जुलैपर्यंत ९० लाख ४८ सहस्र शेतकर्‍यांच्या खात्यात २ सहस्र रुपये जमा ! – धनंजय मुंडे, कृषीमंत्री

धनंजय मुंडे, कृषीमंत्री

मुंबई – ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने’च्या अंतर्गत महाराष्ट्रातील ९० लाख ४८ शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी २ सहस्र रुपये जमा होणार आहेत. यासाठी महाराष्ट्रात १ सहस्र ८४५ कोटी १७ लाख रुपये इतका निधी वितरीत केला जाणार आहे. एप्रिल ते जुलै या कालावधीत या निधीचे वितरण होईल, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

हा या योजनेचा १७ वा हप्ता आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये एका वर्षामध्ये ३ हप्त्यांमध्ये ६ सहस्र रुपये जमा केले जातात. पहिला हप्ता डिसेंबर ते मार्च, दुसरा हप्ता एप्रिल ते जुलै, तर तिसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत जमा केला जातो. देशातील एकूण ९ कोटी २० लाख शेतकरी कुटुंबांना या योजनेच्या अंतर्गत २० कोटी रुपये वितरीत केले जात आहेत. शेतीच्या काळात शेतकर्‍यांना या निधीचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.