Retired Brigadier Of Pakistan Killed : पाकिस्‍तानी सैन्‍याच्‍या निवृत्त ब्रिगेडियरची अज्ञाताकडून हत्‍या

काश्‍मीरमधील सुंजवान येथील सैन्‍य तळावरील आतंकवादी आक्रमणाचा होता मुख्‍य सूत्रधार !

आमिर हमजा

नवी देहली – पाकिस्‍तानमध्‍ये मागील २ वर्षांपासून तेथे रहाणार्‍या भारतातील आतंकवादी आक्रमणात सहभागी असलेले आतंकवादी आणि त्‍यांचे सूत्रधार यांची अज्ञातांकडून हत्‍या केली जात आहे. आता पाकिस्‍तानी सैन्‍याचा निवृत्त ब्रिगेडियर आमिर हमजा याची अज्ञातांकडून गोळ्‍या झाडून हत्‍या करण्‍यात आली आहे. पाकिस्‍तानच्‍या पंजाब प्रांतातील झेलममध्‍ये ही घटना घडली. हमजा पाकची गुप्‍तचर संस्‍था आय.एस्.आय.चा विशेष अधिकारी होता. त्‍याला वर्ष २०१२ मध्‍ये अमेरिकेने ‘जागतिक आतंकवादी’ म्‍हणून घोषित केले होते. मुंबईवरील २६ नोव्‍हेंबर २००८ च्‍या आतंकवादी आक्रमणातही त्‍याचा सहभाग होता.

१. हमजा त्‍याच्‍या मुलगी आणि पत्नी यांच्‍यासह चारचाकी वाहनातून जात असतांना २ दुचाकींवरून आलेल्‍या ४ अज्ञातांनी त्‍यांच्‍यावर गोळीबार केला. यात हमजा याचा जागीच मृत्‍यू झाला, तर मुलगी आणि पत्नी घायाळ झाले.


२.  १० फेब्रुवारी २०१८ या दिवशी जम्‍मू-काश्‍मीरमधील सुंजवान येथील भारतीय सैन्‍याच्‍या तळावर झालेल्‍या आतंकवादी आक्रमणाचा हमजा मुख्‍य सूत्रधार होता. या आक्रमणात १ नागरिक, आणि ३ आतंकवादी ठार झाले होते, तर ६ भारतीय सैनिकांना वीरगती प्राप्‍त झाली होती. ३ दिवस सैन्‍याकडून येथे कारवाई केली जात  होती. हे आक्रमण जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेच्‍या आतंकवाद्यांनी केले होते. यामागे आय.एस्.आय.चा हात होता आणि आमिर यानेच या आक्रमणाची योजना आखली होती.

संपादकीय भूमिका

पाकिस्‍तानमध्‍ये अज्ञातांकडून आतंकवादी आणि त्‍यांचे हस्‍तक यांच्‍या होणार्‍या हत्‍या या त्‍यांच्‍या कर्माची फळे आहेत !