Israel Hamas War : हमासला पूर्णपणे संपवता येणार नाही ! – इस्रायलच्या सैन्याधिकार्याचे विधान
तेल अविव (इस्रायल) – गाझा पट्टीमध्ये गेल्या ८ महिन्यांहून अधिक काळ युद्ध चालू असूनही इस्रायलला अपेक्षित यश मिळालेले नाही. त्याचा नकारात्मक परिणाम देशाच्या सैन्यातील उच्च अधिकारी आणि पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यातील संबंधांवरही दिसून येत आहे. इस्रायलच्या सैन्याच्या प्रवक्त्याने ‘हमासला पूर्णपणे संपवता येणार नाही’, असे विधान केले आहे. या विधानामुळे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या ‘हमासचा संपूर्ण नाश करणे, हे सरकारच्या युद्धाचे सर्वांत महत्त्वाचे उद्दिष्ट आहे’, या दाव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या विधानाची इस्रायलमध्ये चर्चा होत असून सैन्याच्या स्पष्टीकरणानंतरही याकडे ‘सरकारशी संघर्ष’ म्हणून पाहिले जात आहे.
इस्रायलच्या सैन्याचे प्रवक्ते रियर एडमिरल डॅनियल हागारी यांनी ‘चॅनल १३’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ‘हमासचा पूर्णपणे निःपात केला जाऊ शकतो’, असे म्हणणे म्हणजे जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासारखे आहे. गाझामध्ये कोणताही आतंकवादी, सैन्य अधिकारी, रॉकेट आणि सशस्त्र माणसे नसतील, असे जनतेला सांगणे खोटे आहे. गाझामध्ये दहशत निर्माण होईल. हमास ही गाझाच्या रहिवाशांच्या हृदयात खोलवर रुजलेली कल्पना आहे.
हागरी यांच्या या विधानानंतर सैन्याने स्पष्टीकरण देतांना म्हटले की, सैन्य सरकारच्या युद्ध उद्दिष्टांसाठी वचनबद्ध राहिले आणि हगारी केवळ एक विचारधारा म्हणून हमासविषयी बोलत होते.