केवळ नैसर्गिक, नव्हे आध्यात्मिक !

वटपौर्णिमेचा सण आला की, वडाच्या झाडाचे नैसर्गिक लाभ (सावली मिळणे), त्याचे औषधी लाभ, त्यातून अधिक प्राणवायू कसा मिळतो, म्हणजे त्याचे वैज्ञानिक किंवा आरोग्याशी निगडित लाभ यांविषयीच्या माहितीचे संदेश विशेषतः नवहिंदुत्ववाद्यांकडून फिरू लागतात. ‘वडाची पूजा या सर्व लाभांमुळे करायला सांगितली आहे’, असे त्यांना त्यातून सुचवायचे असते. वडाच्या झाडाचे लाभ निश्चितच योग्य आहेत आणि ऋषिमुनींनी ते ओळखले, हेही त्यांचे अनन्यसाधारण मोठेपण आहे; परंतु हिंदूंच्या प्रत्येक सणाच्या संदर्भात केवळ त्या त्या सणाच्या वेळी वापरल्या जाणार्‍या वनस्पती, वृक्ष, फूल, फळे आदींच्या केवळ मानवाला असलेल्या लाभामुळे त्यांचे पूजन केले जाते असे नव्हे, तर पूजाविधी किंवा व्रतवैकल्यै केल्याने मानवाला त्याचा आध्यात्मिक स्तरावर होणार्‍या लाभासाठी ते करायला सांगितलेले असते.

वटपौर्णिमेच्या पारंपरिक व्रताकडे काही आधुनिक स्त्रिया तुच्छतेने पहातात, तर काहींसाठी तो चेष्टेचा विषय असतो. स्त्रीवादी पुरोगामी महिला ‘केवळ स्त्रियांनीच असे का करायचे ?’, ‘नवरा छळत असेल तरी ७ जन्म तोच नवरा मागायचा का ?’, असे बुद्धीवादी प्रश्न विचारतात. काही भाविक स्त्रिया अजूनही हे व्रत श्रद्धेने करतात. या पार्श्वभूमीवर ज्यांच्याकडून वडाच्या झाडाचे महत्त्व सांगण्याचे प्रयत्न होतात, ते कौतुकास्पद आहेत; परंतु त्याही पुढे जाऊन ‘व्रतविधान हे आध्यात्मिक लाभासाठी करायचे असतात’, हे नवहिंदूंना आता ठामपणे सांगता आले पाहिजे. अलीकडच्या काळी बहुसंख्य हिंदूंनी त्याचा खरा अनुभव घेतला नसल्याने ते याविषयी सांगू शकत नाहीत. म्हणून हिंदूंनी धार्मिक कृतींमागील धर्मशास्त्र समजून घेऊन त्याच्या आध्यात्मिक लाभाकडे लक्ष केंद्रित करून त्याची अनुभूती घेतल्यास हिंदूंचा स्वधर्माभिमान वृद्धींगत होईल. सध्याच्या काळाच्या अनुषंगाने हिंदु स्त्रियांसाठी वडाच्या झाडाचे पूजन ही काही अपरिहार्य गोष्ट नव्हे; परंतु धर्मात हे व्रत सांगितले आहे, तर त्याचे महत्त्व ठाऊक असणे प्रत्येक हिंदूसाठी सध्या अपरिहार्य आहे. ‘प्रलयानंतरही वटवृक्ष असतो’, असे धर्मात सांगितले आहे. वडाच्या झाडात ईश्वरी तत्त्व असते. त्या वडाचे पूजन भावपूर्ण केल्याने त्यातील चैतन्य स्त्रियांना मिळते. ‘पातिव्रत्य’ ही केवळ स्त्रीची पतीशी निगडित संकल्पना नसून ते त्यांच्या साधनेचे माध्यम आहे. त्यातून त्या स्त्रीची एका ठराविक वरच्या टप्प्यापर्यंत साधना होते. अनुसूया, सावित्री, सीता किंवा अन्य ऋषिपत्नी आदींमध्ये पातिव्रत्यात ‘अशक्य ते शक्य’ करण्याची शक्ती होती. म्हणून पतीव्रता स्त्रिया प्रातःस्मरणीय झाल्या आहेत. तात्पर्य वटपौर्णिमा केवळ नैसर्गिक नाही, तर आध्यात्मिक स्तरावरील आहे, हे लक्षात घेतले पाहिजे !

– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.