महाविकास आघाडीचा विजय ही तात्पुरती सूज ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मुंबई – महाविकास आघाडीचे उमेदवार कसे जिंकले, ते महाराष्ट्राला ठाऊक आहे. मुसलमान मतांच्या जोरावर उद्धव ठाकरे यांनी ९ जागा जिंकल्या. महाविकास आघाडीचा विजय ही तात्पुरती सूज आहे, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात केले.
या वेळी शिवसेनेचे नेते रामदास कदम, गुलाबराव पाटील, शिवसेनेचे उपनेते शरद पोंक्षे यांनीही भाषणे केली. या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत घटना पालटणार, आरक्षण रहित करणार, या विरोधकांच्या खोट्या कथानकावर विश्वास ठेवून जनतेने मतदान केले; परंतु येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता ती चूक करणार नाही. कोकण, ठाणे, छत्रपती संभाजीनगर असे पारंपरिक बालेकिल्लेही आम्हीच सर केले. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची, यावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे.’’