पू. शिवाजी वटकर यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यापूर्वी आणि सोहळ्याच्या वेळी जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !
‘मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यात त्यांच्याच कृपेने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी मिळाली. ब्रह्मोत्सव सोहळ्यापूर्वी, हा सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना आणि सोहळ्यानंतर गुरुकृपेने मला अनेक सूत्रे जाणवली अन् अनुभूतीही आल्या. त्या गुरुचरणी अर्पण करत आहे.
१. ब्रह्मोत्सव सोहळ्यापूर्वी जाणवलेली सूत्रे
१ अ. ‘ब्रह्मोत्सव भव्य-दिव्य होणार आहे’, असे सोहळ्यापूर्वीच जाणवणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आठवण येऊन भावजागृती होणे : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव कोणत्या दिवशी ? कुठे ? आणि कसा होणार ?’, हे मला किंवा कुणालाच ठाऊक नव्हते; पण ‘काहीतरी भव्य दिव्य होणार आहे’, असे मला वाटत होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आठवणीने माझी भावजागृती होत होती. त्यांच्या कृपेने याविषयी मला एक कविता सुचली होती.
१ आ. ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या भंडार्याच्या वेळी साधकांनी लुटलेला आनंद त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवातूनही मिळेल’, असे वाटणे : वर्ष १९९२ ते वर्ष १९९५ या कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हा साधकांना कांदळी, इंदूर, मोरटक्का (मध्यप्रदेश) आणि मोरचुंडी (महाराष्ट्र) येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या भंडार्यासाठी घेऊन जात असत. तेथे प.पू. भक्तराज महाराज यांचा दर्शन सोहळा, भजने आणि भंडारा (महाप्रसाद) इत्यादी कार्यक्रम असत.
जेव्हा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा वर्ष २०२३ मधील जन्मोत्सव ‘ब्रह्मोत्सव’ म्हणून साजरा होणार’, हे मला समजले, तेव्हा ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या भंडार्याला गेल्यावर आम्ही जो आनंद लुटत होतो, तोच आनंद या ब्रह्मोत्सव सोहळ्यासाठी उपस्थित असणारे सनातन संस्थेचे साधकही लुटतील’, असे मला वाटले.
१ इ. ब्रह्मोत्सवाला उपस्थित रहाण्याविषयी मनाची झालेली विचारप्रक्रिया
१. ब्रह्मोत्सवाला उपस्थित रहाण्यासाठी काही साधकांना निमंत्रण देण्यात आले होते. त्या वेळी ‘मला या सोहळ्यासाठी बोलवावे, मी त्यासाठी जावे किंवा जाऊ नये’, असे मला वाटत नव्हते. ‘माझी साधना होण्यासाठी आणि मला आनंद मिळण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या इच्छेने (ईश्वरेच्छेने) सर्वकाही होणार आहे’, याची मला जाणीव होत होती आणि माझे मन उल्हसित, सकारात्मक अन् आनंदी होते.
२. ‘जे साधक प्रत्यक्ष सोहळ्यासाठी जाऊ शकणार नव्हते, त्यांना हा कार्यक्रम ‘ऑनलाईन’ पहाता येणार होता’, हे कळल्यावर ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ !’, या तत्त्वानुसार जे साधक स्थुलातून जन्मोत्सवाला उपस्थित राहू शकणार नव्हते, त्यांनाही हा सोहळा आनंद देणार आहे’, असे मला जाणवत होते.
३. ‘मी ब्रह्मोत्सवाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाही’, हे कळल्यावर मला प.पू. भक्तराज महाराज यांच्या ‘चला जाऊ नाथ सदनाला…’ या भजनातील पुढील कडवे आठवून माझी भावजागृती झाली.
ना येणे होईल तुम्हा जरी ।
चिंतन करा नाम आपुले घरी ।
भक्ता देतील ओळख अंतरी ।
ऐसा अमोल भक्तीचा झरा ।
नाथ येतील हृदयमंदिरा ।।
२. ब्रह्मोत्सव सोहळा पहातांना जाणवलेली सूत्रे
२ अ. सोहळ्याचे कल्पनातीत भव्य नियोजन : सोहळा पहातांना माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तेथील भव्य मैदान, बैठकव्यवस्था, मोठे व्यासपीठ, दिव्य चैतन्यमय रथ, वाहनतळ इत्यादी सर्वच अनाकलनीय आणि भव्य दिव्य होते. माझ्यासारखा सर्वसामान्य साधक या सोहळ्याची आणि त्याच्या नियोजनाची कल्पनाही करू शकत नाही. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी आम्हा साधकांना या भव्य दिव्य कार्यक्रमाचे दर्शन घडवले आणि आमच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
२ आ. ब्रह्मोत्सव पहातांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवाची आठवण होऊन भावजागृती होणे : वर्ष १९९५ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी इंदूर येथे प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या अमृत महोत्सवाचे भव्य दिव्य नियोजन केले होते. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी मोठ्या मैदानातील भव्य प्रवेशद्वारे, सभामंडप इत्यादींचे आयोजन स्वतः केले होते. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव पहातांना मला प.पू. बाबांच्या अमृत महोत्सवाची आठवण झाली आणि माझी भावजागृती झाली. (क्रमश:)
– (पू.) शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.६.२०२३)
भाग २ : https://sanatanprabhat.org/marathi/805776.html
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |