखनाची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !
१. साधकांच्या अनुभूतींमधून शिकणे
‘साधकांनी केलेले प्रयत्न आणि त्यांच्या अनुभूती वाचून ‘आपणही तसा प्रयत्न करूया’, असे वाटते. ही सेवा करतांना ‘ईश्वर प्रत्येक साधकाच्या माध्यमातून शिकवत असतो’, हे शिकायला मिळते.
२. बालसाधकांच्या लिखाणामधून शिकणे
बालसाधकांच्या लिखाणाचे टंकलेखन करतांना किंवा त्यांनी केलेले नाविन्यपूर्ण भावप्रयोग वाचतांना ‘प्रत्येक गोष्टीत भाव कसा ठेवायचा ?’, हे मला शिकायला मिळते.
३. सेवा करतांना देहाचा विसर पडणे आणि मन एकाग्र होणे
सेवा करतांना मला देहाचा विसर पडतो. जेव्हा मी सेवेत असते, तेव्हा मला शारीरिक दुखण्याचा विसर पडतो. धारिका टंकलेखन किंवा वाचन करतांना मला स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडतो आणि माझे मन एकाग्र होते. अनेकदा मला वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटते.
४. पूर्वी धारिकेला नाव देण्यापूर्वी सर्व लिखाण वाचावे लागणे; परंतु आता थोडे लिखाण वाचले, तरी देवाच्या कृपेने लिखाणासाठी आपोआप नाव सुचणे
मासिकांतील लिखाण टंकलेखन करण्यासाठी माझ्याकडे येते. लिखाण टंकलेखन करण्यासाठी आल्यानंतर सर्वप्रथम त्या लिखाणाला, म्हणजे धारिकेला नाव देण्याची कार्यपद्धत आहे. पूर्वी मला संबंधित धारिकेला नाव देण्यापूर्वी सर्व लिखाण वाचून विचार करावा लागत असे; परंतु या १ – २ वर्षांमध्ये मी थोडेसे लिखाण वाचले, तरी देव आपोआप त्या धारिकेला नाव सुचवतो. काही वेळा मासिकातील विषय तेच असतात, अशा वेळी ‘धारिकेला वेगळे नाव कसे द्यायचे ?’, हे सुद्धा आपोआप सुचते. देव प्रत्येक वेळी ‘धारिकेला योग्य तेच नाव लिहून घेतो’, असे माझ्या लक्षात आले आहे.
‘परात्पर गुरुदेव, केवळ तुमच्याच कृपाशीर्वादाने माझ्याकडून सेवा होत आहे. ‘माझे मन सतत सेवेत राहो आणि आपला कृपाशीर्वाद सतत राहो’, हीच आपल्या चरणी प्रार्थना !’
– सौ. मीनल राजेंद्र शिंदे, फोंडा, गोवा. (२७.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |