आषाढी वारीतील वारकर्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी ‘आपला दवाखाना’ सिद्ध !
वारी पंढरपूरला पोचेपर्यंत आरोग्य सुविधा देणार !
पुणे – आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणार्या वारकर्यांना आरोग्य विभागाकडून वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व पालखी मार्गांवर आधुनिक वैद्यांसह ६ सहस्र ३६८ वैद्यकीय कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक ५ कि.मी. अंतरावर १ याप्रमाणे २५८ तात्पुरत्या स्वरूपात ‘आपला दवाखान्या’ची सुविधा करण्यात आली आहे. पालखी मार्गांवर २४ घंटे रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. पुणे परिमंडल आणि पुणे जिल्हा परिषद यांकडून पालखी मार्गावर ४ आरोग्य पथके रुग्णवाहिकेसह पालखी संपेपर्यंत कायम सोबत रहाणार आहेत.
१३ जून या दिवशी श्री संत गजानन महाराज मंदिर पालखीने शेगाव, बुलढाणा जिल्ह्यातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. या पालखी मार्गांवर आतापर्यंत १ सहस्र ७४३ वारकर्यांना वैद्यकीय सेवा देण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी समयमर्यादेत वैद्यकीय साहाय्य मिळावे म्हणून २१२ दुचाकी रुग्णवाहिका (बाईक अॅम्ब्युलन्स) असणार आहेत. विविध दिंडी प्रमुखांना ५ सहस्र ८८५ औषधी पिशवीचे (कीट) वाटप करण्यात आले आहे.
वैशिष्ट्ये
मुक्कामाच्या ठिकाणी ५ खाटांचे अतीदक्षता विभाग असे ८७ अतीदक्षता विभाग, महिला वारकर्यांसाठी १३६ स्त्री रोगतज्ञांची नियुक्ती, १३६ ठिकाणी हिरकणी कक्ष, विविध ठिकाणी पाण्याचे नमुने पडताळणीसाठी पालखी मार्गांवर १५६ टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा असेल, तसेच मुक्कामाच्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात येईल.