सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या कृपेने साधनेचे प्रयत्न होत असल्याबद्दल रत्नागिरी येथील आधुनिक वैद्या (सौ.) साधना जरळी यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !
‘सप्टेंबर २०२२ पासून भगवंताच्या कृपेने माझा व्यष्टी साधनेचा आढावा घेणारे साधक आणि दायित्व साधक यांच्या दिशादर्शनामुळे काही व्यष्टी अन् समष्टी साधनेचे विविध पैलू माझ्या लक्षात येऊन माझ्याकडून साधनेचे झालेले प्रयत्न मी श्री गुरुचरणी अर्पण करते.
१. कृतज्ञताभाव वृद्धींगत करण्याचे प्रयत्न करणे : मी कृतज्ञताभाव वृद्धींगत करण्यासाठी दिवसातून एकदा भावसूचना घेणे चालू केले. मी प्रत्येक कृती भावाच्या स्तरावर करू लागले. माझ्याकडून साधक, कुटुंबीय, तसेच आतापर्यंत मला साधनेत साहाय्य करणार्या सर्व साधक यांच्या प्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त होऊ लागली. मला सेवेत साहाय्य करणारी उपकरणे आणि सर्व वस्तू यांच्या प्रतीही कृतज्ञता वाटू लागली.
२. व्यष्टी साधनेच्या अंतर्गत केलेले प्रयत्न : सप्टेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत मला माझ्या चुका लक्षात आल्यानंतर ताण येत असे. मला वाटत असे, ‘माझ्याकडून ही चूक व्हायला नको होती. माझे वागणे आदर्शच असायला हवे.’ मी कृतज्ञताभाव वृद्धींगत करण्याचे प्रयत्न चालू केल्यावर मला माझ्या चुका लक्षात येऊ लागल्या आणि माझ्याकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न होऊ लागले.
२ अ. कृतज्ञता व्यक्त करणे : ‘प्रसंग घडल्यामुळे मला माझ्यातील स्वभावदोषाची जाणीव झाली’, याबद्दल सर्वप्रथम देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे.
२ आ. स्वयंसूचना देणे : चूक होण्यामागील मूळ स्वभावदोष शोधून तो सारणीत लिहिणे आणि त्यावर स्वयंसूचना देणे.
२ इ. चिंतन करणे : ‘अशा प्रकारची चूक पुन्हा होऊ नये’, त्यासाठी करायच्या उपाययोजनेविषयी चिंतन करणे.
२ ई. प्रसंगातून शिकणे : ‘या प्रसंगातून देवाला मला काय शिकवायचे आहे ?’, याचे चिंतन करून ते शिकण्याचा प्रयत्न करणे.
२ उ. क्षमायाचना करणे आणि प्रायश्चित्त घेणे
३. व्यष्टी साधनेचे प्रयत्न केल्यामुळे मन सकारात्मक होऊन उत्साह निर्माण होणे : त्यानंतर माझ्याकडून चूक झाल्यास मनावर होणार्या नकारात्मक परिणामांची तीव्रता आणि कालावधी न्यून झाला. माझे मन सकारात्मक होऊ लागले. जानेवारी २०२४ पासून माझ्यातील शिकण्याची वृत्ती वाढून माझ्यात उत्साह निर्माण झाला. देवाने माझ्याकडून वेळोवेळी ‘भगवंताच्या चरणी प्रार्थना करणे, भाव ठेवणे आणि त्याला आळवणे’, असे प्रयत्न करून घेतले.
४. व्यष्टी साधनेच्या प्रक्रियेच्या अंतर्गत होणार्या भावसत्संगामध्ये दिलेल्या ध्येयानुसार प्रयत्न होणे : ‘व्यष्टी साधनेच्या प्रक्रियेच्या अंतर्गत होणार्या भावसत्संगात प.पू. गुरुदेवांच्या भाववाक्यांचे स्मरण करणे आणि गुरुदेवांच्या सत्संगातील क्षण आठवणे’, असे ध्येय दिले होते.
अ. देव नेहमी दैवी बालकांच्या मागे आणि पुढे उभा असतो. तोच त्यांची काळजी घेत असतो.
आ. मला सतत वर्तमानकाळात रहायचे आहे.
इ. ‘मला जितके प्रयत्न करणे शक्य आहेत, तितके प्रयत्न मी केले आहेत ना’, हे नेहमी पहावे. ‘आपण योग्य क्रियमाण वापरत आहोत ना’, याची नेहमी निश्चिती करावी. देव पुढचे बघून घेतो.
ई. सेवा परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे.
उ. मला माता बनून सर्वांना समजून घ्यायचे आहे. तेव्हाच माझ्या अपेक्षा न्यून होणार आहेत.
ऊ. माझ्यापेक्षा गुरूंनाच ‘मी पुढे जावे आणि माझी प्रगती व्हावी’, अशी तळमळ अधिक आहे.
माझा एखाद्या प्रसंगात संघर्ष होत असतांना किंवा मला काळजी वाटत असतांना मी ही भाववाक्ये आठवल्यावर मला मात करण्यासाठी भावऊर्जा मिळाली.
५. भावजागृतीचे प्रयत्न केल्यामुळे झालेले लाभ
५ अ. मुलाविषयीच्या काळजीचे विचार न्यून होणे : पूर्वी माझ्या मनात माझ्या मुलाविषयी (कु. योगेश्वर, आध्यात्मिक पातळी ५२ टक्के, वय १२ वर्षे) पूर्वी काळजीचे विचार येत असत. त्यामुळे माझे मन अस्वस्थ होत असे. माझ्यातील ‘भावनाशीलता’ या स्वभावदोषामुळे माझा त्या विचारांमध्ये बराच वेळ वाया जात असे. मी ‘यजमान आणि मुलगा यांना मानसरित्या प.पू. गुरुदेवांच्या पावन चरणी घेऊन जाणे, त्या ठिकाणी आम्ही तिघांनी एकत्रित सर्वांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रार्थना करणे आणि आत्मनिवेदन करणे’, असे भावजागृतीचे प्रयत्न चालू झाले. त्यामुळे माझ्या मनातील काळजीचे विचार न्यून झाले.
५ आ. स्वीकारण्याची वृत्ती वाढणे : मला आरंभी सेवेच्या दृष्टीने पालटलेले नियोजन स्वीकारणे कठीण वाटत असे. त्या वेळी माझा संघर्ष होत असे. ‘भगवंत माझे नियोजन करत आहे आणि मी हे नियोजन स्वीकारल्याने मला सर्वच स्तरांवर लाभच होणार आहे’, असा दृष्टीकोन ठेवल्याने माझा परिस्थिती स्वीकारण्याच्या प्रयत्नांना आरंभ झाला.
५ इ. भाववृद्धीसाठीची स्वयंसूचना दिल्यामुळे स्वयंसूचना अंतर्मनापर्यंत जाऊन स्वभावदोषांवर मात करण्यासाठी कृती करणे सहज शक्य होणे : मी भाववृद्धीसाठीची स्वयंसूचना दिल्यामुळे ‘प्रत्येक कृती भावाच्या स्तरावर करायची आहे आणि भावजागृतीचे प्रयत्न करायचे आहेत’, याची माझ्या मनाला जाणीव होऊ लागली. मी सेवा करत असतांना ‘गुरुदेव माझ्याकडे पहात आहेत. श्री गुरूंचा आशीर्वाद देणारा हात माझ्या डोक्यावर आहे. मी सूक्ष्मातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ किंवा परात्पर गुरुदेव यांच्या खोलीत जाऊन स्वयंसूचना सत्र करत आहे’, असे प्रयत्न होऊ लागले. त्यामुळे मी घेत असलेल्या स्वयंसूचना अंतर्मनापर्यंत जाऊन मला स्वभावदोषांवर मात करण्यासाठी कृती करणे सहज शक्य झाले.
५ ई. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकल गाडगीळ सूक्ष्मातून साधिकेवरील आवरण काढत आहेत आणि देह हलका होत आहे’, असे तिला जाणवणे : मी हाताने स्वतःवरील आवरण काढत असतांना ‘ते माझे हात नसून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचेच हात आहेत आणि त्या माझ्यावरील आवरण दूर करत आहेत. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हातांतून एक निराळीच ऊर्जा माझ्या देहामध्ये प्रवेश करत आहे’, असे मला जाणवत असे. नंतर माझ्या देहाला हलकेपणा जाणवत असे.
५ उ. श्री गुरूंची श्रीरामाच्या रूपात मानस पाद्यपूजा करणे आणि मनाला एक वेगळ्या प्रकारची स्थिरता, समाधान आणि शांतता जाणवणे : २२.१.२०२४ या दिवशी अयोध्या येथे श्रीरामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली. त्या दिवसापासून मी सकाळी उठल्यानंतर नियमित श्री गुरूंची श्रीरामाच्या रूपात मानस पाद्यपूजा करू लागले. त्या वेळी मी श्री गुरूंना माझ्या हृदयमंदिरात विराजमान होण्यासाठी भावस्वरूपात आळवत असे. मी असा भावजागृतीचा प्रयत्न करत असल्याने माझ्या मनाला एक वेगळ्याच प्रकारची स्थिरता, समाधान आणि शांतता जाणवत आहे.
५ ऊ. स्वयंसूचना सत्र करतांना आणि मनाचा आढावा घेतांना बसायची जागा, म्हणजे मोक्षप्राप्तीची वाट दाखवणारी, साधकांना घडवणारी आणि भावानंद देणारी आनंददायी जागा वाटणे : स्वयंपाकघरात सेवा करतांना आम्ही स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणारे साधक स्वयंपाकघराच्या मागे असलेल्या जागेत बसून स्वयंसूचना सत्र करतो आणि मनाचा आढावा घेतो. ‘ही जागा म्हणजे जणू मोक्षप्राप्तीची वाट दाखवणारी, मला घडवणारी आणि भावानंद देणारी अशी आनंददायी जागा आहे’, असे मला वाटते.
६. पू. रमानंद गौडा यांचा लाभलेला सत्संग
६ अ. सत्संगानंतर ‘स्वतःचे प्रयत्न किती न्यून होत आहेत’, याची जाणीव होणे : २० ते २४.१.२०२४ या कालावधीत मी एका शिबिरासाठी कर्नाटक राज्यात गेले होते. शिबिर झाल्यानंतर मला धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांचा सत्संग लाभला. पू. रमानंदअण्णांनी सत्संगात ‘स्वतःची शारीरिक स्थिती ठीक नसतांनाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ईश्वरप्राप्तीच्या ओढीने कसे प्रयत्न केले’, याविषयी सांगितले. देवाला आर्ततेने हाक मारल्यानंतर ‘देवाने त्यांना कसे साहाय्य केले’, हेही त्यांनी अत्यंत भावपूर्ण विशद केले. त्यांचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर ‘मला साधनेसाठी किती अनुकूलता आहे, तरीही माझ्याकडून भाववृद्धीसाठीचे प्रयत्न होत नाहीत. देवाला हाक मारण्याचे प्रयत्नही पुष्कळ न्यून होत आहेत. माझी तळमळ आणि शिकण्याची वृत्ती वाढवायला हवी’, याचीही मला आतून जाणीव झाली.
६ आ. पू. रमानंद गौडा यांच्या सत्संगानंतर मनात सकारात्मक विचार येणे : त्यानंतर माझ्या मनाची स्थिती अत्यंत सकारात्मक झाली. माझ्या मनात ‘मला जे जमत नाही, ते शिकायचे आहे. येणार्या अडथळ्यांवर मात करायची आहे आणि काहीही झाले, तरी गुरूंनी दिलेल्या सेवेच्या माध्यमातून त्यांचे मन जिंकायचे आहे’, असे सकारात्मक विचार येऊ लागले. देवाने माझ्याकडून कृतीच्या स्तरावरही तसे प्रयत्न करून घेतले.
७. प्रार्थना : असे प्रयत्न करायला सांगणारे आणि दिशा देणारे, प्रयत्न करून घेणारे आणि मला आनंद देणारे श्री गुरुच आहेत ! मला ‘श्री गुरुचरणांना पकडून अखंड गुरुसेवेत लीन रहाता येऊ दे’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना !
८. कृतज्ञता : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ मला घडवण्यासाठी आणि मी आनंदी रहाण्यासाठी साधकांच्या माध्यमातून मला जे शिकवत आहेत, माझ्यातील नेतृत्व विकसित करण्यासाठी मला संधी देत आहेत’, त्याबद्दल या तिन्ही मोक्षगुरूंच्या पावन चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– आधुनिक वैद्या (सौ.) साधना जरळी, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (१.३.२०२४)
|