आज संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान आणि समविचारी  संस्था यांच्या वतीने ३५० वा हिंदु साम्राज्य दिन सोहळा !

पुणे, १९ जून (वार्ता.) – संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान आणि समविचारी संस्था यांच्या वतीने आयोजित ३५० वा हिंदु साम्राज्य दिन सोहळा २० जून या दिवशी साजरा करण्यात येणार आहे. यासाठी चिंचवड गावातील हुतात्मा चापेकर चौकातून प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील बाल-तरुण, जिजाऊ आऊसाहेब आणि मावळे अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. नंतर सभागृहात सर्वांच्या समवेत संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात जसे मोगलांना सर्वत्र छत्रपती शिवाजी राजे दिसले तो प्रसंग आणि नंतर राज्याभिषेकाचा प्रसंग साकारण्यात येणार आहे. शेवटी शिववंदना होऊन कार्यक्रम पूर्ण होईल. या सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे आपणही तेवढ्याच उत्साहात हा सोहळा साजरा करण्याचा संकल्प करूया, तसेच या सोहळ्यात सहभागी होऊन या ऐतिहासिक सोहळ्याचा लाभ अधिकाधिक जणांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.