पाश्चात्त्यांनी विज्ञानाद्वारे सिद्ध केले योगाभ्यासाचे महत्त्व !
१. पतंजलींच्या ‘योगसूत्रां’वर २ सहस्र वर्षांत अनेक विद्वानांनी काही शेकडो ग्रंथ लिहिणे !
पतंजलींनी लिहिलेला ‘योगसूत्र’ (अनुमाने इ.स.पूर्व १०० ते वर्ष ३००) हा योगशास्त्राचा प्रमाण ग्रंथ. योगासंबंधीचे प्रचंड सैद्धान्तिक ज्ञान केवळ १९६ सूत्रांमध्ये ग्रंथित करण्यात आले आहे. गेल्या २ सहस्र वर्षांत अनेक विद्वान आणि आचार्य यांनी यावर काही शेकडो भाष्ये अन् टीकाग्रंथही लिहिले आहेत. पतंजलींनी योगशास्त्र सूत्रबद्ध करण्यापूर्वीही हा विषय कठोपनिषदासारख्या उपनिषदांमधून (अनुमाने इ.स. ५००-३०० ते पहिले शतक) मांडण्यात आला होता. तसेच या योगाचे तत्त्वज्ञान आणि प्रत्यक्ष व्यवहारही भारताची दर्शनशास्त्रे, आयुर्वेद यांपासून ते कलांच्या शास्त्रांमध्येही मुक्तपणे वापरण्यात आले आहे.
२. दुर्दैवाने भारतातच हे योगशास्त्र आज प्राणायाम आणि आसने यांच्या पलीकडे जातांना दिसत नाही.
३. भारतातील संतांमुळे भारतीय संस्कृतीविषयीचे कुतूहल पाश्चात्त्य जगात वाढून योगामुळे प्राप्त होणार्या सिद्धी वैज्ञानिक कसोट्यांवर पडताळण्यास आरंभ होणे !
१९ आणि २० या शतकांमध्ये भारतातील काही संत, महंत आणि स्वामी यांच्यामुळे भारतीय संस्कृतीविषयीचे कुतूहल पाश्चात्त्य जगतामध्ये वाढले. एरवी साधू किंवा विचारवंत यांच्यापर्यंत सीमित असलेला योग हा विषय नवशिक्षितांना, विशेषतः विज्ञानवाद्यांना आकर्षणाचा वाटू लागला. मॅक्स प्लँक (Max Planck) आणि अल्बर्ट आइन्स्टाइन (Albert Einsten) यांच्या पुंज अन् सापेक्षतावाद्यांनी विज्ञानातच नाही, तर तत्त्वज्ञानातही एक प्रचंड क्रांती घडवली. ग्रीक तत्त्वज्ञानाच्या व्यतिरिक्त हिंदु, बौद्ध आणि जैन तत्त्वज्ञानांकडेही त्यांचे लक्ष वेधले गेले. एवढेच नाही, तर विज्ञानाच्या नवीन सिद्धांतांचे उपनिषदांमधील अनेक विचारांशी त्यांना साधर्म्य दिसू लागले. नील्स बोहर (Niels Bohr), श्रोडिंगर (Schrodinger) इत्यादी प्रथम श्रेणीतील (अव्वल दर्जाच्या) वैज्ञानिकांनी या संदर्भात व्यक्त केलेले विचार मुळातच वाचायला हवेत. शुद्ध तत्त्वज्ञानाच्या काही गोष्टी आपण बाजूला ठेवल्या, तरी योगामुळे प्राप्त होणार्या अनेक सिद्धी या वैज्ञानिक कसोट्यांवर पडताळण्याचा (तपासण्याचा) आरंभ यामुळेच झाला.
४. ‘योगसाधनेच्या सर्व अंगांचा वस्तूनिष्ठ अभ्यास केल्याने सिद्धी प्राप्त होणे’, हे वास्तव सिद्ध होणे
वर्ष १९६० च्या दशकानंतर अमेरिकेत आणखी एक क्रांती होत होती. प्रचंड आर्थिक आणि भौतिक सुखांमध्ये डुंबल्यावरही अमेरिकेतील नवीन पिढीला खर्या सुखाची प्राप्ती होत नव्हती. यातूनच ‘हिप्पी’ आणि तत्सम अनेक संप्रदाय जन्माला आले. भोगापासून योगापर्यंतचे अनेक पर्याय त्यांनी शोधायला आरंभ केला. मारक औषधांच्या सेवनातून स्वप्नांच्या जगतात ते तरंगायला लागले; पण औषधांचा अंमल उतरल्यावर स्वप्नातून त्यांना वास्तवातच यावे लागत होते. त्यामुळे योगसाधनेच्या संदर्भात जेव्हा जास्त चिकित्सा व्हायला लागली, तेव्हा साहजिकच त्याच्या सर्व अंगांचा वस्तूनिष्ठ अभ्यास व्हायला लागला. ‘योगसाधनेतून ज्या सिद्धी प्राप्त होतात’, तो एखादा चमत्कार किंवा थोतांड नसून ते वास्तव असल्याचे हळूहळू सिद्ध होऊ लागले.
५. विज्ञानाला अशक्य वाटणार्या गोष्टी योगामुळे शक्य होत असल्याचा अहवाल शास्त्रज्ञाने प्रसिद्ध करणे
१९६२ या वर्षी जो कामिया (Joe Kamiya) या जैवमानस शास्त्रज्ञाने अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने प्रथमच योगसिद्धींच्या वास्तवासंबंधी वैज्ञानिक अहवाल प्रसिद्ध केला. विज्ञानाला अशक्य वाटणार्या गोष्टी, म्हणजे हृदयाचे स्पंदन किंवा श्वसनक्रियेचा वेग अल्प-अधिक करणे, हे योगामुळे शक्य असल्याचे यातून सिद्ध झाले. रूढ (Classical) शरीरक्रियाशास्त्र आणि मस्तिष्कविज्ञान (Physiology आणि Brain Science) यांच्या समजुतींमध्ये यामुळे मोठी क्रांती घडून यायला लागली.
६. ‘योगसाधनेने अनेक अनैच्छिक शारीरिक क्रिया या ऐच्छिक असल्यासारख्या करता येतात’, हे सिद्ध होणे
माणसाच्या शरिराच्या अनेक क्रिया या स्वैच्छिक (Voluntary) असतात, उदा. हात-पाय हालवणे, पापण्यांची हालचाल करणे इत्यादी क्रिया आपल्या इच्छेच्या अधीन असतात. याउलट मेंदूच्या क्रिया, हृदय, यकृत, आतडी इत्यादींची स्पंदने अनैच्छिक (Involuntary) आहेत. या क्रिया चालवणारी व्यवस्था ही स्वयंचलित असून ती आपल्या इच्छेच्या अधीन नाही. शरिराची स्वैच्छिक कार्ये आपण जाणीवपूर्वक करत असतो, तर अनैच्छिक कार्ये आपल्याला न समजता होत असतात.
डॉ. एल्मर ग्रीन (Elmer Green) या संशोधकाने स्वामी राम या योग्यावर या संदर्भातील अनेक प्रयोग केले. योगसाधनेने अनेक अनैच्छिक (Involuntary) शारीरिक क्रिया या ऐच्छिक असल्यासारख्या करता येतात, हे यामुळे साधार सिद्ध झाले. यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे योगसाधनेमुळे सामान्यातल्या सामान्य माणसालाही या गोष्टी प्राप्त करून घेता येतात, हेही सिद्ध झाले.
७. शरीर, मन आणि निसर्ग यांच्यामध्ये एकत्व आणणे, हेच पतंजलींच्या योगशास्त्राचे अंतिम उद्दिष्ट
ही एक मोठी क्रांतीच होती. आज या विषयावर अभ्यासकांकरता प्रचंड साहित्य उपलब्ध आहे. हा सर्व प्रकार योगाचाच एक भाग असलेल्या हठयोगाशी संबंधित आहे; पण योग म्हणजे केवळ हठयोग नाही. योग हा शब्द ‘युज्’ म्हणजे ‘जोडणे’ या अर्थाने आहे. प्राथमिक स्तरावर मन आणि शरीर यांचे ऐक्य आधी साधले जाते. हठयोगामुळे मनाने शरिरावर मिळणार्या प्रभुत्वापुरतेच पतंजलींचे योगशास्त्र मर्यादित नाही. यापुढे जाऊन शरीर, मन, निसर्ग आणि एकंदर परिसर यांच्यामध्ये एकत्व आणणे, हेच योगाचे अंतिम उद्दिष्ट आहे. वास्तवामध्ये ते तसे असतेच; पण मनुष्य अज्ञानामुळे ते स्वतंत्र असल्याचे समजतो. योगशास्त्राच्या अभ्यासामुळे हे अज्ञान दूर होते आणि मन, शरीर अन् परिसर यांचे परस्परावलंबित्व आपल्याला समजते. अनियंत्रित मानवी लालसेने निसर्गाच्या केलेल्या हानीमुळे बिघडलेले पर्यावरणाचे संतुलन, हे याचे जिवंत उदाहरण आहे.
८. समाधी किंवा कैवल्य ही योगाची अंतिम पायरी असणे आणि त्यात सिद्धी या अडथळे निर्माण करू शकणे
योगशास्त्रामुळे या विश्वाच्या एकतेची जी प्रत्यक्ष जाणीव होते, ती ‘जाणीव’ म्हणजेच ‘कैवल्या’ची स्थिती. योगाचे अंतिम ध्येय हे हठयोगामुळे प्राप्त होणार्या सिद्धी नाही, तर ‘समाधी’ किंवा ‘कैवल्य’ ही त्याची अंतिम पायरी आहे. एवढेच नाही, तर ‘अशा सिद्धी या अंतिम ध्येयामध्ये अडथळे निर्माण करू शकतात’, अशी धोक्याची सूचनाही स्वतः पतंजलींनी देऊन ठेवली आहे.
९. राग, लोभ, मत्सर आणि मनाचा चंचलपणा हे अडथळे दूर करण्याचा सर्वांत सोपा उपाय म्हणजेच ‘योगदर्शन’ !
सर्व हिंदु धर्मग्रंथांचा आणि धार्मिक साहित्याचा हेतू एकच आहे आणि तो म्हणजे माणसाला नीतीमूल्यांचा आदर करायला शिकवणे. राग, लोभ, मत्सर आणि मनाचा चंचलपणा हे नेहमीच सद्धर्मामध्ये येणारे मोठे अडथळे आहेत. हे अडथळे दूर करण्याचा सर्वांत सोपा आणि साधा उपाय म्हणजेच पतंजलींनी आसनापलीकडील सांगितलेले ‘योगदर्शन’.
– संपादक : डॉ. विजय वासुदेव बेडेकर (संदर्भ : त्रैमासिक ‘सद्धर्म’, जुलै २०१५)