शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आणि राजकीय पक्ष यांचा मोर्चा !
कोल्हापूर – सरकार गोवा ते नागपूर असा ८०६ किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग करणार आहे. या महामार्गामुळे अनेक शेतकर्यांच्या भूमी जातील आणि जैवविविधता नष्ट होईल, असा आरोप करत सहस्रो शेतकरी आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. या मोर्च्यात काँग्रेसचे खासदार छत्रपती शाहू महाराज, काँग्रेसचे सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे यांसह अन्य उपस्थित होते.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या मार्गासाठी ४० सहस्र एकर भूमी शेतकर्यांकडून घेतली जाणार आहे. त्यासाठी ८६ सहस्र कोटी रुपये व्यय केले जातील. याला १२ जिल्ह्यांतील शेतकर्यांचा विरोध आहे. शेतकर्यांशी चर्चा न करताच हा मार्ग करण्यात येत आहे. महामार्गामध्ये घेतली जाणारी भूमी बागायत आहे. पर्यावरण, जैवविविधता, जलस्रोत, भूजल पातळी, नदी, विहिरी, कालवे, पाण्याच्या वाहिनी, शेती महामार्गामुळे नष्ट होणार आहे. पर्यायी महामार्ग असतांना हा महामार्ग का करण्यात येत आहे ? याचे उत्तर सरकारकडे नाही. त्यामुळेच मार्ग रहित करावा.