India China Direct Flights : भारत आणि चीन यांच्यातील थेट विमान वाहतूक पुन्हा चालू करण्यास भारताचा नकार !
गलवानमधील हिंसाचारानंतर भारताने बंद केली होती चीनशी थेट विमान वाहतूक सेवा
बीजिंग (चीन) – गलवानमध्ये वर्ष २०२० मध्ये भारताचा विश्वासघात करणे चीनला महागात पडले आहे. भारताने गेल्या ४ वर्षांपासून चीनसाठी थेट विमानसेवा बंद केली असून ती चालू करण्याची चीन सातत्याने मागणी करत आहे. चीनची ही मागणी भारताने पुन्हा एकदा फेटाळून लावली आहे. ‘जोपर्यंत सीमावाद चालू आहे, तोपर्यंत चीनसमवेतचे संबंध सामान्य होणार नाहीत’, असे भारताने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर चिनी नागरिकांना व्हिसा देण्याविषयीही भारताने कठोर भूमिका घेतली आहे. गलवान हिंसाचारानंतर भारताने चिनी नागरिकांना अल्प प्रमाणात व्हिसा (विदेशी नागरिकांना देशात काही कालावधीसाठी वास्तव्य करण्याची अनुमती) दिला आहे. भारत सरकारचे धोरण आता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेवर आहे. त्यामुळे चिनी विमान आस्थापनांची मोठी हानी होत आहे.
गलवान खोर्यात चिनी सैन्याने भारतीय सैन्यावर आक्रमण केले होते. यात भारताच्या २० सैनिकांना वीरगती प्राप्त झाली होती; मात्र त्याच वेळी चीनचे ४० हून अधिक सैनिक ठार झाले होते. भारतीय सैनिकांच्या मृत्यूनंतर भारताने चीनविरोधात भूमिका कठोर केली आहे. भारताने ‘टिक टॉक’सह डझनभर चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. एवढेच नाही, तर भ्रष्टाचारात गुंतलेल्या चिनी आस्थापनांवर भारताने जोरदार कारवाई केली. तरीही सीमेवर दोन्ही बाजूंचे ५०-५० सहस्रांहून अधिक सैनिक तैनात आहेत. गलवान संघर्षानंतर भारताने चिनी आस्थापांवर भारतात गुंतवणूक करण्यासाठी अनेक निर्बंध लादले आहेत. भारत आणि चीन यांमधील थेट प्रवासी उड्डाणे बंद असली, तरी थेट मालवाहू उड्डाणे चालू आहेत.
चीनकडून विमान वाहतूक चालू करण्यास भारताला आवाहन !
कोरोना महामारीनंतर चीन त्याच्या विमान उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे; पण त्यात यश मिळत नाही. भारतातील विमान वाहतूक उद्योग सातत्याने भरभराटीला येत आहे. गेल्या वर्षभरापासून चीन सरकार आणि त्याची विमान आस्थापने भारताला थेट उड्डाणे चालू करण्याची विनंती करत आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने नुकतेच सांगितले, ‘आम्हाला आशा आहे की, भारत नागरी उड्डाण सेवा चालू करण्याच्या संदर्भात चीनसमवेत एकत्र काम करेल जेणेकरून थेट विमानसेवा पुन्हा चालू करता येईल.’
‘थेट उड्डाणे पुन्हा चालू केल्याने दोन्ही देशांना लाभ होईल’, असे चीनने म्हटले आहे. चीनच्या या इच्छेवर एका भारतीय अधिकार्याने सांगितले की, सीमेवर शांतता असल्याखेरीज इतर संबंध प्रगती करू शकत नाहीत.
संपादकीय भूमिकाभारताने चीनच्या विरोधात असेच आक्रमक धोरण अवलंबले, तरच तो वठणीवर येईल ! |