योग करा… मधुमेह घालवा !

हल्ली मधुमेह (डायबिटिस) हा आजार एका ठराविक वयानंतर जणू अपरिहार्य झाल्याप्रमाणे बहुसंख्य जणांमध्ये आढळतो. काहींना तर लहान वयातही मधुमेह होत असल्याचे आता लक्षात येत आहे. त्यामुळे आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार (‘मेडिकल सायन्स’नुसार) त्यावर विविध औषधे, प्रतिदिन घेण्याची औषधे, पुढच्या टप्प्याला ‘इन्सुलिन’चे इंजेक्शन, वारंवार साखरेचे प्रमाण पडताळण्याच्या चाचण्या आदी गोष्टी आधुनिक मानवाच्या जीवनाचा भाग होऊन जातात. या सर्व पार्श्वभूमीवर प्राचीन भारतीय जीवनशैली अंगीकारल्यास बहुसंख्य रोगांपासून दूर रहाता येते, असे लक्षात येते. यामध्ये खाणे-पिणे, झोपणे आदींच्या सवयी, योगाभ्यास, उपासना आदी गोष्टींचा समावेश होतो. नियमित आणि योग्य पद्धतीने केलेल्या योगाभ्यासाने मधुमेहाची मूळ कारणेच नाहीशी होतात. योगाभ्यासामुळे मधुमेह नियंत्रणात राहून प्रसंगी त्याची तीव्रता अत्यल्प म्हणजे नसल्याप्रमाणेच होते. यासाठी मधुमेह बरा करणार्‍या काही योगासनांची येथे ओळख करून घेऊ.

सौ. वैदेही कुलकर्णी

१. भुजंगासन

कृती : सर्वप्रथम पोटावर झोपा. कपाळाचा स्पर्श भूमीला होऊ द्या. दोन्ही तळवे  कपाळाजवळ भूमीवर ठेवा. आता श्वास घेत घेत सावकाश प्रथम कपाळ, छाती, पोट शक्य तितके मागे न्या. या स्थितीत कुणाची पाठ दुखत असेल, तर तळहात पाठीमागे कोपर्‍यात दुमडून तो कमरेवर ठेवा. मनात शांतपणे हळूहळू १ ते १० अंक मोजा. नंतर श्वास सोडत हळूहळू खाली या. कपाळाचा स्पर्श पुन्हा भूमीला करा. ही क्रिया ३ वेळा करा.

ही कृती कपाळाजवळ, खांद्याजवळ आणि छातीजवळ हात ठेवून प्रत्येकी ३ वेळा करा.

लाभ

१. दमा, बद्धकोष्ठता, मधुमेह, पाठदुखी, ‘थायरॉईड’ या आजारांसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त आहे.

२. यामुळे पाठीचा कणा लवचिक आणि मजबूत बनतो.

३. पचनेंद्रिये आणि गर्भाशय यांचे आरोग्य सुधारते.

४. गळ्यातील सर्व दोष दूर होतात.

५. हातात ताकद येऊन हात मजबूत होतात.

६. मानेच्या मणक्यातील दोष दूर होतात.

७. मासिक पाळी आणि त्या वेळच्या पोटदुखीच्या समस्या दूर होतात.


२. वक्रासन

कृती : पाय पसरून बसा. उजवा पाय गुडघ्यात दुमडून त्याचे पाऊल डाव्या पायावरून गुडघ्याच्या पलीकडच्या बाजूला ठेवून पाय उभा ठेवा. दीर्घ श्वास घ्या. आता डाव्या हाताचे कोपर उजव्या पायाच्या गुडघ्याला टेकवून तळहात पावलाला टेकवण्याचा प्रयत्न करून उजव्या बाजूने मागे वळा. दुसरा तळहात भूमीला टेकवा किंवा कमरेतून मागे अडकवा. श्वास सोडत प्रथम पोटातून छातीतून आणि मानेतून हळूहळू पूर्ण वळायचा प्रयत्न करा. श्वास संथ गतीने चालू ठेवा. १ ते १० अंक मोजा. अशा पद्धतीने डाव्या बाजूला हीच कृती करा. ही क्रिया प्रत्येकी ७ वेळा दोन्ही पायांनी करा.

लाभ

१. मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते.

२. लिव्हर, स्वादुपिंड, मूत्रपिंड, आतडे या सर्वांचे कार्य सुधारते.

३. रक्तदाब, पाठदुखी, कंबरदुखी न्यून होते.

४. पोटातील वात न्यून होतो.

५. बद्धकोष्ठता जाऊन पोट साफ होते.


३. नमनासन किंवा शशांकासन

कृती : सर्वप्रथम गुडघ्यांवर उभे रहा आणि सावकाश दोन्ही पायांच्या टाचांवर म्हणजे  वज्रासनात बसा. हात नमस्कार मुद्रेत घ्या. दीर्घ श्वास घेत हळूहळू डोक्याच्या वर न्या.  श्वास सोडत सोडत कपाळ आणि दोन्ही हात भूमीला लावायचा प्रयत्न करा. त्यानंतर सावकाश श्वासोच्छ्वास चालू ठेवा. खाली नमस्काराच्या मुद्रेत गेल्यावर नितंब उचलू नका. १ ते १० अंक म्हणून झाले की, श्वास घेत घेत दोन्ही हात आणि कपाळ उचला. सरळ बसा. नमस्काराच्या मुद्रेतील हात खाली घ्या. ही क्रिया ७ वेळा करा.

लाभ

१. मधुमेह, श्वसनविकार, पोट आणि पाठ दुखी, खांदे आखडणे, पोटातील वात (गॅसेस) यांसाठी हे आसन उपयुक्त आहे.

२. पचनशक्ती सुधारून बद्धकोष्ठता नाहीशी होते.

३. भूक लागते, स्वादुपिंड (पॅनक्रियाज्) सक्रीय होते.

४. गर्भाशयाचे कार्य सुधारते.


४. धनुरासन

कृती : सर्वप्रथम पोटावर झोपा. दोन्ही पायांत थोडे अंतर ठेवा. आता दोन्ही पाय गुडघ्यात दुमडा. आता दीर्घ श्वास घ्या आणि पूर्ण श्वास बाहेर सोडा. श्वास बाहेर ठेवूनच उजव्या हाताने उजव्या घोट्याला पकडा आणि डाव्या हाताने डावा घोटा पकडा. आता पुन्हा श्वास घेऊन पुन्हा एकदा श्वास सोडा. श्वास बाहेर ठेवूनच कपाळ, छाती, पोट उचला आणि घोट्यांना डोक्याकडे खेचण्याचा प्रयत्न करा. १ ते १० अंक मोजा. सावकाशपणे आसन सोडा. ही कृती ७ वेळा करा.

लाभ

१. पोटाची चरबी न्यून होते. मधुमेहात ५ जोडांना (जॉइंट्सना) ताण देणे महत्त्वाचे असते. धनुरासनात या जोडांना चांगले ताणले जाते. मधुमेहाचा परिणाम जोडांवर होत नाही.

२. सर्व अवयव ताणले जातात.

३. मूत्रपिंडाला ताण बसल्याने ती क्रियाशील होतात.

४. प्रतिदिन धनुरासन केल्याने पचनसंस्था चांगली काम करते.

५. मेंदूवरचा ताण नाहीसा होतो आणि मन आनंदी होते.

६. मधुमेह, अनियमित मासिक पाळी, बद्धकोष्ठता, कमरेचे दुखणे न्यून होण्यासाठी हे आसन लाभदायक आहे.


५. सहज शलभासन

कृती : प्रथम पोटावर झोपा. हात खांद्याजवळ ठेवा. हनुवटी भूमीवर ठेवा. प्रथम डावा   पाय गुडघ्यात वाकवून पाऊल आकाशाच्या दिशेने ठेवा. मग हळूवार श्वास घेऊन श्वास सोडत उजव्या पायाचा गुडघा उंच उचलून तो डाव्या पावलावर ठेवा. उजवा पाय तिरका आकाशाच्या दिशेन राहील. १ ते १० अंक सावकाश मोजा. अशीच कृती डाव्या पायाने करा. दोन्ही पायांच्या कृती प्रत्येकी ७ वेळा करा.

लाभ

मधुमेहामुळे अतिरिक्त ताण येऊन अकार्यक्षम झालेली मूत्रपिंडे कार्यक्षम होतात आणि चांगल्या प्रकारे कार्य करू लागतात.


६. शलभासन

कृती : सर्वप्रथम पोटावर झोपा. कपाळ भूमीवर टेकवा. दोन्ही तळवे मांडीखाली ठेवा. आता उजवा पाय गुडघ्यात न वाकवता शक्य तितका वर उचला. दीर्घ श्वास घ्या. १ ते १० अंक मोजा. श्वास सोडत सोडत पाय सावकाश खाली ठेवा. डाव्या पायाने हीच कृती करा. डाव्या आणि उजव्या पायाने ही कृती प्रत्येकी ७ वेळा करा.

लाभ

१. या आसनामुळे फुफ्फुसे बलवान बनतात.

२. खांद्याच्या स्नायूंमधील ताण निघून जातो.

३. पाठीचा खालचा भाग, मणके आणि पाय मोकळे होतात.

४. पाठदुखी, जननेंद्रियांचे आरोग्य यांसाठी हे उत्तम आसन आहे.

५. मूत्रपिंडाचे (किडनीचे) विकार घालवणे, तसेच मधुमेहामुळे बिघडलेले मूत्रपिंडाचे कार्य सुरळीत करणे यासाठी हे उत्तम आसन आहे.

६. अनियमित मासिक पाळीचे चक्र सुधारण्यासाठी उपयुक्त आहे.

७. आसनामुळे स्वादुपिंड चांगले कार्यरत होते.


७. मंडुकासन

कृती : प्रथम वज्रासनात बसा. त्यानंतर दोन्ही हातांच्या मुठी करून नाभीच्या २ बोटे बाजूला पोटावर ठेवा. श्वास सोडत सोडत मुठी पोटावर दाबत दाबत कपाळ भूमीला टेकवण्याचा प्रयत्न करा. १ ते १० अंक मोजून झाले की, श्वास घेत सावकाश वर या. ही क्रिया ७ वेळा करा.

लाभ

१. या आसनामुळे मधुमेह बरा होईलच; पण बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्याही दूर होतील.

२. शरिरात उत्साह संचारेल.


८. उष्ट्रासन (उंटासन)

कृती : प्रथम गुडघ्यांवर उभे रहा. दोन्ही गुडघ्यांत अंतर ठेवा. श्वास घेत घेत प्रथम उजवा हात वर करा आणि गोलाकार फिरवत उजव्या टाचेवर तळहात ठेवा किंवा टेकवा. आता डावा हात वर करून गोलाकार फिरवत डाव्या टाचेवर तळहात टेकवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही तळहात एकाच वेळी पोचत नसतील, तर एकदा उजव्या आणि एकदा डाव्या हाताने त्या त्या पावलाला स्पर्श करा. त्यानंतर १ ते १० अंक मोजा. टाचेला तळहाताचा स्पर्श होत नसेल, तर दोन्ही पायांवर उशी ठेवून त्या उशीवर दोन्ही हात ठेवा. पायावर किंवा उशीवर न बसता पोटाची कमान करून पोटावर ताण येऊ द्या. दोन्ही हात टेकवून जमत असेल, तर तसे करा. ही कृती ७ वेळा करा.

लाभ

१. उष्ट्रासन हे मधुमेहावरील रामबाण आसन आहे. याने मधुमेह न्यून होण्यास लाभ होतो.

२. पाठदुखी, खांदेदुखी, श्वसन विकार यांवर हे अत्यंत उपयुक्त आसन आहे.

३. यामुळे मासिक पाळीच्या समस्या दूर होतात.

४. लठ्ठपणा, स्थूलता दूर होऊन पचनक्रिया सुधारते.

५. पोटातील वाताचा त्रास न्यून होतो.

६. मानदुखी (सर्वायकल प्रॉब्लेम) बरी होते.

७. दम्याचा विकार न्यून होतो.

८. टॉन्सिल्स (लसिका ग्रंथींचा समूह) आणि थायरॉईड यांचा त्रास न्यून होतो.

९. थायमस ग्लँड सक्रीय (ॲक्टिवेट) होऊन रोगप्रतिकारकशक्तीची प्रणाली सक्रीय होते.

१०. एकूणच शरीर बलवान होते.

– सौ. वैदेही कुलकर्णी, योगशिक्षिका, मेडिकल योग थेरपिस्ट, न्युरोथेरपिस्ट, पुणे.