संपादकीय : चीनचे शेपूट वाकडेच !

चीन व फिलिपाईन्सच्या सैनिकांमधील झडप

मराठीत एक म्हण आहे, ‘कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच !’ याचा प्रत्यय येतो तो चीनच्या कुरापतींतून ! उचापत्या थांबवेल, तो चीन कसला ? दक्षिण चीन समुद्रात नुकतीच चीन आणि फिलिपाईन्स यांच्या सैनिकांमध्ये मोठी चकमक झाली. या वेळी चीनच्या सैनिकांनी कुर्‍हाडी आणि धारदार शस्त्रे यांद्वारे फिलिपाईन्सच्या सैनिकांवर आक्रमण केले. चिनी सैनिकांच्या हातात धारदार घातक शस्त्रे असल्याचे संबंधित व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांनी फिलिपाईन्स सैनिकांच्या रायफली लुटल्या. नौकांवरील उपकरणे नष्ट केली, तसेच नौकांवर शस्त्रांद्वारे वार केले. सैनिकांचे भ्रमणभाषही हिसकावले. अर्थात् यावर चीनने नेहमीप्रमाणे सारवासारव करत हात झटकले. गेल्या वर्षी म्हणजे २२ ऑक्टोबर २०२३ या दिवशीही चीनच्या तटरक्षक नौकेने फिलिपाईन्सच्या तटरक्षक नौकेला धडक दिली होती. सप्टेंबर २०२३ मध्ये बीजिंगने दक्षिण चीन समुद्रात फिलिपाईन्सच्या मासेमारी नौका रोखण्यासाठी तरंगणारे अडथळे बसवले होते; मात्र फिलिपाइन्सने ते नंतर तोडले. अशा प्रकारे चीन सातत्याने फिलिपाईन्सला त्रास देण्यासाठी कारणे रचत आहे.

चीनने फिलिपाईन्स सैन्यासमवेत चकमक केली, तो प्रकार घडला १७ जून या दिवशी ! १५ जून २०२० या दिवशी चीनने गलवानच्या बर्फाळ खोर्‍यात भारतीय सैन्यावर रानटी पद्धतीने आक्रमण केले होते. या वेळी भारतीय सैनिकांनीही चीनला सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्यात चीनचे ४० हून अधिक सैनिक ठार झाले, तर २० भारतीय सैनिकांना वीरमरण आले. चीनने फिलिपाईन्सच्या संदर्भात जे काही केले, त्यामुळे गलवान येथील चकमकींची आठवण झाली. येथे भेद एवढाच की, भारताने प्रत्युत्तर देऊन चिनी सैनिकांना अद्दल घडवली; मात्र फिलिपाईन्सचे सैनिक हतबल दिसले. चीनच्या कारवाया म्हणजे वाटते तेवढे सोपे प्रकरण नाही. चीन प्रत्येक वेळी सूडाची भावना धगधगत ठेवतो आणि त्याची परिणती हिंसेत होते. हे संपूर्ण जग जाणतोच !

चीनचे धोरण विस्तारवादी आहे. त्यामुळे चीनचा सगळ्याच भूभागांवर डोळा आहे. अन्य राष्ट्रांचा कोणत्याही सीमेत प्रवेश झाला की, ‘ती आमचीच आहे’, असा पुनरुच्चार चीनकडून वारंवार केला जातो. केवळ पुनरुच्चारच नव्हे, तर नकाशामध्ये तो संबंधित भाग दाखवून त्यावर स्वतःची मालकी असल्याचे चीनकडून सांगितले जाते. चीनच्या अशा मानसिकतेचा फिलिपाईन्ससह तिबेट, तैवान आणि भारतालाही सामना करावा  लागत आहे. ही चीनची एकाधिकारशाही सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन मोडून काढायला हवी. चीनच्या या हिंसक मनोवृत्तीमुळे चीनकडून वारंवार हिंसक प्रकार केले जातात. त्यांना पायबंद घालायला हवा.

 चीनच्या धमक्यांच्या विरोधात २६ देशांचे संघटन !

महासत्तेच्या महत्त्वांकाक्षेच्या लालसेने चीन झपाटलेला आहे. त्यामुळे अन्य राष्ट्रांना धमक्या देण्यातही तो मागे नाही. मध्यंतरी भारताने सीमेवर सैनिकांची संख्या वाढवली, तर चीनने थयथयाट करत सांगितले, ‘तातडीने सैनिक हटवा. सैनिक वाढवल्यास सीमेवर तणाव वाढेल.’ काही वर्षांपूर्वी दिलेल्या धमकीत म्हटले होते की, भारताने रक्तरंजित संघर्षासाठी सिद्ध व्हावे ! तैवानला वेगळे करू पहाणार्‍यांना धमकावत चीनने सांगितले, ‘चीनपासून तैवानला वेगळे करणार्‍यांचा नाश होईल !’ तैवानचे उपराष्ट्रपती विलियम लाई हे मागील वर्षी तैवानचे पुढील राष्ट्रपतीपदाचे प्रबळ दावेदार असल्याने त्यांनी चीनवर टीका केली होती. त्या वेळी चीनने ‘तैवानला याचे परिणाम भोगावे लागतील’, अशी धमकी दिली होती. ‘कोरियाच्या युद्धात हस्तक्षेप करू’, अशी धमकीही चीनने दिली होती. थोडक्यात काय, तर ‘चीन आणि धमकी’ हे समीकरण आता सर्वश्रुत झाले आहे. त्यामुळे चीनचा सामना करण्यासाठी जगातील २६ देश एकत्र आले आहेत. त्यांत भारताचाही समावेश आहे. हे देश जगातील सर्वांत मोठा नौदल सराव करणार आहेत. यांमध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इस्रायल, जपान, मलेशिया, मेक्सिको, नेदरलँड, न्यूझीलंड, सिंगापूर, श्रीलंका यांसह अन्य देश सहभागी झाले आहेत. अशा प्रकारे सर्व देशांचे व्यापक संघटन पहाता सर्वांसाठी डोकेदुखी ठरणार्‍या चीनच्या प्रश्नाला कायमस्वरूपी पूर्णविराम मिळेल, अशी आशा आहे. सर्व देशांनी मिळून चीनच्या विरोधात आघाडी उघडली, हे एकाअर्थी चांगलेच आहे; मात्र एवढे पुरेसे नाही. चीनची भक्कम अर्थव्यवस्था आणि युद्धसज्जता यांमुळे तो कुणालाही जुमानेसा झाला आहे. गलवान येथील घटनेनंतर चीनला कोण धडा शिकवू शकतो, तर तो भारत आहे, हे जगाने पाहिले. त्यामुळे भारताकडून अनेक देशांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

भारताने स्वयंसिद्ध व्हावे !

चीनला भारताच्या अंतर्गत सूत्रांमध्ये सारखी ढवळाढवळ करायची सवयच झाली आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान या संदर्भातील विषयांमध्ये तो वारंवार उडी घेऊन भारताला उपदेश (?) देण्याचा प्रयत्न करत असतो. भारताच्या संदर्भात चीनकडून केल्या जाणार्‍या उद्दामपणाला काही अंशी भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हेही कारणीभूत आहेत; कारण त्यांनी चीनच्या संबंधांमध्ये प्रत्येक वेळी उदारपणा दाखवला, तसेच चीनसमवेतच्या चर्चेत आदर्शवादाला महत्त्व दिले. त्यामुळे चीन भारतावर वर्चस्व गाजवू पहात आहे. नेहरूंच्या कचखाऊ धोरणाचाच हा परिणाम म्हणावा लागेल.

नव्याने सत्तेवर आलेल्या भाजप शासनाने चीनचा सीमावाद नष्ट करण्यासाठी आता वेगाने पावले उचलणार असल्याचा निश्चय केला आहे. ‘इंडिया फर्स्ट’ हे परराष्ट्र धोरण राबवण्याचे ठरवले आहे, तसेच परराष्ट्रनीती अंतर्गतही बर्‍याच सुधारणा करून नवनवीन धोरणे अवलंबण्याचा निश्चय केला आहे. चीनचा वाढता धोका ओळखून भारताने सुरक्षाव्यवस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. अन्य राष्ट्रांनीही चीनच्या संदर्भात कठोर धोरण सिद्ध करण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत चीनने जे केले, ते कधीही न विसरता येण्यासारखे आहे. अशा कुकृत्यांमुळे प्रत्येक देशात नाक खुपसणारे चीन हे राष्ट्र सर्वार्थाने गुन्हेगारी राष्ट्र ठरते. अशा गुन्हेगारी राष्ट्राच्या उत्पादनांवर सर्वांनी बहिष्कार घातल्यासच हे राष्ट्रघातकी संकट दूर होऊ शकते. हे बहिष्काराचे शस्त्र वापरणे कालसुसंगत आणि श्रेयस्कर ठरेल, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे. याच्याच जोडीला भारताने अर्थव्यवस्थेचा वेग आणखी वाढवल्यास शत्रूराष्ट्रांपासून भारत सुरक्षित होईल !

चीनच्या उद्दामपणाला काँग्रेसचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे कचखाऊ धोरणच कारणीभूत आहे !