संपादकीय : विनाशकारी वाढती अण्वस्त्रे !

विनाशक अण्वस्त्रे (प्रतिकात्मक छायाचित्र )

‘एस्.आय.पी.आर्.आय.’ (स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट) या जगभरातील अणूबाँबवर लक्ष ठेवणार्‍या संस्थेने तिच्या ताज्या आकडेवारीत खुलासा केला आहे की, भारताने १७२ अणूबाँब बनवले आहेत, तर पाकिस्तानकडे सध्या १७० अणूबाँब आहेत. भारताने गेल्या वर्षभरात ८ नवीन अणूबाँब बनवले आहेत, तर पाकिस्तानने गेल्या वर्षभरात एकही नवा अणूबाँब बनवला नाही. भारताचा सर्वांत मोठा शत्रू चीनची अणूबाँबची संख्या एका वर्षात ४१० वरून ५०० झाली आहे. वर्ष २०२४ मध्ये एकूण जागतिक स्तरावर सर्व देशांची मिळून एकूण अणूबाँबची संख्या आता १२ सहस्र १२१ वर पोचली आहे. अमेरिका आणि रशिया यांनी त्यांचे बहुतेक अणूबाँब ‘हाय ॲलर्ट’वर ठेवले आहेत; पण आता पहिल्यांदाच चीननेही त्याचे अणूबाँब ‘हाय ॲलर्ट’वर ठेवले आहेत. तैवानच्या सूत्रावरून चीन आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर चीनने हे पाऊल उचलले आहे. चीनने एका वर्षात ९० अणूबाँब बनवले आहेत. यावरून असे लक्षात येते की, अणूबाँब निर्मितीत भारत चीनपेक्षा पुष्कळ मागे आहे.

सर्व देशांचा अण्वस्त्रे अद्ययावत करण्याच्या तंत्रज्ञानावर भर !

गेल्या १५ वर्षांत भारत आणि पाकिस्तान यांची अणूबाँबची संख्या दुप्पट झाली आहे. या २-३ वर्षांचा विचार केला, तरअणु असे लक्षात येते की, यापूर्वी भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये अण्वस्त्रांची निर्मिती अधिक झाली आहे. ‘एस्.आय.पी.आर्.आय.’ संस्थेच्या आण्विक नि:शस्त्रीकरण आणि शस्त्र नियंत्रण या विभागाचे प्रमुख शेनन काइल यांनी बी.बी.सी. या वृत्तसंस्थेला सांगितले की, जगात अण्वस्त्रांची निर्मिती घटली आहे; पण दक्षिण आशिया याला अपवाद आहे. वर्ष २००९ मध्ये भारताकडे ६० ते ७० अणूबाँब होते आणि पाकिस्तानकडे ६० अणूबाँब होते. वर्ष २०१९ मधील आकडेवारीनुसार रशिया ६ सहस्र ५००, अमेरिका ६ सहस्र १८५, फ्रान्स ३००, ब्रिटन २००, चीन २९०, पाकिस्तान १५० ते १६०, भारत १३० ते १४०, इस्रायल ८० ते ९०, उत्तर कोरिया २० ते ३० अशा प्रकारे देशांकडे अणूबाँब होते. प्रतिवर्षी यामध्ये वाढ झाली आहे. नेमका कोणता देश अण्वस्त्रांवर किती खर्च करतो, हे सांगणे कठीण आहे. प्रत्येक देश हाच दावा करतात की, आमच्याकडे असलेली अण्वस्त्रे सुरक्षित आहेत. अण्वस्त्रांची निर्मिती अल्प झाली आहे; पण त्यांना अद्ययावत करण्याच्या तंत्रज्ञानावर सध्या भर दिला जात आहे. आजच्या आधुनिक अण्वस्त्रांच्या समोर हिरोशिमा आणि नागासाकी यांवर पडलेले अणूबाँब एखाद्या खेळण्यासारखे वाटतात. अमेरिकेने पुढे जाऊन ‘हायड्रोजन बाँब आणि मदर बाँब’ सिद्ध केला आहे, तर रशियानेही ‘फादर बाँब’ सिद्ध केला आहे. हे दोन्ही बाँब अणूबाँबच्या तुलनेत अनेक पटींनी विनाश घडवणारे आहेत. त्यामुळे इतर देशांनीही यातून प्रेरणा घेऊन असे बाँब बनवल्यास आश्चर्य वाटणार नाही !

अणूबाँबचे भयंकर परिणाम !

हिरोशिमा (डावीकडे) व नागासकी (उजवीकडे ) येथे झालेल्या भीषण परमाणु हल्ल्याचे संग्रहीत छायाचित्र.

मानवतेच्या इतिहासातील एक अत्यंत वाईट घटना म्हणजे अमेरिकेने ६ ऑगस्ट १९४५ या दिवशी जपानमधील हिरोशिमा आणि ९ ऑगस्ट या दिवशी नागासाकी या शहरांवर अणूबाँब टाकला. तिथे मोठ्या प्रमाणावर नरसंहार झाला. यामध्ये १ लाख २० सहस्र लोकांचा मृत्यू झाला. त्या बाँबमुळे होत असलेल्या किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम पुढच्या कित्येक पिढ्यांना भोगावे लागले. या अत्यंत दुर्दैवी घटनेला ७९ वर्षे होत आली असली, तरी त्या वाईट स्मृती कधीच पुसल्या जाणार नाहीत. या २ अणूबाँबनंतर आशियात दुसर्‍या जागतिक महायुद्धाची समाप्ती, ही केवळ औपचारिकताच राहिली. या सर्व गोष्टी विचारात घेऊन चीन आणि पाकिस्तान, तसेच इतर शत्रूराष्ट्रे यांना धडा शिकवण्यासाठी अणूबाँब हे मोठे आणि महत्त्वाचे हत्यार आहे. भारताने अणूबाँबच्या निर्मितीत याच अनुषंगाने वाढ केली असावी.

तिसर्‍या महायुद्धामुळे जगाचा विनाश अटळ !

अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन यांच्याजवळ अणूबाँब, हायड्रोजन बाँब अशा अनेक शस्त्रांचे इतके शक्तीशाली भांडार आहे की, ज्याच्या जोरावर इतर देशांना अनेकदा नष्ट करता येऊ शकते. शस्त्रांच्या स्पर्धेत जगातील अन्य देशही मागे नाहीत. अशा परिस्थितीत जर तिसरे जागतिक युद्ध झाले, तर पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीच नाहीशी होईल. हे संकट टाळण्यासाठी मनुष्याच्या मूलभूत प्रश्नांची शांततापूर्वक उत्तरे मिळवण्यासाठी जगाला अस्त्र-शस्त्रांपासून भयमुक्त करणे, ही आज महत्त्वाची आवश्यकता आहे; मात्र सध्याचे वातावरण पहाता हे शक्य नाही. आज या प्राणघातक आण्विक आणि रासायनिक शस्त्रांची सतत निर्मिती होत आहे. त्यामुळे निकटच्या भविष्यात तिसरे महायुद्ध होणारच आहे. त्याचसमवेत उरलेल्या जगाचा महाविनाश होईल. शेवटी परिणाम हा होईल की, अनेक युगे साधना करून जी मानवी सभ्यता, संस्कृती आणि कला यांचा विकास झाला आहे, मनुष्याने जे काही मिळवले आहे, ते सर्व नष्ट होऊन केवळ एक कथा बनून राहील. ज्या विज्ञानाने जे निर्माण केले, त्याचेही पतन निश्चितपणे होणार आहे.

चीन आणि पाक यांना धडा शिकवण्यासाठी अणूबाँब निर्मितीत वाढ आवश्यक !

जगात कोणत्या देशाकडे सर्वांत विनाशकारी शस्त्रांनी सज्ज असे शक्तीशाली सैन्य आहे, त्यावरून त्या देशाची शक्ती कळते. जगाला शांतता आणि आपसांतील सौहार्दपूर्ण संबंधांची आवश्यकता आहे, यात शंकाच नाही; परंतु देशाच्या सीमांचे रक्षण करतांना अनेक वेळा सशस्त्र संघर्ष अपरिहार्य ठरत असतो. अशा वेळी कोणत्याही बाह्य आक्रमणापासून देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत कार्यक्षम सैन्य आणि अत्याधुनिक शस्त्रे आवश्यक ठरत असतात. गेले अनेक महिने चालू असलेले रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध असो कि सध्या गाझामध्ये चालू असलेली लढाई असो, संघर्ष हा अटळ ठरतो हे एक क्रूर; परंतु वस्तूस्थितीजन्य सत्य आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच चीन, पाकिस्तान, बांगलादेश या देशांपासून धोका आहे. चीन तर भारताच्या क्षेत्रात मनमानी पद्धतीने अतिक्रमण करून भूमी बळकावण्याचा प्रतिदिन प्रयत्न करत आहे. जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावरून पाकिस्तानने भारतावर जिहादी आक्रमण चालूच ठेवले आहे. प्रतिदिन काश्मीर खोर्‍यात पाकिस्तानचे आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात गोळीबार होत आहे. आता मालदीव आणि तुर्कीस्तान यांसारखे छोटे छोटे देश भारताचे शत्रू होत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार केला, तर भारताने संरक्षणाला प्राधान्य देऊन अणूबाँब आणि शस्त्रास्त्रनिर्मिती यांत वाढ केलीच पाहिजे !

तिसरे महायुद्ध झाल्यास मानवी सभ्यता, संस्कृती आणि कला यांसमवेत विज्ञानाने जे निर्माण केले, त्याचेही पतन निश्चित !