माऊलींचे मानाचे अश्व आळंदीकडे मार्गस्थ !

११ दिवसांनंतर होणार पुण्यात आगमन !

प्रतिकात्मक चित्र

आळंदी (जिल्हा पुणे) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासमवेत आषाढी वारीला जाण्यासाठी मानकरी शितोळे सरकार यांचे मानाचे अश्व शितोळे अंकली (कर्नाटक) येथून आळंदीकडे मार्गस्थ झाले आहेत. वारीत सहभागी होण्यासाठी  आळंदीला निघालेल्या मानाच्या अश्वांची बेळगावमधील शितोळे अंकलीमध्ये ऊर्जितसिंह शितोळे सरकार आणि महादजीराजे शितोळे सरकार यांच्या हस्ते विधीवत् पूजा झाली. त्यानंतर टाळ-मृदंगाचा निनाद अन् माऊलीनामाच्या गजरात या अश्वांना अंकलीकरांनी निरोप दिला. हे अश्व ११ दिवसांचा प्रवास करून २६ जून या दिवशी पुण्यात पोचतील. त्यानंतर २८ जूनला ते आळंदीला पोचणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २९ जून या दिवशी आळंदीतून प्रस्थान होणार आहे.