छत्रपती शिवाजी महाराज सहिष्णू होते का ?
आज ‘शिवराज्याभिषेकदिन’ आहे. त्या निमित्ताने…
सगळे हिंदु सहिष्णूच आहेत. सहिष्णुता हा हिंदूंचा नैसर्गिक गुण आहे. ‘दुसर्यांच्या मतांचा, भावनांचा, श्रद्धास्थानांचा आदर राखावा’, असे संस्कार हिंदु संस्कृती करते. ‘सहिष्णु असणे याचा अर्थ अन्याय सहन करणे’, असा होत नाही, तसेच हिंदूंनी त्यांच्या श्रद्धास्थानांविषयी श्रद्धा, आदर बाळगायचा नाही, असाही सहिष्णुतेचा अर्थ होत नाही. ‘आततायी माणसाला सन्मानाने वागवावे’, अशी शिकवण हिंदु संस्कृती देत नाही. ‘सहिष्णुता’ आणि ‘सर्वधर्मसमभाव’ हे दोन शब्द भिन्न आहेत. ‘सगळे धर्म सारखीच शिकवण देतात’, हा भ्रम आहे.
१. छत्रपती शिवरायांच्या दृष्टीने सहिष्णुतेची व्याख्या
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती यांचा जाज्वल्य अभिमान बाळगतांना कुणाची पर्वा केली नाही. त्यांच्या राजवटीत वेदांचे अध्ययन करणार्यांना उदरनिर्वाहासाठी प्रतिवर्षी धान्य दिले जात होते. पंचांग हे हिंदूंचे शास्त्रशुद्ध कालमापन आहे. याच कालमापनावर हिंदूंचे सर्व सण, उत्सव, साजरे केले जातात. छत्रपती शिवरायांच्या काळात ‘कृष्ण ज्योतिषी’ या नावाचा एक विद्वान होता. त्याने छत्रपती शिवरायांच्या आज्ञेवरून ‘करणकौस्तुभ’ नावाचा एक संस्कृत ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ पंचांग शुद्धीकरता लिहिण्यात आला होता. छत्रपती शिवरायांना संस्कृत भाषेबद्दल श्रद्धा होती. त्यांची मुद्रासुद्धा संस्कृत भाषेतच होती.
‘राक्षसी प्रवृत्ती आणि विकृती यांच्या समोर सहिष्णुता उपयोगी पडत नाही’, हे छत्रपती शिवरायांनी जाणले होते. ‘सहिष्णु असणे म्हणजे अन्याय अत्याचाराविरुद्ध गप्प बसणे’, असा जो आज अर्थ लावला जातो, तसा सहिष्णू या शब्दाचा अर्थ नाही. ‘सज्जनांशी सज्जनतेने वागणे; दुष्ट दुर्जनांना नष्ट करून शांतता, सुव्यवस्था आणि न्याय प्रस्थापित करणे’, याचा अर्थ सहिष्णुता असा आहे. या व्याख्येनुसार छत्रपती शिवराय सहिष्णू होते.
२. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने सहिष्णुता कोणती ?
इतर धर्मियांना त्यांचा धर्म त्यांची संस्कृती प्रिय आणि श्रेष्ठ आहे. त्यांनी त्यांचा धर्म आणि त्यांची संस्कृती यांच्याविषयी आदर बाळगला, तर ते असहिष्णू ठरत नाहीत; पण हिंदूंनी त्यांच्या प्रिय धर्माचा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगला, तर मात्र लगेचच हिंदूना असहिष्णू ठरवले जाते. हा न्याय नसून ही हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती यांविषयी जोपासलेली द्वेष भावना आहे. अशा द्वेष भावनेला फसून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा धर्म आणि संस्कृती यांविषयी अनास्था दाखवली नाही. याचाच अर्थ ‘अन्य धर्मांविषयी आदरभाव व्यक्त करायचा आणि स्वधर्माविषयी अनास्था बाळगयची’, असा सहिष्णुतेचा अर्थ होत नाही. ‘पुतना मावशीची खणा नारळाने ओटी न भरणे’, हीच हिंदूंची सहिष्णुता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यादृष्टीनेच सहिष्णु होते, असे आपण ठामपणे म्हणू शकतो.
३. छत्रपती शिवरायांचे ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापनेचे उद्दिष्ट साध्य झाले का ?
छत्रपती संभाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांचा मुलगा रामसिंह याला एक पत्र लिहिले, ‘सध्या औरंगजेबाला सर्व हिंदू सत्त्वशून्य आणि स्वधर्महीन झाले आहेत, असे वाटते. आम्ही धर्म आणि प्रजापालन यांविषयी राजधर्मापासून दूर जाऊ इच्छित नाही. यवनांच्या विरोधात युद्ध करण्यासाठी आम्ही आमचा खजिना, देश, गड आणि सारे काही पणाला लावायला सिद्ध आहोत. औरंगजेबाला कारागृहात टाकून श्रींची स्थापना करण्याची आणि सर्व धर्म कृत्यांचे प्रवर्तन करण्याची वेळ आली आहे. तुम्ही सुद्धा यवनांना धडा शिकवण्यासाठी धाडस दाखवले पाहिजे, तरच निभाव लागेल. स्वधर्माचा त्याग करून तुम्ही जेव्हा स्वस्थ बसता त्या वेळी आम्हाला त्याचे नवल वाटते.”
याचा अर्थ ‘प्रत्येक हिंदूंनी कधीही अकर्मण्यता वृत्तीने वागायचे नाही’, असा होतो. राष्ट्ररक्षण, राष्ट्र-धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी २४ घंटे प्रत्येक हिंदूने सज्ज असले पाहिजे. ही वृत्ती जोपर्यंत हिंदु समाजात जिवंत आहे, तोपर्यंत छत्रपती शिवरायांच्या ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापनेचे उद्दिष्ट अबाधित रहाणार, याची निश्चिती आहे.
छत्रपती राजाराम महाराज यांनी हनुमंतराव घोरपडे यांना ४ जून १६९१ या दिवशी एक पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी ‘महाराष्ट्र धर्माचे पूर्ण रक्षण करावे’, असे म्हटले आहे. राजाराम महाराज वयाच्या ३२ व्या वर्षी देहली जिंकण्याची मनिषा बाळगतात. त्या वेळी त्यांच्या मनात समर्थ रामदासस्वामींचे ‘महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे’, हे वचन खोलवर रुजले असल्याची प्रचीती येते. त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांनी जे ध्येय मराठ्यांसमोर ठेवले, त्या ध्येयपूर्तीसाठी शौर्य गाजवण्याचे धाडस शिवरायांची हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ त्यांना देत असते. ‘छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर सर्वांची सुंता झाली असती’, हे कवी भूषण यांचे हे वचन आजही आपल्या शिवरायांचे उद्दिष्ट दुर्लक्षित झाले, असे सांगत नाही. ‘हिंदुस्थान हे हिंदु राष्ट्र आहे’, असे घोषित करण्याचा आग्रह आजची हिंदू जनता करते, हे त्याचेच द्योतक आहे.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१४.६.२०२४)