प्रतिकारक्षमता वाढवणारा योगाभ्यास !
योग व्यक्तीतील प्रतिकारक्षमता तर वाढवतोच; पण विषाणूच्या प्रतिबंधासाठीही तो तितकाच आवश्यक आहे. योगाभ्यासामुळे शरिरात रोगप्रतिबंधात्मक शक्ती निर्माण होते. योगाभ्यास न केवळ रोग बरे करतो, तर रोग होऊ नयेत म्हणून शरीर प्रतिकारक्षम करतो. प्राणायामाने व्यक्तीला अनन्यसाधारण लाभ होतात. कपालभाती ६ मास करून शरीर सक्षम झाल्यावर प्राणायम केल्यास त्याचा लाभ होतो.
कपालभाती क्रिया
कृती : प्रथम पद्मासनात किंवा सुखासनात बसावे. पाठीचा कणा ताठ ठेवावा आणि हाताचे तळवे आकाशाच्या दिशेला उघडून गुडघ्यांवर ठेवावेत. प्रथम दीर्घ श्वास (पूरक) घ्यावा. नंतर कृतीला आरंभ करतांना पोट झटक्यात आत घेऊन उच्छ्वास (रेचक) करावा. रेचक (ही कृती) परत परत काही वेळ (दम लागेपर्यंत) करावी आणि थांबायच्या वेळी पोट बाहेर काढत दीर्घ श्वास घेऊन थांबावे.
लाभ : यामुळे शरीर आणि मन या क्रियेद्वारे मानसिक प्रक्रिया संतुलित रहाते. याद्वारे आपल्या शरिरातील ८० टक्के विषारी द्रव्ये श्वासावाटे बाहेर टाकली जातात. फुफ्फुसाचे कार्य सुरळीत होते. नाक आणि कपाळ यांच्या हाडातील पोकळ्या स्वच्छ होतात. कपालभाती प्रतिदिन ५ मिनिटे केल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
भस्रिका
कृती : पद्मासनात बसून मान आणि शरीर ताठ ठेवून तोंड बंद ठेवावे. नंतर जलदगतीने श्वास आत-बाहेर करत पोट संकुचित करून त्याचा संकुचित भाग वाढवत जावा. असे करतांना नाकातून ‘भूस भूस’ असा आवाज येतो. पहिल्यांदा १० वेळा करून पहावे. काही वेळ ध्यानस्थ बसून पुन्हा हीच क्रिया करावी.
लाभ : या प्राणायामामुळे पोटातील जळजळ न्यून होते. नाक आणि छाती यांच्याशी संबधित आजार न्यून होतात. शरिरात प्राणवायू चांगल्या प्रमाणात पोचतो. या प्राणायामामुळे वात, पित्त आणि कफ संतुलित होऊन त्यांचे त्रास कायमचे नाहीसे होतात. यामुळे कुंडलिनी जागृत होण्यास साहाय्य होते.
भ्रामरी क्रिया
कृती : दीर्घ श्वास (पूरक) घेतांना तो तोंडात घुमवून नर मधमाशीसारखा आवाज करा. त्यामुळे निर्माण होणारा कंप शरीरभर जाणवू द्या. मग श्वास आपोआप थांबू द्या. श्वास सोडतांना स्त्री मधमाशीसारखा सुंदर आवाज करा. क्षणभर थांबून अशी आवर्तने अनेक वेळ करा. ही क्रिया करतांना अंगठा कानाच्या भोकावर ठेवून अन्य बोटे गाल आणि डोळ्याखालची खोबणी या ठिकाणी ठेवून हलकासा दाब द्यावा.
भ्रामरी प्राणायाम
भ्रामरीची क्रिया करतांना दीर्घ पूरक केल्यावर यथाशक्ती कुंभक (बंध) लावावे. सोडल्यावर रेचक करतांना स्त्री भुंग्यासारखे गुंजन स्वरयंत्रातून (नाकातून नव्हे) करावे.
लाभ : मनाची अस्थिरता, निराशा, काळजी, राग न्यून होणे, अर्धशिशी दूर होणे, एकाग्रता वाढणे, अवर्णनीय आनंदाची अनुभूती येणे.
अनुलोम विलोम क्रिया
कृती : पद्मासनाच्या स्थितीत चित्त आणि मन केंद्रीत करण्याचा प्रयत्न करावा. एका हाताचा अंगठा नाकाच्या उजव्या नाकपुडीवर ठेवून ती नाकपुडी बंद करावी आणि डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यावा. त्यानंतर उजव्या नाकपुडीवरील अंगठा काढून अनामिकेचे बोट डाव्या नाकपुडीवर ठेवावे आणि त्याच वेळी श्वास उजव्या नाकपुडीने सोडावा. परत उजव्याच नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यावा आणि डाव्या नाकपुडीने सोडावा. डाव्या नाकपुडीने सोडतांना अंगठा परत पहिल्याप्रमाणे उजव्या नाकपुडीवर येईल. हे एक चक्र पूर्ण होईल. अशी क्रिया ५ ते १० वेळा करावी.
अनुलोम विलोम प्राणायाम
अनुलोम विलोम क्रियेत दीर्घ श्वास घेतल्यावर (पुरक) यथाशक्ती कुंभक लावावे. नंतर कुंभक सोडून श्वास सोडावा (रेचक करावे.)
लाभ : ताण, मानसिक रोग, हृदयाशी सबंधित आजार, सर्दी, ताप, खोकला, अस्थमा, उच्च रक्तदाब, डोकेदुखी, सायनस आणि आर्थरायटीस इ. व्याधींवर हा प्राणायाम उपयुक्त आहे.
(संदर्भ : सनातननिर्मित ग्रंथ ‘हठयोग’ आणि अन्य संकेतस्थळे)