इस्रायलचे युद्ध मंत्रीमंडळ विसर्जित !
पंतप्रधान नेतान्याहू यांच्यावर कट्टर राष्ट्रवादी नेत्यांचा प्रभाव असल्याचा विरोधी पक्षाच्या खासदाराचा आरोप !
तेल अवीव (इस्रायल) – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझामधील युद्धाचे संचालन करणारे युद्ध मंत्रीमंडळ विसर्जित केले आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासविरुद्धच्या युद्धाच्या आरंभीच्या काळात सरकारमध्ये सहभागी झालेले विरोधी पक्षाचे खासदार बेनी गँट्झ युद्ध मंत्रीमंडळातून बाहेर पडल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
बेनी गँट्झ, नेतान्याहू आणि संरक्षणमंत्री यौव गॅलन्ट हे या युद्ध मंत्रीमंडळाचे सदस्य होते. नेतान्याहू त्यांच्या काही निकटवर्तीय सरकारी सदस्यांसह संवेदनशील सूत्रांसाठी एक छोटे मंत्रीमंडळ स्थापन करणार असल्याची शक्यताही यानंतर व्यक्त करण्यात आली आहे.
मुळात गँट्झ यांनी ‘नेतान्याहू सरकारमधील प्रखर राष्ट्रवादी खासदारांना बाजूला करण्यासाठी एक लहान मंत्रीमंडळ स्थापन करण्यात यावे’, अशी मागणी केली होती. पुढे गँट्झ यांनी ‘नेतान्याहू यांच्या निर्णयांवर कट्टर राष्ट्रवादी नेत्यांच्या मतांचा प्रभाव असून त्यांच्या युद्धाच्या हाताळणीत त्रुटी राहिल्या आहेत’, असा आरोप करत जून २०२४ च्या आरंभीच युद्ध मंत्रीमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.