वटवृक्षाचे माहात्म्य

आज ‘वटपौर्णिमा’ आहे. त्या निमित्ताने…

कडुलिंब, पिंपळ इत्यादी अनेक औषधी वृक्ष आहेत. वटवृक्षाचे पूजन करण्यामागे बरीच कारणे आहेत. त्यातील काही कारणे येथे देत आहे.

१. वटवृक्ष हे अक्षय, अमर्त्य, निर्माता आहे. हा वृक्ष स्वतःपासून असंख्य वृक्ष उत्पन्न करतो. मुख्य झाडातून निघणार्‍या पारंब्या भूमीत खोलवर जाऊन एक नवीन झाड सिद्ध करतात. असे करत करत अनेक झाडे उभी रहातात.

२. हे झाड २४ घंटे प्राणवायू सोडत असते.

३. वायूप्रदूषणच नव्हे, तर हे वृक्ष ध्वनीप्रदूषण रोखण्याचेही काम करतात. पूर्वी शाळा अशा झाडाखालीच किंवा त्याच्या जवळच भरायच्या. मंदिराजवळही हे झाड असायचे.

४. ही झाडे ढगांना आकर्षित करतात. त्यामुळे जिथे ही झाडे असतात, तेथे भरपूर पाऊस पडतो आणि ‘जवळपास वडाचे झाड असेल, तर विहिरीला पाणी लागणारच’, असा शेतकर्‍यांचा कयास असतो.

५. या झाडाचा घेर जगातील कुठल्याही वृक्षापेक्षा अधिक असतो आणि हे झाड भरपूर सावली देण्यास समर्थ असते.

६. वटवृक्ष हा अनेक पशूपक्ष्यांना अन्न आणि निवारा देतो. असंख्य जीवजंतू यावर जगत असतात. याची फळे खातात. या पशूपक्ष्यांची विष्ठा, मूत्र, झाडांची पडून कुजलेली पाने असे मिळून झाडाखालची भूमी सुपीक झालेली असते. ही थोडी माती शेतात टाकली, तर भूमी सुपीक होण्यास साहाय्य होते. आयुर्वेदाप्रमाणे वड हे अनेक रोग आणि संसर्ग यांवर औषधी म्हणून वापरण्यात येते.

अशा या बहुगुणी, जीवनदायी वृक्षाचे संवर्धन होऊन समाजाला कृतज्ञतेची जाणीव व्हावी आणि वटवृक्ष तोडण्याचा विचारही मनात येऊ नये; म्हणून आपल्या पूर्वजांनी या वृक्षाला पूजेचा मान दिला आहे.

– कांचन जैन (साभार : सामाजिक संकेतस्थळ)